राष्ट्र आणि धर्मप्रेम उत्पन्न करणार्या श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारातीर्थ यात्रा
सांगली, ६ डिसेंबर (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराजांंच्या वृत्तीची तरुण पिढी निर्माण करण्यासाठी आणि तरुण पिढीला ध्येयवादी बनवण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रतिवर्षी धारातीर्थ यात्रा (गडकोट मोहीम) आयोजित केल्या जातात. प्रत्येक वर्षी नवरात्रात शेवटच्या दिवशी म्हणजे दसर्याची दिवशी पू. संभाजीराव भिडेगुरुजी मोहिमेची घोषणा करतात. यंदा कोरोनामुळे ही घोषणा तेव्हा होऊ शकली नाही. आता सर्व शिवप्रेमींची उत्सुकता संपली असून वर्ष २०२१ ची धारातीर्थ यात्रा अर्थात् मोहीम ही पन्हाळगड ते विशाळगड अशी होईल, असे पू. भिडेगुरुजी यांनी सांगलीत घोषित केले आहे. या मोहिमेचा दिनांक लवकरच घोषित करण्यात येणार आहे.
गडकोट म्हणजे शिवरायांचे सद्यस्थितीतील स्वरूप आहे. अनेक मावळे आणि क्रांतीकारक यांचे रक्त या ठिकाणी सांडले आहे. या यात्रेमुळे गत इतिहासाचे स्मरण होते. हे गडकोट शिवराय आणि त्यांचे सहकारी यांनी आपल्यासाठी एक अमूल्य ठेवा म्हणून ठेवले आहे. खडतर अशा मार्गातून दर्याखोर्यांमधून, खाचाखळण्यांमधून, उघड्यावर झोपणे, अविश्रांत चालणे, ऊन-वारा यांची तमा नाही. चार दिवस सर्व थरांमधील मराठमोळे तरुण एक येतात. त्यामुळे या मोहिमेची प्रत्येक धारकरी-शिवप्रेमी आतुरतेने वाट पहात असतात. अखेर या मोहिमेची घोषणा झाल्यामुळे धारकर्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.