पंचांग म्हणजे जणू समाजजीवनाचा एक अविभाज्य घटक !

समाजाला धर्मानुसार सण-उत्सव साजरे करायला योग्य दिवस सांगणारे आणि भारतीय पेठेवर आर्थिक दृष्टीने परिणाम करणारे पंचांग म्हणजे जणू समाजजीवनाचा एक अविभाज्य घटक !

१. मुहूर्त पहाणे

‘हिंदु समाजात दैनंदिन जीवनात कोणतेही महत्त्वाचे काम करण्याआधी काळ, वेळ आणि दिवस पाहिला जातो, मग ते व्रत किंवा उत्सव असो, घरात नुकतेच जन्मलेले मूल असो, नूतन घराची वास्तूशांत करायची असो किंवा नवीन व्यवसायाचा आरंभ करायचा असो. फार पूर्वीपासून हिंदूंमध्ये ही परंपरा आहे. पूर्वी राजे-महाराजे हेसुद्धा मोठमोठ्या मोहिमा आखतांना योग्य काळ, वेळ आणि दिवस पाहूनच मोहिमा आखत असत. या सर्वांमागे ‘त्या मोहिमा यशस्वी व्हाव्यात’, हीच एक अपेक्षा असे. यालाच ‘मुहूर्त पहाणे’, असे म्हटले जाते.

२. ‘सर्व सण आणि उत्सव कधी साजरे करायचे ?’, हे पंचांगामुळेच कळणे

सामाजिक आणि कौटुंबिक नात्यांमधील संबंध दृढ करण्यामध्ये अनेक सण-उत्सव यांचा फार मोठा सहभाग असतो. राखी पौर्णिमा हा सण भाऊ-बहीण यांच्यातील प्रेम वृद्धींगत करतो. धनत्रयोदशी हा सर्व आधुनिक वैद्य आणि आयुर्वेदीय वैद्य यांच्याविषयीचा आदर वाढवणारा सण आहे. लक्ष्मीपूजन (अमावास्या) हा दिवस व्यवसायातील मालक अन् नोकर यांचा एकमेकांविषयीचा प्रेम अन् आदर व्यक्त करण्याचा सण आहे. दिवाळीतील पाडवा हा पती-पत्नी यांचा परस्परांविषयी असलेल्या आदराचा उत्सव आहे. भाऊबीज हा बहिणीचा भावाविषयी अतूट आदर व्यक्त करण्याचा सण आहे. गणेशोत्सव हा समाजातील सर्व थरांतील लोकांनी एकत्र येऊन उत्साहाने साजरा करण्याचा उत्सव आहे. दसरा हा समाजातील सर्वांनी एकमेकांना प्रेम देऊन शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देण्याचा सण आहे. या सणांमुळे समाजातील आणि वैयक्तिक नातीगोती दृढ होतात. ‘हे सर्व सण कधी साजरे करायचे ?’, हे आपल्याला पंचांगामुळेच कळते.

२ अ. सणांच्या निमित्ताने निसर्ग आणि मनुष्योपयोगी विविध प्राणी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळणे : निसर्ग आणि त्यातील विविध प्राणी किंवा पशू इत्यादींचा मनुष्याला त्याच्या दैनंदिन जीवनात पुष्कळ उपयोग होत असतो. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी या सणांच्या निमित्ताने हिंदु धर्माने समाजाला दिली आहे. त्यांच्याविषयी मनात प्रेम आणि जिव्हाळा निर्माण होण्यासाठी काही सणांची योजना केली आहे, उदा. दिव्यांची अमावास्या या दिवशी अंधाराचा नाश करून प्रकाश देणार्‍या दिव्यांची पूजा केली जाते. नागपंचमी या सणाच्या दिवशी शेतकर्‍यांचा मित्र समजल्या जाणार्‍या नागोबाची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करतात. ‘बैल पोळ्या’च्या दिवशी आपल्यासाठी कष्ट करणार्‍या बैलांची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. वसुबारस (गोपूजन) या दिवशी आपल्याला पूर्णान्न असे अतिशय उपयुक्त दूध देणार्‍या गोमातेचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त केली जाते. या दिवशी तिला गोड पदार्थ करून खायला दिले जाते.

सौ. प्राजक्ता जोशी

३. शेतकरी शेतीची कामे आणि व्यावसायिक त्यांच्या मोठ्या उद्योगधंद्यांचा प्रारंभ पंचांगात चांगला शुभमुहूर्त पाहूनच करत असणे : शेतकरीही त्यांच्या शेतातील नांगरणी, पेरणी, कोळपणी (कोळप्याने उकरणे. कोळपे म्हणजे गवत इत्यादी उपटून काढण्याचे हत्यार; पिकाच्या दोन सरांमधील जमीन भुसभुशीत करण्याचे औत), काढणी (पिके काढणे), मळणी इत्यादी सर्व मशागतीची कामे वेळ, दिवस आणि नक्षत्र हे पंचांगावरून पावसाची नक्षत्रे पाहूनच ठरवतात. अनेक मोठे उद्योजक आणि व्यावसायिक आपला व्यवसाय किंवा उद्योग यांचा प्रारंभ पंचांगात शुभमुहूर्त पाहूनच करतात.

अशा प्रकारे ‘मनुष्य जीवनाला उपयुक्त अशा सर्वांविषयी कोणत्या दिवशी आणि कशी कृतज्ञता व्यक्त करायची ?’, हे आपल्याला केवळ पंचांगामुळे कळते.

४. भारतीय पेठेवर मोठा परिणाम साधणारे पंचांगातील तिथी, नक्षत्रे आणि मुहूर्त

४ अ. पंचांगातील या साडेतीन मुहूर्तांच्या शुभ दिवशी मोठ्या वस्तूंची विक्री वाढणे आणि या दिवशी आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात झाल्याने पेठेतील अनेक गोष्टींवर त्याचा परिणाम दिसणे : मुहूर्त हे पंचांगातील तिथी, वार आणि नक्षत्र यांमुळे मिळत असल्याने आजही समाजजीवनात पंचांगाचे पुष्कळ महत्त्व आहे. पंचांगात साडेतीन मुहूर्त सांगितले आहेत. गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा हे पूर्ण मुहूर्त असून दिवाळीचा पाडवा हा अर्धा मुहूर्त गणला जातो. या अत्यंत शुभ दिवशी विविध वस्तूंच्या खरेदी-विक्रीत पुष्कळ वाढ होते. दुकानदारही अशा सणांच्या दिवशी मोठी विज्ञापने प्रसारित करून मोठ्या वस्तू या शुभमुहूर्तावर घेण्याचे आवाहन ग्राहकांना करतात. पंचांगातील या साडेतीन मुहूर्तांच्या शुभ दिवशी विक्री वाढते. त्यामुळे व्यापारीवर्गात उत्साह निर्माण होतो. या दिवशी आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात झाल्याने पेठेतील अनेक गोष्टींवर त्याचा परिणाम दिसतो.

४ आ. विविध ठिकाणच्या देवतांच्या जत्रा आणि उत्सव यांमुळे त्या त्या ठिकाणी पेठांतील उलाढाल वाढणे अन् पर्यटनाला चालना मिळणे : अनेक गावांतील विविध देवतांच्या जत्रा किंवा उत्सव तिथीशी संबंधित आहेत. या यात्रा, जत्रा किंवा उत्सव यांमुळेही व्यापार वाढतो. या यात्रांमुळे अनेक ठिकाणच्या पर्यटनालाही चालना मिळते. याचा अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनाही लाभ होतो, विविध वस्तूंची देवाण-घेवाण होते, संस्कृतीचे संवर्धन होते. याची बोलकी उदाहरणे म्हणजे पंढरपूरची आषाढी अन् कार्तिकी वारी किंवा जेजुरीच्या खंडोबाची यात्रा इत्यादी. या यात्रा किंवा सण यांमुळे फुले, नारळ इत्यादी पूजासाहित्य विकणार्‍या आणि त्यावर अवलंबून असणार्‍या सर्वच लोकांचीही उपजीविका होते. ही दिसण्यास लहान गोष्ट असली, तरी सहस्रो लोकांना सण आणि व्रत यांमुळे पुष्कळ लाभ होतो. या अर्थाने त्यांचे जीवन घडवण्यात पंचांगाचा फार मोठा हातभार लागतोे.

