संस्कृत हीच संस्कृती !

दोन दिवसांपूर्वी बिहार येथील विधानसभेत काँग्रेसचे आमदार शकील अहमद खान यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली. त्या वेळी खान यांनी सांगितले, ‘‘संस्कृत ही भारताची आत्मभाषा आहे. ही सभ्यता आणि संस्कृती यांची भाषा आहे.’’ एका मुसलमान आमदाराने संस्कृतमध्ये शपथ घेऊन तिचा महिमा वर्णन करणे, हे निश्‍चितच आश्‍चर्यकारक आहे. असाच भाग न्यूझीलंड येथे पहाण्यास मिळाला. तेथील भारतीय वंशाचे खासदार शर्मा यांनीही संस्कृतमध्ये शपथ घेतली, तर अमेरिकेत जो बायडेन यांच्या निवडणुकीतील विजयानंतरच्या कार्यक्रमाचा प्रारंभ वेदमंत्रांनी करण्यात आला.

काँग्रेसचे आमदार शकील अहमद खान

भारतात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आल्यावर ओडिशा येथील नवनिर्वाचित खासदाराने संस्कृत भाषेत शपथ घेतली होती. संस्कृतविषयी प्रेम केवळ भारतातच नसून ते सातासमुद्रापार गेले आहे, तसेच विविध जाती-धर्माच्या लोकांनाही ते भावत आहे, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जिला ‘मृतभाषा’ म्हणून अव्हेरले, तीच भाषा आता तिच्यातील दैवी आणि स्वयंसिद्ध चैतन्याने लोकांच्या मनावर राज्य करत आहे. लोकांना तिच्यातील माधुर्याची, नवनवोन्मेषणेची भुरळ घालत आहे. जेव्हा जर्मनी, इंग्लड, तसेच अन्य विदेशी मुले आणि महिला संस्कृतमध्ये अगदी अस्खलित संभाषण करतात, तेव्हा तो भल्याभल्यांसाठी कौतुकाचा आणि आश्‍चर्याचा विषय होतो. एवढे चांगले संस्कृत ते कसे बोलू शकतात ? याचे लोकांना अप्रूप वाटते; मात्र त्यांच्याकडून कारण जाणून घेतल्यावर कळते की, त्यांनी संस्कृत केवळ भाषाच अंगीकारलेली नाही, तर हिंदु संस्कृतीही स्वीकारलेली आहे. साडी नेसणे, अन्य हिंदु पेहराव करणे, डोक्याला कुंकू लावणे, हिंदु स्त्रीप्रमाणे केशरचना करणे, हिंदूंची सभ्यता जोपासणे असेही प्रयत्न चालू केले आहेत. संस्कृत भाषा शिकण्याचा त्यांनी ध्यास घेतला आणि ती भाषा तिच्यातील चैतन्यासह, मूल्यांसह आत्मसात केली आहे. परिणामी त्यांच्या जीवन जगण्याच्या दृष्टीतही पालट झाल्याचे लक्षात येते.

संस्कृतचा अभ्यास

काही रुग्णालयांमध्ये उपचारासाठी गायत्री आणि अन्य संस्कृत मंत्र रुग्णांना ऐकवले जात आहेत. त्याचा अभ्यासही केला जातो. या उपचारांचा रुग्णांवर चांगला परिणाम होत असल्याचे लक्षात आले. संस्कृतचे मंत्र म्हटल्याने व्यक्तीच्या उच्चारांमध्येही सुधारणा होत असल्याचे निरीक्षण आहे. जगात जर कोणत्याही भाषेत अपशब्द नसतील, तर संस्कृत भाषेकडे बोट करावे लागले. ‘मूर्ख’ या पलीकडे संस्कृतमध्ये शब्द नाही, अन्यथा अन्य प्रत्येक शब्दाला शेकडो समानार्थी शब्द आहेत.

जर्मनीत संस्कृतचे शिक्षण देणारी १४ विश्‍वविद्यालये आहेत, तर आपल्याकडे एकही विश्‍वविद्यालय नाही. ‘नासा’मध्ये वेद-उपनिषदांमधील संस्कृत श्‍लोकांचा संदर्भ घेऊन संशोधन चालू आहे. अशा प्रकारे संस्कृतचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कालमहिम्यानुसार आजवर जे सत्य, सनातन दाबले गेले होते, ते पुन्हा वर येत आहे. एकेकाळी जगावर इंग्रजी भाषेचा बोलबाला होता. इंग्रजी येणे म्हणजे मोठेपणाचे आणि मानाचे लक्षण समजले जात असे. त्याच इंग्रजी बोलणार्‍यांच्या देशात चांगल्या कार्यक्रमांचा प्रारंभ संस्कृत भाषेतून होत आहे आणि ती पाश्‍चात्त्य भाषांना वरचढ ठरत आहे. ‘भाषा मरता, देश आणि संस्कृतीही मरते, तर भाषा जगता देश आणि संस्कृती यांना ऊर्जितावस्था येते’, असे म्हटले जाते. जगभरात संस्कृतचे केले जाणारे गुणगान ही आगामी हिंदु राष्ट्राची नांदीच ठरणार आहे, यात शंकाच नाही.