‘‘साधक-फूल’ मला प्रिय’’, असे परम पूज्य (टीप १) तुम्ही का हो म्हणता ।

साधकांचे जीवन आनंदी करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणतात, ‘‘मला सर्व फुलांमध्ये ‘साधक-फूल’ अधिक प्रिय आहे.’’ भाववृद्धी सत्संगात हा विषय घेण्यात आला. सनातनचे साधक त्यांचे प्रयत्न आणि अनुभूती सांगत होते. त्या वेळी ‘साधक-फुलां’चा भावसुगंध दरवळला आणि माझी भावजागृती झाली. इंग्रजी भाषेत ‘फूल’ शब्दाचा अर्थ ‘मूर्ख’ असा आहे. त्याप्रमाणे माझा पूर्वेतिहास पाहिला, तर मी अध्यात्मातील मूर्ख होतो, म्हणजे मला काहीच येत नव्हते; मात्र परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्याकडून ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ करवून घेऊन सनातनच्या बागेतील त्यांचे आवडते ‘साधक-फूल’ केले आहे. याविषयीचे कृतज्ञतारूपी पुष्प साक्षात् विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी वहात आहे.  

पू. शिवाजी वटकर

‘‘साधक-फूल’ मला प्रिय’’, असे परम पूज्य (टीप १) तुम्ही का हो म्हणता ।
काटेरी झुडपावर वाढलेले मजसम ‘रानटी फूल’ (टीप २) चरणावर का हो घेता ॥ १ ॥

स्वभावदोष-अहंयुक्त काट्यांनी गुरफटलेल्या फुलालाही ‘आपुले’ का हो म्हणता ।
माझ्यासारख्या दीन-दुबळ्या न उमलणार्‍या कळीवर प्रेम का हो करता ॥ २ ॥

मायेत अडकलेल्या मजसम क्षणभंगूर फुलावर कृपेचा वर्षाव का हो करता ।
साक्षात् विष्णुरूप असतांनाही ‘साधक-फुलां’च्या प्रगतीचा ध्यास का हो घेता ॥ ३ ॥

लंगड्या-पांगळ्या-बोबड्या सवंगड्यांशी कृष्ण जसा खेळ खेळत होता ।
तसे तुम्ही देश-विदेशी ‘साधक-फुलां’मध्ये रंगूनी का हो जाता ॥ ४ ॥

शबरीची उष्टी बोरे खाण्या श्रीराम जसा वनात गेला होता ।
तसे तुम्ही ‘साधक-फुलां’चा सुगंध घेण्या ‘सनातन धर्म’रूपे सूक्ष्मातूनी सर्वत्र असता ॥ ५ ॥

‘तुम्ही श्री महाविष्णु नारायणाचा अवतार’, असे महर्षि, साधक अन् संतही सांगती  ।
७३ व्या वाढदिवशी साधकजनांसह देवदेवताही तुमच्यावर पुष्पवृष्टी करिती ॥ ६ ॥

तुम्हाला समजण्या घ्यावे लागतील मला शेकडो जन्म ।
तुमच्या कृपेचा आनंद अनुभवण्यात आहे माझे कल्याण ॥ ७ ॥

तुम्ही फुलवलेल्या सनातनच्या बागेतील मी ‘एक लहान कळी’ असे ।
येणार्‍या ‘हिंदु राष्ट्रा’च्या सूर्यकिरणांनी उमलून फूल होण्याची वाट मी पहातसे ।
फूल होऊनी शरणागतभावाने तुमच्या चरणी अर्पण होण्याच्या प्रतीक्षेत मी असे ॥ ८ ॥’

टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले
टीप २ – स्वभावदोष आणि अहं यांनी भरलेले अन् आध्यात्मिकदृष्ट्या माझा अंधकारमय इतिहास असलेले

– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.६.२०२०)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संताच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक