हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याकडून गोव्यात नवरात्रीच्या कालावधीत ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन

जिज्ञासूंचा नामजपाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभणे आणि त्यांना अनुभूती येऊन देवीवरील श्रद्धा वाढणे !

फोंडा (गोवा) – हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने गोव्यात नवरात्रीच्या कालावधीत ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन करण्यात आले होते. या दिवसांत प्रतिदिन सकाळी ७ ते ७.३० अर्धा घंटा ‘श्री दुर्गादैव्ये नमः’ असा सामूहिक नामजप करण्यात आला. समाजातील जिज्ञासू, धर्मप्रेमी, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वाचक आणि विज्ञापनदाते इत्यादी मिळून एकूण १२५ जणांनी या नामजप सत्संगाचा लाभ घेतला. हिंदु जनजागृती समितीच्या मडगाव येथील कार्यकर्त्या सौ. आर्या गावकर आणि सौ. रोहिणी जामदार यांनी हा नामजप सत्संग घेतला. सत्संगाच्या प्रारंभी सामूहिक प्रार्थना, कृतज्ञता आणि भावप्रयोग घेण्यात आला, तसेच या वेळी ‘नवरात्र’ उत्सवाविषयी माहितीही सांगण्यात आली.

।। श्री दुर्गादैव्ये नमः ।।

पन्हाळ, प्रियोळ, फोंडा येथील सौ. स्मिता गुरव यांनी त्यांच्या दोन्ही जाऊबाईंना नामजपाचे महत्त्व सांगितले. त्याही त्यांच्यासमवेत प्रतिदिन नामजपाला बसल्या. करमळे, केरी, फोंडा येथील सौ. जयश्री गावडे यांनी त्यांच्या यजमानांना नामजपाचे महत्त्व सांगितले. तेही नियमित ९ दिवस त्यांच्यासमवेत नामजपाला बसले.

नामजप सत्संगाविषयी जिज्ञासूंना आलेल्या अनुभूती आणि त्यांचे अभिप्राय !

सौ. प्रीती करमळकर, करमळे, केरी – नामजप करतांना चांगले वाटत होते. नकारात्मकता अल्प होऊन हलके वाटले.

श्रीमती रोशन सावंत, कुर्टी, फोंडा – नामजप करतांना साक्षात् देवीच्या मंदिरात बसून नामजप करत आहे, असे जाणवले आणि पुष्कळ प्रसन्न वाटले.

सौ. जयश्री गावडे, करमळे, केरी – या दिवसांमध्ये देवीची शक्ती कार्यरत असून ती ग्रहण होत आहे, अशी अनुभूती आम्हाला आली. त्याविषयी देवीच्या चरणी कृतज्ञता !

सौ. सुगंधा गावडे, करमळे, केरी – नामजपाच्या वेळी देवीचे अस्तित्व जाणवत होते. नामजपाची ओढ लागल्याने कधी ७ वाजतात आणि नामजपाला बसतो, अशी ओढ लागत होती.

शर्मिला पाणी, कुर्टी, फोंडा – नामजप करतांना प्रसन्न वाटत होते. वैयक्तिक नामजपापेक्षा सामूहिक नामजप करतांना अधिक शक्ती मिळते, हे अनुभवले.

श्रीमती नयना नाईक, कुर्टी, फोंडा – नामजपाच्या वेळी देवीचे अस्तित्व अनुभवता आले आणि मन पुष्कळ प्रसन्न झाले. याविषयी कृतज्ञता !

सौ. कालिंदी फडते आणि सौ. कविता फडते, बेतकी, फोंडा – नामजप सत्संगात नामजप केल्यानंतर त्याची गोडी लागली. ‘इंटरनेट’च्या अडचणी आल्यावर सत्संग ऐकू आला नाही, तरी माझा नामजप चालू राहिला. आता येता-जातापण नामजप होतो.

सौ. गीता मोहनदास नाईक, पर्वरी – श्री दुर्गादेवीचा नामजप करतांना पुष्कळ उत्साह वाटत होता. घरातील वातावरण चैतन्यमय झाले. दुसर्‍या दिवशी नामजप करतांना दुर्गादेवी शस्त्रांसहित दिसली. मनाला पुष्कळ बरे वाटले.

