कर्नाटकमध्ये होणार्‍या गोहत्या बंदी कायद्याची गोव्यातील गोमांस भक्षकांनी घेतली धास्ती !

भाजपचे राष्ट्रीय महासचिव, विद्यमान आमदार तथा गोवा प्रभारी सी.टी. रवि यांचा कायदा करण्यात प्रमुख हातभार

पणजी, २१ नोव्हेंबर (वार्ता.) – कर्नाटक शासन लवकरच कर्नाटक राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू करण्याच्या सिद्धतेत आहे. गोव्यात बहुतांश गोमांस बेळगाव आणि उत्तर कर्नाटक भागांतून आयात केले जात असल्याने कर्नाटकमधील संभाव्य गोहत्या बंदी कायद्याची गोव्यातील गोमांस भक्षकांनी धास्ती घेतली आहे. विशेष म्हणजे कर्नाटक राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू करण्यासाठी प्रखर गोभक्त तथा गोवंशियांच्या रक्षणासाठी झटणारे भाजपचे राष्ट्रीय महासचिव तथा भाजपचे नूतन गोवा प्रभारी आणि कर्नाटकमधील चिक्कमंगळुरूचे आमदार सी.टी. रवि यांचा मोलाचा हातभार आहे.

चिक्कमंगळुरूचे आमदार सी.टी. रवि ट्वीट करून म्हणाले, ‘‘कर्नाटकात लवकरच गोहत्या बंदी कायदा लागू होणार आहे. आगामी मंत्रीमंडळ बैठकीत ‘कर्नाटक गोहत्या प्रतिबंध आणि संरक्षण’ कायदा संमत करणे आणि तो आगामी विधानसभा अधिवेशनात मांडणे यांविषयी कर्नाटकचे पशूसंवर्धनमंत्री प्रभु चव्हाण यांना मी सूचना केली आहे.’’ कर्नाटक शासनाने आमदार सी.टी. रवि यांच्या सूचनेचे पालन केल्यास येत्या डिसेंबर मासापासून कर्नाटकमध्ये गोहत्या बंदी कायदा लागू होणार आहे. आमदार सी.टी. रवि यांच्या निर्णयाचे बेळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांनी स्वागत करतांना यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेली मागणी धसास लागणार असल्याचे म्हटले आहे.

याविषयी श्रीराम सेनेचे कार्यकर्ते म्हणाले, ‘‘गायीला आम्ही गोमाता असे संबोधून तिचे पूजन करतो. गोहत्या रोखणे हे आपले कर्तव्य आहे. कर्नाटक राज्यात गोहत्या बंदी कायदा त्वरित लागू केला पाहिजे.’’