मध्यप्रदेशातील शेतकर्‍याच्या अभिनव प्रयोगाला यश !

शेतातील पीक आणि गायी यांना संगीत ऐकवल्याने उत्पन्नात वाढ !

असा प्रयोग प्रत्येक शेतकर्‍याने करण्याचा प्रयत्न करावा; मात्र तो करतांना सात्त्विक आणि भारतीय संगीत ऐकवावे. भक्तीगीते, संताची भजने लावल्यास त्याचा अधिक लाभ होईल !

नवी देहली – मध्यप्रदेशातील कपूरिया गावातील आकाश चौरसिया हे शेतकरी  शेतात भरपूर पीक यावे आणि गायीने पुष्कळ दूध द्यावे, यासाठी पिकांना आणि गायींनी संगीत ऐकवतात. पीक आणि प्राणी यांना गाणी ऐकवून ते त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. त्यामुळे चौरसिया यांना पुष्कळ प्रसिद्धी मिळत असून त्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी देशभरातून अनेक लोक येत आहेत.

१. याविषयी चौरसिया यांनी म्हटले, ‘शेती ही नैसर्गिकरित्या होते. निसर्गाचा एक नियम असतो. आपण केवळ बीज रोवतो आणि निसर्ग त्याचे वृक्ष बनवतो. या प्रक्रियेत मधमाशा, फुलपाखरू अशा छोट्या छोट्या जिवांचाही समावेश असतो. जसे माणूस तणाव दूर करण्यासाठी चित्रपट पहाणे, शांत ठिकाणी बसणे, गाणी ऐकणे पसंत करतो, तसेच झाडाझुडपांनाही तणाव दूर करण्यासाठी निसर्गाने जैवविविधता दिली; पण आता फुलपाखरू, मधमाशा फार राहिल्या नाहीत. त्यामुळे मी झाड, पिके यांच्यावरील तणाव दूर करण्यासाठी त्यांना संगीत ऐकवतो.’

२. आकाश चौरासिया जैविक पद्धतीने १६ एकर भूमीवर शेती करतात. त्यांनी शेतात एक मोठी ‘म्युझिक सिस्टम’ लावली आहे. त्याद्वारे ते पिकांना संगीत ऐकवतात. गायीचे दूध काढतांनाही ते संगीत लावातात.