सौ. सुधा प्रभुदेसाई, मडगाव आणि सौ. मेधा कांदोळकर, चिंबल, पणजी – नामजप करतांना पुष्कळ बरे वाटले, मन एकाग्र झाले आणि शक्ती जाणवली.

गीता नाईक, चिंबल, पणजी – नामजप करतांना पुष्कळ बरे वाटले. घरातील वातावरण चांगले झाले. मन एकाग्र झाले.

सौ. नूतन नागवेकर, पर्वरी – नामजप करतांना पुष्कळ सात्त्विकता आणि शक्ती जाणवत होती. घरातील सर्वजण एकत्रित बसून नामजप करत असल्याने चांगले वाटत होते.

काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

नामजप सत्संगानंतर मनातील तणावाचे आणि  चिंतेचे विचार अल्प होऊन देवीवरील श्रद्धा वाढणे !

मला कोरोना आणि न्युमोनिया झाल्याने मी रुग्णालयात होतो. त्या दिवसांत मला त्रास होत असल्याने मी आमची ग्रामदेवी श्री मंदोदरीदेवीला आळवत होतो. त्यानंतर रुग्णालयातून घरी आल्यावरही बराच त्रास होत होता. मनावरचा ताण पुष्कळ वाढला होता. अशा वेळी सनातनच्या साधिका सौ. संपदा कामत यांनी ‘नामजप सत्संग चालू होणार’, असे सांगितले. नामजप सत्संगाच्या पहिल्या दिवशी नामजप करतांना देवी मंदोदरीचे दर्शन झाले. त्यानंतर मनातील तणावाचे आणि चिंतेचे विचार अल्प होऊन नामजप एकाग्रतेने होऊ लागला अन् देवीवरची श्रद्धा वाढली.

– श्री. प्रसाद फडते, गावकर वाडा, बेतकी, फोंडा

नामजप सत्संग मिळावा म्हणून घरातील नित्य प्रार्थनेची वेळ पालटणे आणि नामजपाने मनाला शांती लाभून घरातील वातावरण पुष्कळ चैतन्यमय होणे !

माझी भावजय सौ. संपदा सागर कामत हिने मला नामजप ऐकण्यास प्रोत्साहन दिले. ‘श्री दुर्गादैव्ये नमः’ या नामजपाची लिंक तिने मला पाठवली. खरे म्हणजे सकाळी ६.४५ ते ७.३० आमच्या घरी देवासमोर आमची नित्य प्रार्थना चालते; पण मनात आले की, संपदाच्या माध्यमातून देवीनेच हा नामजप करण्यास सांगितला नसेल ना ? या भावनेने मी आमच्या नित्य प्रार्थनेची वेळ पालटली. पहिल्या दिवशी बरोबर सकाळी ६.४५ ला मी नामजप सत्संगासाठी भ्रमणभाषवरून उपस्थिती लावली. देवघरात बसून मी जेव्हा भ्रमणभाषवरील श्री दुर्गादेवीची अष्टभूजा मूर्ती पाहिली, तेव्हा मनात देवीविषयी भाव निर्माण झाला. नंतर मी नामजप करण्यास प्रारंभ केला. देवीच्या नामजपाने घरातील वातावरण मंगलमय झाल्यासारखे वाटत होते. मला शांतता आणि समाधान वाटत होते. अर्धा घंटा नामजप कधी संपला, हे कळलेच नाही. अशा प्रकारे पुढील प्रत्येक दिवशी असाच अनुभव आला. प्रत्येक दिवशी नामजपाला बसायची हुरहुर मनाला लागायची. नामजपाने मनाला शांती लाभली. घरातील वातावरण पुष्कळ चैतन्यमय झाले. देवीची अशीच आमच्यावर सदैव कृपा राहू दे. आपण हा नामजप आमच्यापर्यंत पोचवल्याविषयी धन्यवाद !

– सौ. सुमन रामनाथ शेट वेरेकर, निवृत्त मुख्याध्यापिका, कासावली

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक