‘देवच सर्व करतो’, या सहजभावात राहून कर्तेपण गुरुचरणी अर्पण करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती अनन्य भाव असलेल्या पू. कुसुम जलतारेआजी !

‘देवच सर्व करतो’, या सहजभावात राहून कर्तेपण गुरुचरणी अर्पण करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती अनन्य भाव असलेल्या सनातनच्या ९५ व्या संत पू. कुसुम जलतारेआजी (वय ८१ वर्षे) !

पू. कुसुम जलतारेआजी

‘साधारण एक ते दीड मासापूर्वी देवाच्या कृपेने मला रामनाथी आश्रमात पू. कुसुम जलतारेआजींची सेवा करण्याचे भाग्य लाभले. त्यांची सेवा करतांना मला त्यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळाले. कार्तिक शुक्ल पक्ष पंचमी (१९ नोव्हेंबर २०२०) या दिवशी पू. कुसुम जलतारेआजी यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन’ हा शांतीविधी आहे. त्या निमित्ताने कृतज्ञतेची ही शब्दसुमने मी त्यांच्या चरणी अर्पण करत आहे.

होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी

१. नकारात्मक विचारांमुळे पू. जलतारेआजींची सेवा करण्यास प्रथम नकार देणे, नंतर देवानेच ही सेवा करण्यासाठी ‘हो’ म्हणवून घेणे

‘प्रतिदिन सकाळी ७.३० वाजता पू. जलतारेआजींची सेवा करायला तुला जमेल का ?’, असे मला साधकाने विचारले. त्या वेळी माझ्या मनात ‘मला सकाळी उठायला जमेल का ? माझ्याकडून ही सेवा नीट होईल का ?’, असे नकारात्मक विचार आले आणि मी ‘मला जमणार नाही’, असे सांगितले. नंतर पुढील आठवड्यात साधकाने मला पुन्हा पू. जलतारेआजींच्या सेवेविषयी विचारले. तेव्हा मी सहज ‘हो’ म्हणून गेले. तेव्हा ‘देवानेच ते माझ्याकडून वदवून घेतले’, असे मला जाणवले. तेव्हा ‘मला कसे जमेल ? माझ्याकडून चुका झाल्या तर ?’, अशी माझ्या मनात भीती होती. पू. जलतारेआजींची सेवा करू लागल्यावर ‘या सेवेतून मला लाभ आणि चैतन्य मिळू नये’, यासाठी माझ्यातील ‘नकारात्मकता, स्वीकारण्याची वृत्ती नसणे, तसेच अहं आणि अन्य स्वभावदोष’ यांचा लाभ घेत मला त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तींनी या सेवेपासून मला दूर ठेवले होते’, याची मला तीव्रतेने जाणीव झाली. ‘मी संतसेवेला नकार देत होते’, यासाठी मी भगवंताच्या चरणी क्षमायाचना करते.

२. सेवा करतांना प्रथम चुका होणे आणि त्याविषयी पू. आजींची क्षमायाचना करणे

पू. आजींची सेवा करतांना पहिले २ – ३ दिवस मला अधिक वेळ लागला आणि सेवेत चुकाही झाल्या. मी त्याच वेळी पू. आजींना माझ्याकडून झालेल्या चुका सांगितल्या आणि ‘पुन्हा त्या चुका होणार नाहीत’, असे म्हणून त्यांची क्षमायाचना आणि प्रार्थना केली. तेव्हा मी ज्या गोष्टी करायला विसरले होते, त्यांची मला त्यांनी आठवण करून दिली. त्यामुळे मला एकदम आधार वाटून हलके वाटले.

३. स्वभावदोष आणि अहं यांमुळे ‘भावस्थितीत रहाण्यात अडथळा येत असल्याचे लक्षात येऊन ‘पू. आजींची सेवा म्हणजे भगवंताने केलेली कृपा’, याची जाणीव होणे

एकदा पू. आजींची सेवा करतांना एका साधिकेसमवेत घडलेल्या प्रसंगामुळे माझे मन अस्वस्थ झाले होते. त्यामुळे मला पू. आजींच्या सेवेचा आनंद घेता येत नव्हता. तेव्हा एक साधक मला म्हणाले, ‘‘कुठल्याही परिस्थितीमुळे तू तुझी भावस्थिती बिघडू देऊ नको.’’ तेव्हा आपल्यातील ‘स्वभावदोष आणि अहं’ यांमुळे ‘सतत भावाच्या स्थितीत रहाणे अवघड जाते’, याची मला प्रकर्षाने जाणीव झाली. त्या वेळी ‘पू. आजींची सेवा देऊन भगवंताने माझ्यावर केवढी तरी कृपा केली आहे’, असे मला वाटले.

४. पू. आजींकडून शिकायला मिळालेली सूत्रे

४ अ. मनाच्या बहिर्मुखतेमुळे आईचे स्वभावदोष पहाणे, पू. आजी आईला ओळखत नसूनही त्यांनी ‘आईमध्ये भाव आहे’, असे सांगून तिचे गुण पहाण्यास शिकवणे : एकदा मी माझ्या आईशी भ्रमणभाषवर बोलत असतांना बहिर्मुखतेमुळे माझे लक्ष आईच्या स्वभावदोषांकडेच जात होते. नंतर पू. आजींची सेवा करतांना माझ्या मनात आईच्या स्वभावदोषांविषयीचे विचार दोनदा येऊन गेले. तेव्हा पू. आजींनी मला विचारले, ‘‘आई कशी आहे ? तिच्यात भाव आहे ना !’’ त्यांचे हे बोलणे ऐकून माझ्या मनातील विचार नाहीसे झाले आणि ‘मी तिच्या भावाकडे लक्ष द्यायला हवे, स्वभावदोषांकडे नाही’, याची मला तीव्रतेने जाणीव झाली. प्रत्यक्षात पू. आजींनी माझ्या आईला पाहिलेले नाही आणि त्या तिला ओळखतही नाहीत. तेव्हा ‘गुरुतत्त्व त्यांच्या माध्यमातून मला शिकवत आहे आणि मला स्वभावदोषांची जाणीव करून देत आहे’, असे जाणवले. तेव्हापासून माझ्या मनात आईविषयी अयोग्य विचार आले नाहीत. तेव्हा ‘संतांच्या केवळ बोलण्यानेही त्यांनी सांगितलेले सूत्र अंतर्मनात जाऊन योग्य कृती आपोआप आणि सहजतेने होते’, हे मला शिकायला मिळाले.

४ आ. ‘सेवेला उशीर होईल’, असा विचार आल्यावर देवाने सेवा नेहमीपेक्षा लवकर पूर्ण करून देणेे : एकदा मला पू. आजींची सेवा करायला जायला ५ मिनिटे उशीर झाला. तेव्हा ‘माझ्या पुढील प्रत्येक सेवेला उशीर होईल’, असा विचार माझ्या मनात आला. त्या दिवशी पू. आजींची सेवा नेहमीपेक्षा १० मिनिटे आधीच संपली. तेव्हा ‘माझ्या मनातील विचार अयोग्य होता. देवच सर्व करत आहे’, याची जाणीव देवानेच मला करून दिली. ‘हे भगवंता, मला क्षमा कर. मला केवळ साधना म्हणून सेवाभावाने सर्व करायचे आहे आणि त्यातून शिकायचे आहे’, याची जाणीव सतत माझ्या अंतरी जागृत राहो’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना !

४ इ. ‘एखादे सूत्र सकारात्मकतेने कसे सांगावे ?’ ते  पू. आजींकडून शिकायला मिळणे : एकदा एका साधिकेने पू. आजींना एक पदार्थ करून दिला. पू. आजींना पदार्थ तिखट आणि पातळ हवा असतो. तो पदार्थ त्याप्रमाणे झाला नव्हता. तेव्हा ‘साधिकेचा वेळ आणि केलेला पदार्थ वाया जाऊ नये’, या उद्देशाने ‘यापुढे तिने पदार्थ करायला नको’, असे सांगावे का ?’, असे मी पू. आजींना विचारले. तेव्हा पू. आजी मला म्हणाल्या, ‘‘पदार्थ करायला नको’, असे सांगू नको. पदार्थ थोडा तिखट आणि पातळ करता येईल का ?’, याविषयी तिला सांग.’’ तेव्हा ‘एखादे सूत्र सकारात्मकतेने कसे सांगावे ?’, हे मला शिकता आले.

५. पू. जलतारेआजी यांचे जाणवलेले विविध गुण

५ अ. ‘आईच्या निधनानंतर देवच समवेत होता’, अशी श्रद्धा असणे : एकदा पू. आजी म्हणाल्या, ‘‘मी ३ – ४ वर्षांची असतांनाच माझ्या आईचे निधन झाले. तेव्हा मला वाटायचे, ‘आता कसे होणार ?’; पण तेव्हापासूनच देव माझ्या समवेत होता. देवानेच सर्व करवून घेतले; म्हणून सर्व व्यवस्थित झाले.’’

५ आ. उत्तम स्मरणशक्ती

१. पू. आजींना त्यांच्या काळातील गाणी अजूनही लक्षात असून त्यांनी एकदा एक गाणे आम्हाला म्हणूनही दाखवले होते.

२. कुणा साधकाची चूक लक्षात आल्यास आणि कुणी क्षमायाचना केल्यास त्या मला त्याविषयी नावानिशी आवर्जून सांगतात. पू. आजींकडे पाहिल्यावर ‘त्यांच्या लक्षात रहात असेल का ?’, असे मला वाटायचे; परंतु नंतर ‘सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात रहातात’, असे माझ्या लक्षात आले.

५ इ. नियाजनपूर्वक कृती करणे : आश्रमात एखादा कार्यक्रम असला किंवा चित्रीकरण असले, तर पू. आजी आदल्या दिवशीच त्याचे नियोजन करतात.

५ ई. इतरांचा विचार करणे : पू. आजींची सेवा करतांना ‘मला साहाय्य व्हावे’, यासाठी त्या अनेक कृती स्वतःच करतात. एकदा आश्रमात चंडीयाग होता. त्यासाठी मला काही सेवा करायच्या होत्या. तेव्हा पू. आजी मला म्हणाल्या, ‘‘तुला सेवा असेल, तर तू माझे लवकर आवरून दिलेस, तरी चालेल. तू म्हणशील तेव्हा अगदी सकाळी ६ वाजताही मी आवरेन.’’ तेव्हा ‘पू. आजी इतरांचा किती विचार करतात ?’, हे मला शिकायला मिळाले.

५ उ. परेच्छेने वागणे : एकदा आश्रमात होणार्‍या एका कार्यक्रमासाठी ‘‘कोणती साडी नेसू ?’’, असे त्यांनी मला विचारले. तेव्हा मी त्यांना एक साडी निवडून दिली. रात्री त्यांच्याकडे सेवेला येणार्‍या साधिकेने दुसरी साडी निवडली. तेव्हा पू. आजी तिला म्हणाल्या, ‘‘आरतीला विचारते. तिने वेगळी साडी निवडली आहे.’’ प्रत्यक्षात त्यांनी मला विचारण्याची काहीच आवश्यकता नव्हती, तरी परेच्छा म्हणून त्या सहजतेने तसे बोलून गेल्या. तेव्हा ‘संत कसे सहजावस्थेत असतात आणि त्यांना परेच्छेसाठी किंवा मनोलयासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत, त्यांच्यात ते मुळातच असते’, हे मला शिकायला मिळाले.

५ ऊ. इतरांचे कौतुक असणे : दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेल्या साधकांच्या अनुभूती आणि त्यांचे छायाचित्र पू. आजी आवर्जून लक्षात ठेवतात अन् तो साधक दिसल्यावर त्याचे कौतुक करतात.

५ ए. वाचनाची आवड

५ ए १. पू. आजींनी प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करून त्यातील राष्ट्र-धर्म यांविषयीच्या बातम्या सांगणे : पू. आजींना वाचनाची आवड आहे. त्या ग्रंथ वाचतात, त्याचप्रमाणे प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’ही पूर्ण वाचतात. दैनिकातील राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या बातम्या त्या मलाही सांगतात. त्यांच्या सहज बोलण्यातूनही माझी अन्यायाच्या विरोधात लढण्याची वृत्ती जागृत होते. तेव्हा ही वृत्ती वाढवण्यासाठी ‘बोलतांना आवाजात चढ-उतार करणे किंवा मोठ्या आवाजात बोलणे’, यांची काहीच आवश्यकता नाही’, हे मला शिकायला मिळाले. पू. आजी संत असल्याने हे आपोआप होते.

६. पू. आजींची सेवा करतांना आलेल्या अनुभूती

६ अ. एरव्ही नामजप करतांना पुष्कळ प्रयत्न करावे लागणे; मात्र पू. आजींची सेवा करतांना नामजप आपोआप आणि सहजतेने होणे : पहिले २ दिवस पू. आजींची सेवा झाल्यानंतर ‘सेेवा करतांना माझा नामजप आपोआप, एका लयीत अन् हळूवारपणे होत होता’, असे माझ्या लक्षात आले. एरव्ही नामजप करण्यासाठी मी अन्यत्र बसते. तेव्हा मला मन एकाग्र करण्यासाठी प्रयत्न करणे, नामजप लिहून काढणे, आवरण काढणे, असे करावे लागते; मात्र त्या तुलनेत ‘पू. आजींची सेवा करतांना आपोआप होणारा नामजप हा अधिक परिणामकारक होतो’, असे मला जाणवले. ‘पू. आजींच्या सहवासाने आणि स्पर्शानेच सर्वकाही आपोआप घडत आहे’, असे माझ्या लक्षात आले.

