राम तुळस आणि कृष्ण तुळस यांच्या रोपांवर धार्मिक संस्कार केल्याचा त्यांच्यावर झालेला सकारात्मक परिणाम

विविध धार्मिक कृतींसंबंधी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

२६.११.२०२० या दिवशी ‘तुळशीविवाहा’ला प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने…

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी !

‘सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या (टीप) माध्यमातून मार्गदर्शन करणार्‍या महर्षींनी राम तुळस आणि कृष्ण तुळस यांची रोपे एकत्रिपणे रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाच्या परिसरात लावायला सांगितली होती. ती रोपे भूमीत लावण्यापूर्वी त्यांवर तीन धार्मिक संस्कार करण्यात आले. ते संस्कार करण्यापूर्वी आणि केल्यानंतर त्याचा तुळशीच्या रोपांवर होणारा परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाच्या साहाय्याने गोव्यातील सनातन आश्रमात चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

कृष्ण तुळस आणि राम तुळस

टीप : शिव-पार्वती यांच्यात अखिल मानवजातीच्या संदर्भात झालेला संवाद सप्तर्षींंनी ऐकला. त्यांनी तो मानवजातीच्या कल्याणासाठी आणि जिवांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी लिहून ठेवला. हेच ते नाडीभविष्य ! सहस्रो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले हे एक प्रगल्भ ज्योतिषशास्त्र आहे. नाडीभविष्याचे कौशिक, अगस्ति, भृगु आदी ऋषींनी लिहिलेले जे अनेक ग्रंथ आहेत, त्यांपैकीच ‘सप्तर्षि जीवनाडी’ हा एक ग्रंथ आहे. या ग्रंथाचे तमिळनाडू येथील पू. डॉ. ॐ उलगनाथन् वाचन करतात.

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर
वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

१. राम तुळस आणि कृष्ण तुळस यांची रोपे आश्रमाच्या परिसरात एकत्रित लावण्यामागील पार्श्‍वभूमी

आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत
आधुनिक वैद्या सौ. नंदिनी सामंत

तमिळनाडू येथील पू. डॉ. ॐ उलगनाथन् सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या वाचनाद्वारे महर्षींनी केलेले मार्गदर्शन साधकांना सांगतात. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये रामतत्त्व आहे, तसेच कृष्णतत्त्वही आहे’, असे महर्षींनी सांगितले आहे. ‘राम आणि कृष्ण या दोन्ही तत्त्वांचा सनातनच्या साधकांना लाभ मिळावा, तसेच श्रीकृष्ण अन् श्रीराम या दोन्ही अवतारांचा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला आशीर्वाद लाभावा’, यासाठी महर्षींनी राम तुळस आणि कृष्ण तुळस यांची रोपे विधीवत कुंडीत लावण्यास सांगितली होती. ‘धर्मसंस्थापनेसाठी कृष्ण तुळस आणि त्यानंतर रामराज्य येण्यासाठी राम तुळस लावण्यास सांगितली आहे’, असाही महर्षींचा त्यामागचा हेतू आहे.

२. राम तुळस अन् कृष्ण तुळस यांच्या रोपांवर करण्यात आलेले धार्मिक संस्कार

२ अ. तुळशीच्या रोपांवर केलेला पहिला धार्मिक संस्कार : सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार्‍या महर्षींच्या आज्ञेनुसार १६.५.२०१७ या दिवशी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सकाळी ९.४७ वाजता राम तुळस आणि कृष्ण तुळस यांच्या रोपांना स्पर्श केला. त्या वेळी सनातनच्या साधक-पुरोहित पाठशाळेचे वेदमूर्ती केतन शहाणेगुरुजी यांनी मंत्रपठण केले.

२ आ. तुळशीच्या रोपांवर केलेला दुसरा धार्मिक संस्कार : दुपारी १२.०५ वाजता श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी राम तुळशीचे रोप आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कृष्ण तुळशीचे रोप यांचे एकाच कुंडीत विधीवत रोपण केले. त्या वेळीही वेदमूर्ती केतन शहाणेगुरुजी यांनी मंत्रपठण केले. रोपांचे कुंडीत रोपण करण्यापूर्वी कुंडीतील मातीमध्ये पंचगव्य, पंचामृत, स्कंद क्षेत्रातील विभूती आणि धूप घालण्यात आला होता.

२ इ. तुळशीच्या रोपांवर केलेला तिसरा धार्मिक संस्कार : २७.५.२०१७ या दिवसापासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रतिदिन सकाळी स्नान केल्यानंतर रोपांना पाणी घालून प्रदक्षिणा घालायला प्रारंभ केला.

३. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत राम तुळस अन् कृष्ण तुळस यांच्या रोपांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्पर्श करण्यापूर्वी, स्पर्श केल्यावर, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कुंडीत लावल्यानंतर आणि त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी रोपांना पाणी घालून प्रदक्षिणा घातल्यावर ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. राम तुळस अन् कृष्ण तुळस यांच्या रोपांवर झालेला परिणाम पुढे दिला आहे.

३ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन :

राम तुळस आणि कृष्ण तुळस यांच्या एकत्रित रोपांमधील सकारात्मक ऊर्जा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्पर्श केल्यानंतर वाढणे, कुंडीत लावल्यानंतर त्यात पुष्कळ वृद्धी होणे अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी रोपांना पाणी घालून प्रदक्षिणा घातल्यानंतर त्यात सर्वाधिक वृद्धी होणे : हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

टीप १ : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तुळशीच्या रोपांना स्पर्श करण्यापूर्वी रोपांमध्ये अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती; पण तिची प्रभावळ नव्हती. ‘ऑरा स्कॅनर’ने तिच्या संदर्भात ४५ अंशाचा कोन केला. ‘ऑरा स्कॅनर’ने १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते.

टीप २ : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तुळशीच्या रोपांना स्पर्श केल्यानंतर रोपांच्या सकारात्मक ऊर्जेत थोडी वाढ झाली; पण तिची प्रभावळ नव्हती. ‘ऑरा स्कॅनर’ने तिच्या संदर्भात १४५ अंशाचा कोन केला.

४. निष्कर्ष

राम तुळस आणि कृष्ण तुळस यांच्या रोपांवर धार्मिक संस्कार केल्याचा त्यांच्यावर पुष्कळ सकारात्मक परिणाम झाला.

५. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

५ अ. राम तुळस आणि कृष्ण तुळस यांच्या रोपांमध्ये धार्मिक संस्कार करण्यापूर्वी आणि नंतर सकारात्मक स्पंदने असण्यामागील अध्यात्मशास्त्र

५ अ १. तुळशीच्या रोपांवर धार्मिक संस्कार होण्यापूर्वीही त्यांत सकारात्मक स्पंदने असणे : राम तुळस आणि कृष्ण तुळस यांमध्ये अनुक्रमे राम आणि कृष्ण ही तत्त्वे असल्याने त्यांत मुळातच सकारात्मक स्पंदने असतात.

५ अ २. पहिल्या धार्मिक संस्कारामुळे तुळशीच्या रोपांची सात्त्विकता वाढल्याने त्यांतील सकारात्मक स्पंदने वाढणे : मंत्रपठणामुळे रोपांमधील राम आणि कृष्ण ही तत्त्वे कार्यरत झाल्याने त्यांतील सकारात्मक स्पंदने वाढली. या रोपांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्पर्श केल्यामुळे त्यांच्यातील सात्त्विकतेने रोपे भारित झाली. त्यामुळे रोपांतील सकारात्मक स्पंदने अधिकच वाढली.

५ अ ३. दुसरा धार्मिक संस्कार झाल्यावर तुळशींतील सकारात्मक स्पंदने पुष्कळ वाढणे : कुंडीत तुळशीची रोपे लावण्याआधी कुंडीतील मातीमध्ये पंचगव्य, पंचामृत, स्कंद क्षेत्रातील विभूती आणि धूप घालण्यात आले होता. त्यामुळे रोपांतील सकारात्मक स्पंदनांमध्ये वृद्धी झाली. त्यानंतर मंत्रांच्या घोषात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कुंडीत रोपे लावली. मंत्रपठणामुळे रोपांमधील सकारात्मक स्पंदने अधिकच वाढली. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या स्पर्शामुळे त्यांच्यातील सात्त्विकतेने रोपे भारित झाल्याने रोपांतील सकारात्मक स्पंदनांमध्ये अधिकच भर पडली. अशा प्रकारे कुंडीत लावल्यानंतर रोपांमध्ये पुष्कळ सकारात्मक स्पंदने दिसून आली.

५ अ ४. तिसरा धार्मिक संस्कार झाल्यावर तुळशींतील सकारात्मक स्पंदने सर्वाधिक वाढणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी रोपांना पाणी घालून प्रदक्षिणा घातल्यानंतर त्या रोपांचे कार्य जोमाने चालू झाले. त्यामुळे रोपांमध्ये सर्वाधिक सकारात्मक स्पंदने दिसून आली.

या चाचणीतून सनातन हिंदु धर्मात सांगितलेल्या विविध धार्मिक कृतींचे महत्त्व लक्षात येते, तसेच हे जाणणार्‍या, त्याचा अखिल मानवजातीला लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने सहस्रो वर्षांपूर्वीच परिपूर्ण नियोजन करणार्‍या आणि आपल्या संकल्पशक्तीद्वारे या घोर कलियुगातही भाविकांना त्याची अनुभूती देणार्‍या सर्वज्ञ अन् करुणाकर महर्षींचा आध्यात्मिक अधिकार स्पष्ट होतो. प्राचीन काळीच नव्हे, तर आजही विश्‍वकल्याणासाठी अविरत कार्यरत असलेल्या ऋषींच्या चरणी शरणागतभावाने कोटी कोटी कृतज्ञ आहोत !’

– आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२२.५.२०१७)

ई-मेल : [email protected]

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक