ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते यांनी वर्ष २०१६ मध्ये सनातनच्या देवद येथील आश्रमाला भेट दिली होती. त्या वेळीच त्यांचे संतपद घोषित करण्यात आले. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते यांचा शाल, श्रीफळ, प्रसाद आणि श्रीकृष्णाचे चित्र देऊन सन्मान केला. सन्मानप्रसंगी सनातनचे पू. (आताचे सद्गुरु) राजेंद्र शिंदे यांनी ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराजांविषयी माहिती कथन केली. या वेळी ते म्हणाले, ‘‘धर्मप्रसाराचे कार्य धडाडीने करणारे, धर्मद्रोही आणि विद्रोही यांच्या लिखाणाचे खंडण करणारे ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते हे आधीपासूनच संतपदावर पोचलेले आहेत.’’
परिचय
ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते हे वारकरी संप्रदायातील सध्याच्या काळातील अत्यंत ज्येष्ठ सत्पुरुष होते. सनातन हिंदु धर्मपरंपरेतील वेद, उपनिषदे, श्रुति-स्मृति आणि पुराणे यांचेही ते गाढे अभ्यासक होते. वारकरी परंपरेतील प्रसारासह सनातन वैदिक धर्माची जागृती करणे, तसेच विद्रोही विचारांचे सर्व स्तरांवर सातत्याने खंडण करणे हेही त्यांचे कार्य होते. मनुस्मृति, रामायण, महाभारत, भगवद्गीता यांचे वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व ते समाजासमोर मांडत. या शास्त्रांविषयी आणि विद्रोहाच्या खंडणाविषयीही ते लिखाण करत. ते स्वतःच्या क्षमतेनुसार विद्रोहींच्या विरोधात आंदोलने करत. त्यांच्यात पुष्कळ क्षात्रवृत्ती होती. धर्मद्रोही व्यक्ती अगदी कितीही मोठी असू दे, ते कसलीही भीड न बाळगता उपलब्ध व्यासपिठावरून टीका करून समाजाला जागृत करत. वारकरी परंपरेतील विविध नियतकालिके, तसेच सनातन प्रभात यांमधून त्यांचे धर्मजागृतीपर लिखाण चालू असायचेे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला विरोध करण्यासाठी मंत्री आणि आमदार यांना आमदारांना भेटण्यासाठी ते प्रवास करून दूरच्या ठिकाणी जायचे, तसेच विधीमंडळ अधिवेशनाच्या काळात मुंबई अन् नागपूर येथे प्रत्येक वेळी जाऊन ते कायद्याला विरोध करायचे.
ते राष्ट्रीय वारकरी सेनेचे अध्यक्ष होते. गीता भागवत वारकरी सेवा मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. अखिल भारतीय संत समितीचे कार्याध्यक्ष आणि मुक्ताबाई पिठाचे पिठाधिश्वर होते.
सनातननिर्मित श्री दुर्गादेवीचे चित्र पाहून ‘ते माझे रूप आहे’, असे सांगणे !
सनातनच्या आश्रमदर्शनाच्या वेळी ध्यानमंदिरातील सनातननिर्मित श्री दुर्गादेवीचे मारक रूपातील चित्र पाहून ‘‘हे माझेच रूप आहे’’, असे ते म्हणाले. ‘सनातनच्या सात्त्विक गणेशमूर्तीविषयी सनातनने प्रबोधन केल्यानेच समाजात चांगला पालट दिसून येतो’, असेही त्यांनी सांगितले.
सनातन संस्थेविषयी ह.भ.प. (पू.) वक्ते महाराज यांनी काढलेले गौरवोद्गार !
आज धर्मप्रचार करणार्या अनेक संघटना आहेत; पण त्या केवळ प्रसंग आणि घटना यांना धरून प्रचार करतात. सनातन संस्थेला ईश्वरी अधिष्ठान आहे. त्यामुळे संस्थेचे कार्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतर सगळे केवळ प्रचारक आहेत. सनातन संस्थेचे साधक उपासक आहेत ! सनातनचा आश्रम म्हणजे ऋषिमुनींचा आश्रम आहे. प्रत्येक साधकाचे वागणे, बोलणे, सेवा करणे धर्मशास्त्राला धरून आहे.
सनातन प्रभातविषयी काढलेले गौरवोद्गार
सनातन प्रभात हे जगातील एकमेव दैनिक आहे. तेच धर्माविषयी उघडपणे कटू सत्य मांडते.
हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याशी ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते यांचा असलेला संबंध
हिंदु जनजागृती समितीच्याही सर्व कार्यांत त्यांचा सहभाग आणि मार्गदर्शन असायचे. सनातन संस्थेविषयी त्यांना विशेष आत्मीयता होती. सनातन संस्थेला असलेल्या ईश्वरी अधिष्ठानाविषयी ते सातत्याने सांगायचे. गेली १० वर्षे त्यांनी कार्तिकी एकादशीला वारकरी, तसेच इतर आध्यात्मिक हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यासह धर्मजागृतीसाठी मोठी अधिवेशने आयोजित केली. याचा व्यय ते स्वतः करायचे. सनातनवरील बंदीच्या काळात विविध आध्यात्मिक उपायही त्यांनी सांगितले होते. बंदी येऊ नये, यासाठी ते स्वतः प्रार्थनाही करायचे.