शस्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानच्या आक्रमणात कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक संग्राम पाटील हुतात्मा !

एकाच आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरे सैनिक हुतात्मा !

आणखी किती सैनिक हुतात्मा झाल्यावर भारतीय राज्यकर्ते पाकला स्मरणात राहील असा धडा शिकवणार आहेत !

हुतात्मा सैनिक संग्राम पाटील

कोल्हापूर – परत एकदा शस्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने केलेल्या आक्रमणात राजौरी येथे करवीर तालुक्यातील निगवे-खालसा येथील हवालदार संग्राम पाटील (३७ वर्षे) हे २१ नोव्हेंबर या दिवशी हुतात्मा झाले आहेत. ते गेली १७ वर्षे मराठा बटालीयनमध्ये सेवा बजावत होते. २ वर्षांपूर्वी करार संपल्यावरही देशसेवा करण्यासाठी त्यांनी त्यांची सेवा २ वर्षांसाठी वाढवून घेतली होती. त्यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी आणि २ लहान मुले आहेत. गेल्याच आठवड्यात ऐन दीपावलीत कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी या गावातील तरुण सैनिक ऋषिकेश जोंधळे (वय २० वर्षे) हे घायाळ होऊन हुतात्मा झाले होते.

संग्राम पाटील हे वर्ष २००२ मध्ये १६ मराठा बटालियन मधून भरती झाले होते. बेळगाव येथे प्रशिक्षण घेऊन त्यांनी देशसेवा बजावली. संग्राम यांच्या घराचे काम चालू होते. संग्राम हे डिसेंबरमध्ये घरी येणार होते. दूरभाषद्वारे बांधकामाची माहिती घेऊन काम कुठेपर्यंत आले आहे याची चौकशी करत होते; मात्र शेवटी बांधलेले घर पहाण्याचे राहूनच गेले अशी खंत त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केली. शांत, सयंमी, मनमिळावू स्वभावाचे संग्राम पाटील हे हुतात्मा झाल्याचे समजताच गावातील सर्व व्यवहार ठप्प झाले असून गावावर शोककळा पसरली आहे. २२ ला रात्री अथवा २३ नोव्हेंबरला सकाळी त्यांचे पार्थिव गावात दाखल होणार आहे. अंत्य संस्कार करण्यासाठी ग्रामपंचायतीजवळ असणार्‍या क्रीडांगणावर चबुतरा उभारण्यात येत आहे.