४ इ. गुरु आणि शुक्र यांचे अस्त असतांना मुहूर्त नसल्यामुळे पेठेत मंदी असणे अन् मुहूर्त असतांना तेजीचे वातावरण अनुभवता येणे : गुरु आणि शुक्र यांचे अस्त असतांना मुहूर्त नसल्यामुळे सोने, कापड, केटरर्स, मंगल कार्यालये इत्यादी सर्वच लहान-मोठ्या व्यवसायात मंदी दिसून येते; कारण या काळात लग्न, मुंज इत्यादी कार्ये होत नाहीत. याउलट जेव्हा हे अस्त नसतात, तेव्हा अधिक मंगल कार्ये होतात. त्यामुळे वरील सर्व व्यवसायांत तेजी दिसून येते. सगळीकडे समाजातील सर्व थरांतील लोकांची गर्दी झालेली पाहायला मिळते. सर्व लहान-मोठे व्यावसायिकही उत्साही आणि आनंदी होतांना दिसतात. तसाच काहीसा प्रकार गुरुपुष्यामृत इत्यादी योगांच्या वेळी पहायला मिळतो. एक प्रकारे आपल्या देशाची अर्थव्यवस्था सण, उत्सव आणि व्रत यांच्या भोवतीच फिरतांना दिसते.

५. अनेक सणांसाठी समाजातील सर्वच जाती आणि पंथ पंचांगावर अवलंबून असणे

केवळ हिंदु धर्मियांचे सण आणि उत्सव यांपुरतीच पंचांगाची व्याप्ती राहिलेली नाही. खगोलीय गणिताच्या सहाय्याने साजरे होणारे विविध धर्मियांचे सण आणि उत्सव हेही पंचांगावरूनच समजतात, उदा. ‘गुड फ्रायडे’, ‘ईद’, ‘पारशी नववर्षारंभ’ इत्यादी. अशा अनेक सणांसाठी समाजातील सर्वच जाती आणि पंथ पंचांगावर अवलंबून आहेत. आपल्या पंचांगात ख्रिस्ती, मुसलमान, पारशी इत्यादींच्या सणांचाही उल्लेख असतो.

६. दिनांक, वार आणि इंग्रजी वर्षाचा मास यांसमवेत पंचांगाचा समावेश असलेल्या दिनदर्शिकांचा सर्वांना उपयोग होणे अन् पंचांगाचा समावेश असलेल्या दिनदर्शिका सर्वांच्याच घरी भिंतीवर विराजमान झालेल्या दिसणे

सकाळी उठल्यापासून ते कोणतेही धार्मिक कर्म करण्यासाठी तिथी, वार, नक्षत्र यांचा उच्चार आणि उल्लेख करण्यासाठी पंचांग हवेच. प्रतिदिन चांगला-वाईट, शुभ-अशुभ दिवस पहाण्यासाठी पंचांग हवेच. आज पेठेत पंचांगाच्या समवेतच दिनदर्शिका उपलब्ध आहेत. त्या दिनर्शिकेवर केवळ दिनांक, वार आणि इंग्रजी वर्षाचा मास एवढेच असेल, तर सर्वसामान्यांच्या दैनंदिन कामात त्याचा फारसा उपयोग होत नाही; मात्र जर त्यामध्ये तिथी, वार, विविध सण, व्रते, नक्षत्र, शुभाशुभ दिवस हे सर्व दिले असेल, तर त्याचा सर्वांनाच पुष्कळ उपयोग होतो. आता अशा दिनदर्शिका निघत असल्यामुळे त्या सर्वांच्याच घरी भिंतीवर विराजमान झालेल्या दिसतात. या दिनदर्शिकांचा गाभा हा पंचांगांचाच असतो.

७. पंचांग खगोलीय गणितावर आधारित असल्यामुळे खगोलीय अभ्यासकांना पंचांग मार्गदर्शक ठरणे

पंचांग हे धर्म, श्रद्धा आणि भक्ती यांसमवेत आकाशातील ग्रह-गोलांच्या खगोलीय गणितावरही आधारित आहे. त्यामुळे खगोलप्रेमी, आकाशाचे निरीक्षण करणारे आणि विद्यार्थी यांनाही पंचांग मार्गदर्शक ठरते. अशा प्रकारे पंचांगाचा समाजाच्या जडणघडणीत फार मोठा सहभाग आहे.’

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्‍लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, फोंडा, गोवा. (२.१.२०२०)