(म्हणे) ‘जिवे मारण्याची धमकी आल्याने सुरक्षा पुरवावी !’

‘फेसबूक’द्वारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी प्रथमदर्शनी अहवाल नोंद झाल्यानंतर पणजी येथील प्रा. शिल्पा सिंह यांचा पुन्हा कांगावा !

राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोग यांच्याकडे केली मागणी

प्रा. शिल्पा सिंह

पणजी, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – पणजी येथील व्ही.एम्. साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या साहाय्यक प्राध्यापिका शिल्पा सिंह यांनी २१ एप्रिल २०२० या दिवशी ‘फेसबूक’द्वारे एक आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केली होती. ‘मंगळसूत्र घातलेली महिला पाहिल्यावर गळ्यात साखळी असलेला कुत्रा दिसतो, तर हिजाब किंवा बुरखा घातलेली महिला ही झाकलेले ‘इलेक्ट्रॉनिक’ उपकरण दिसते’, असे म्हणत प्रा. सिंह यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवल्या होत्या. त्यांच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंद करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी वजा तक्रार ‘राष्ट्रीय हिंदु युवा वाहिनी’चे राजीव झा यांनी रायबंदर येथील पोलिसांच्या ‘सायबर’ विभागाकडे ३० ऑक्टोबर या दिवशी प्रविष्ट केली होती. या तक्रारीला अनुसरून प्रा. सिंह यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी भारतीय दंड संहितेचे कलम २९५ अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे.

प्रा. सिंह यांनीही ‘आपणावर बलात्कार करण्याची आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे’, असा आरोप करत सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोग यांच्याकडे केली आहे.

प्रा. सिंह यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी गोवा पोलिसांनी धुडकावली !

या प्रकरणी प्रारंभी साहाय्यक प्राध्यापिका शिल्पा सिंह यांनी गोवा पोलिसांकडे सुरक्षा पुरवण्याची लेखी मागणी केली होती; मात्र गोवा पोलिसांनी ही मागणी धुडकावली आहे. १९ नोव्हेंबर या दिवशी प्रा. सिंह गोवा राज्य महिला आयोगाला भेटून त्यांची भूमिका मांडणार आहेत.