अमेरिकेकडून पंतप्रधान मोदी ‘लीजन ऑफ मेरिट’ पुरस्काराने सन्मानित

अमेरिकेमधील भारताचे राजदूत तरणजीत सिंह संधू यांनी स्वीकारला

डावीकडून अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन आणि अमेरिकेमधील भारताचे राजदूत तरणजीत सिंह संधू

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा सर्वोच्च मिलिट्री सन्मान ‘लीजन ऑफ मेरिट’ने सन्मानित केले. हा पुरस्कार भारत आणि अमेरिका यांच्यातील रणनीतीक संबंध वाढवण्यासाठी देण्यात आला. मोदी यांच्या वतीने अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत तरणजीत सिंह संधू यांनी हा पुरस्कार स्वीकारला, तर ट्रम्प यांच्या वतीने अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी तो दिला. हा पुरस्कार केवळ एखाद्या देशाच्या किंवा सरकारच्या प्रमुखांना दिला जातो. मोदी यांच्यासह हा पुरस्कार जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनाही देण्यात आला.

२० जुलै १९४२ या दिवशी अमेरिकेच्या संसदेने (काँग्रेसने) हा पुरस्कार देण्यास प्रारंभ केला. हा पुरस्कार अमेरिकेतील सैनिकांच्या व्यतिरिक्त विदेशातील सैनिक आणि राजकारणी यांनाही दिला जातो, ज्यांनी असाधारण सेवा दिल्या आहेत.