वडिलांना झालेल्या त्रासांच्या कालावधीत स्वतःच्या देहावरील त्रासदायक आवरण काढण्याच्या संदर्भात साधकाला शिकायला मिळालेली सूत्रे

वडील श्री. सुधाकर पाध्ये यांना झालेल्या त्रासांच्या कालावधीत देहावरील त्रासदायक आवरण काढण्याच्या संदर्भात साधकाला शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. सुधाकर पाध्ये

१. श्री. सुधाकर पाध्ये यांना झालेले त्रास

‘प्रामुख्याने सायंकाळनंतर माझ्या वडिलांना श्‍वास घ्यायला त्रास व्हायचा आणि पूर्ण श्‍वास कोंडल्यासारखे व्हायचे. तेव्हा त्यांना पुष्कळ भीती वाटायची. रात्री त्यांचे पाय पुष्कळ दुखायचे आणि श्‍वास घेता न आल्यामुळे उशिरापर्यंत झोप लागत नव्हती. पोटात गॅस होऊन त्यांना शौचाला होत नव्हते. वडील पुष्कळ चिडचिड करायचे, कधी कधी रडायचे आणि असंबद्ध बोलायचे. डिसेंबर २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत या त्रासांचे प्रमाण पुष्कळ वाढले. तेव्हा ते मला त्यांच्यापासून थोडेही लांब जाऊ देत नव्हते.

श्री. नीलेश पाध्ये

२. सर्व वैद्यकीय तपासण्या करूनही काहीही न आढळणे

आधुनिक वैद्यांच्या सांगण्यावरून हृदय, रक्त, लघवी, प्रोस्टेट आणि उदर यांची तपासणी करून घेतली, तरी वैद्यकीय अहवालामध्ये काहीही आढळले नाही.

३. नामजपादी उपाय केल्यावर झोप लागणे

सद्गुरु गाडगीळकाका आणि पू. गडकरीकाका यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर त्यांना शांत झोप लागत होती.

४. संतांची अनुभवलेली प्रीती

४ अ. रात्री उशिरा संपर्क केला, तरी प्रत्येक वेळी अतिशय प्रेमाने उपाय सांगणे : सद्गुरु गाडगीळकाका आणि पू. गडकरीकाका यांना सारखे दूरभाष करावे लागत होते. पुष्कळ वेळा त्यांना रात्री उशिराही संपर्क करावा लागत होता, तरीही ते प्रत्येक वेळी अतिशय प्रेमाने सर्व उपाय सांगत होते.

४ आ. ‘वडिलांना तात्काळ आराम मिळावा’, यासाठी सद्गुरु गाडगीळकाकांनी मार्गदर्शन करणे : बाबांना तात्काळ आराम मिळावा; म्हणून सद्गुरु गाडगीळकाका यांनी मला ‘देहावरील त्रासदायक आवरण कसे काढायचे ? जप कसा शोधायचा ?’, याविषयी मार्गदर्शन केले होते. या संदर्भात मला काही अडचण आली किंवा ‘मिळालेले उत्तर योग्य आहे का ?’, हे विचारण्यासाठी त्यांना दूरभाष केल्यावर ते प्रत्येक वेळी पुष्कळ शांतपणे आणि प्रेमाने सर्व समजावून सांगायचे.

५. आधुनिक आणि आयुर्वेदीय वैद्यांचा प्रेमभाव !

आधुनिक वैद्य पांडुरंग मराठेकाका यांना मी रात्री-अपरात्री संपर्क करत होतो, तरी ते प्रत्येक वेळी प्रेमाने औषधे किंवा ‘योग्य काय ?’, ते सांगत असत. प्रारंभी फोंडा येथील आयुर्वेदीय वैद्य पानसे यांची औषधे चालू होती. रात्री-अपरात्री संपर्क केल्यावर तेही सहकार्य करायचे.

६. सद्गुरु गाडगीळकाका यांच्याकडून त्रासदायक आवरण काढण्याच्या संदर्भात शिकायला मिळालेली सूत्रे 

अ. आधी स्वतःवरील आवरण काढणे आवश्यक आहे; कारण स्वतःवरील आवरण न काढता जप केला, तर तो जप आपल्या आत जात नाही.

आ. आवरण शोधतांना हाताची सर्व बोटे एकत्र करून ती मूलाधारचक्रापासून वर आज्ञाचक्राच्या मागच्या बाजूपर्यंत न्यावीत. तेव्हा हात शरिराच्या अगदी जवळून न्यावा, म्हणजे आवरण ज्या ठिकाणी असेल, त्या ठिकाणी आपला हात जड होतो किंवा बाहेर ढकलला जातो, तेव्हा ‘तिथे आवरण आले आहे’, असे लक्षात येते.

इ. दोन्ही हातांत खडेमीठ घेऊन त्याने आवरण काढावे आणि नंतर ते मीठ शौचालयात टाकून द्यावे.

ई. थोड्या थोड्या वेळाने अनिष्ट शक्तींची स्थाने शोधावीत आणि त्या स्थानांवरील आवरण काढून उपाय करावेत.

७. आवरण आल्यावर वडिलांना काही न सुचणे, त्यांनी चिडचिड करणे, सद्गुरु गाडगीळकाकांनी स्वतःवरील आवरण काढून ‘वडिलांवरील आवरण न्यून होऊ दे’, अशी प्रार्थना करण्यास सांगणे आणि तसे केल्यावर वडील शांत होणे

आवरण आल्यावर माझ्या वडिलांना काही सुचत नसे. ते सारखे रडायचे आणि उपाय न करता चिडचिड करायचे. त्या वेळी त्यांच्या काळजीपोटी माझीही चिडचिड व्हायची; परंतु माझ्या चिडण्याने त्यांच्यावर काहीच परिणाम व्हायचा नाही. तेव्हा सद्गुरु गाडगीळकाकांनी मला सांगितले, ‘‘त्या वेळी आपण स्वतःवरील आवरण काढायचे आणि प्रार्थना करायची, ‘वडिलांवरील आवरण न्यून होऊ दे.’’ तसे केल्यावर वडिलांवर उपाय होऊन ते शांत व्हायचे.

काही प्रसंग घडतात, तेव्हा त्यात आपल्यावरील आवरणाचाही मोठा वाटा असू शकतो; म्हणून ‘आपण आपल्यावरील आवरण काढल्यावर त्याचा परिणाम सभोवतालच्या व्यक्ती आणि वस्तू यांवरही होत असतो’, हे शिकायला मिळाले.

८. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे सद्गुरु गाडगीळकाका, पू. गडकरीकाका आणि डॉ. मराठेकाका यांनी माझ्या वडिलांना त्रासातून वाचवून आमच्या सर्वांची काळजी घेतली’, त्याविषयी कृतज्ञता ! परात्पर गुरु डॉक्टर, ‘ही शिकायला मिळालेली सूत्रे आपल्या चरणी अर्पण करण्याचा एक प्रयत्न आपणच करवून घेतला, तो आपणच आपल्या चरणी अर्पण करवून घ्यावा’, हीच आपल्या चरणी प्रार्थना !’

– श्री. नीलेश पाध्ये, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.६.२०२०)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक