भाजपने जिल्हा पंचायत निवडणुकीत निर्विवाद बहुमत प्रस्थापित केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे विधान
पणजी, १५ डिसेंबर (वार्ता.) – जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला निर्विवाद बहुमत प्राप्त झाले आहे. गोमंतकीय जनतेने भाजपला विकासासाठी मतदान केले आहे. शासन मोले येथील ‘तम्नार पॉवर ट्रान्स्मीशन लाईन’ प्रकल्प राबवणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिली. राज्यात ‘तम्नार पॉवर ट्रान्स्मीशन लाईन’ प्रकल्पासमवेतच रेल्वेमार्ग दुपदरीकरण आणि राष्ट्रीय महामार्गाचे रूंदीकरण या ३ महत्त्वाच्या प्रकल्पांवरून राज्यातील काही घटक मोठ्या प्रमाणावर विरोध करत आहेत. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या एका प्रश्नाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘गोमंतकियांनी विकास आणि स्थिरता यांसाठी भाजपला मतदान केले आहे. ग्रामीण भागातील गोमंतकीय जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. जनतेने ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘स्वयंपूर्ण गोवा’ या संकल्पना स्वीकारल्या आहेत. विरोधकांच्या भूलथापांना गोमंतकीय मतदार बळी पडलेला नाही. ‘तम्नर पॉवर ट्रान्स्मीशन लाईन’ प्रकल्पाची गोव्याला आवश्यकता आहे. प्रकल्पांना ज्या ठिकाणी विरोध होत आहे, त्या मतदारसंघांमध्ये भाजप विजयी झाला आहे. लोकांना विकास पाहिजे, याचे हे द्योतक आहे. विकासकामांना एक विशिष्ट गट विरोध करत असतो आणि हा गट प्रत्येक गोष्टींना नेहमी विरोध करत असतो.’’
गिरदोली आणि दवर्ली येथे भाजप, तर कुठ्ठाळी येथे अपक्ष विजयी; रेल्वे दुपदरीकरणविरोधी आंदोलनाला झटका
पणजी – गिरदोली आणि दवर्ली, तसेच कुठ्ठाळी या मतदारसंघांमध्ये रेल्वेमार्ग दुपदरीकरण आणि कोळसा प्रदूषण यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले आहे; मात्र गिरदोली अन् दवर्ली येथे भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत, तर कुठ्ठाळी येथे अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. यामुळे रेल्वे दुपदरीकरण आणि कोळसा प्रदूषणाच्या विरोधाच्या आंदोलनाला झटका बसल्याचे राजकीय निरिक्षकांचे मत आहे. चांदोर-गिरदोली येथे रेल्वेमार्ग दुपदरीकरण आणि कोळसा प्रदूषण यांच्या विरोधातील आंदोलनात सक्रीय असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार सोनिया फर्नांडिस यांचा भाजपच्या उमेदवार संजना वेळीप यांनी पराभव केला. तसेच कुठ्ठाळी मतदारसंघात कासावली, वेळसांव, कुठ्ठाळी आदी भागांत रेल्वेमार्ग दुपदरीकरणाच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन राबवण्यात आले. या ठिकाणीही आंदोलनात सक्रीय असलेल्या उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवार आंतोनियो वाझ हे विजयी झाले आहेत.