वैद्यकीय शिक्षण प्रवेशप्रक्रियेतील आरक्षण कोटा रहित करण्याच्या शासन निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या

मुंबई – वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रियेतील ७०:३० प्रमाणाचा आरक्षणाचा कोटा रहित करण्याच्या शासनाच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने फेटाळून लावल्या आहेत. न्यायमूर्ती एस्.व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस्.डी. कुलकर्णी यांच्या खंडपिठाने १८ डिसेंबर या दिवशी हा निर्णय दिला.


वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेत स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळावे, यासाठी हा आरक्षणाचा कोटा निश्‍चित करण्यात आला होता. या विरोधात बाबूराव गायकवाड, पराग चौधरी यांसह अन्य काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. राज्यशासनाने परिपत्रक काढून हे आरक्षण रहित केले असून पुढील विधीमंडळाच्या अधिवेशनात याला सभागृहाची मान्यता घेण्यात येणार आहे.