६ आ. पू. आजींचे निरागस बोलणे आणि हसणे यांमुळे ‘त्या भगवंताचे निरागस बाळ आहेत’, असे वाटणे : पू. आजींच्या सहवासात मला ‘त्यांच्या डोक्याला तेल लावतांना आणि त्यांची वेणी घालतांना सर्वांत अधिक चैतन्य मिळते’, असे जाणवले. त्याचप्रमाणे पू. आजींचे कपडे धुतांनाही चैतन्य मिळण्याचे प्रमाण अधिक असते. त्यांच्या निरागस हसण्याने माझे मन एकाग्र होऊन माझी भावजागृती होते. मी पू. आजींच्या खोलीत प्रवेश केल्यावर त्या माझ्याकडे पाहून हसतात. तेव्हा माझ्यावर असलेले त्रासदायक आवरण दूर होते. त्या मला प्रेमाने विचारतात, ‘‘आलीस ?’’ तेव्हा माझ्या अंगावर ‘छोटी छोटी फुले पडत आहेत’, असे मला जाणवते. ‘पू. आजी म्हणजे भगवंताचे निरागस बाळ आहे’, असे मला वाटते.

६ इ. महाशिवरात्रीच्या दिवशी ‘पू. आजींची पाठ दुखते’, यासाठी त्यांना शिवाचा नामजप करण्याचा निरोप न देणे, तरी रात्री त्यांनी आपणहून शिवाचा नामजप करणे, तेव्हा ‘देवच त्यांना योग्य ते सुचवून तशी कृती करवून घेतो’, असे अनुभवता येणे : महाशिवरात्रीच्या दिवशी आश्रमातील साधकांनी ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप केला होता. पू. आजी ‘दिवसभर बसून नामजप करतात आणि ‘त्यांची पाठ दुखते’, यासाठी त्यांना शिवाचा नामजप करण्याचा निरोप दिला नव्हता. दुसर्‍या दिवशी पू. आजी सहज मला म्हणाल्या, ‘‘काल रात्री मला झोप आली नाही आणि प्रसन्न वाटत होते. तेव्हा ‘शिवाचा नामजप करावा’, असे वाटले; म्हणून मी काल रात्री तो नामजप केला.’’ तेव्हा ‘संतांना आतूनच सर्व कळते आणि त्यांच्याकडून भगवंताला अपेक्षित अशी कृती सहजतेने घडते’, हे मला अनुभवता आले.

६ ई. अन्य अनुभूती

१. एक साधक पू. आजींना स्वतःची चूक सांगून क्षमायाचना करत असतांना ‘पू. आजींच्या मुखातून चैतन्याचे गोलाकार वलय बाहेर पडून त्या साधकाकडे जात आहे’, असे मला दिसले. तेव्हा ‘साधकांना संतांचा कसा लाभ होतो ? आणि साधकांनी त्यांच्या चुकांसाठी मनापासून क्षमायाचना न केल्यास त्यांच्या साधनेची किती हानी होते ?’, हे या प्रसंगातून भगवंताने मला शिकवले.

२. पू. आजी रहात असलेल्या खोलीतील त्यांच्या पलंगातून पांढरा प्रकाश नेहमी प्रक्षेपित होत असल्याचे दिसते.

३. दोरीवर वाळत घातलेल्या पू. आजींच्या कपड्यांतून चैतन्याचा प्रवाह आणि मंद गंध दरवळतो. ‘त्याचा तेथील अन्य साधिकांच्या कपड्यांना, तसेच खोलीत रहाणार्‍या साधिकांना लाभ होतो’, असे मला जाणवले.

४. ‘पू. आजींकडे पहातांना माझ्या डोळ्यांवर आलेला जडपणा नाहीसा होतो’, असे मी बर्‍याचदा अनुभवले आहे.

७. पू. जलतारेआजींची चुकांविषयीची सतर्कता, अभ्यास, दृष्टीकोन आणि सूक्ष्मातील जाणीव

पू. आजींच्या सेवेत असतांना त्यांना कधी अन्य साधिकांच्या चुका लक्षात आल्यास त्या म्हणायच्या, ‘त्या साधिकेला तिची चूक सांग’, कधी म्हणायच्या, ‘नको सांगू’, तर कधी म्हणायच्या ‘उत्तरदायी साधकाला तिची चूक लिहून दे.’ मी प्रथम पू. आजींच्या सेवेसाठी गेले. तेव्हा त्यांच्याकडे पाहून ‘त्या चुकांविषयी एवढ्या सतर्क असतील’, असे मला वाटले नव्हते. तेव्हा मी केवळ बुद्धीने त्यांच्याकडे पहात होते. ‘त्या संत आहेत आणि संतांना सगळे कळते’, याचे मला विस्मरण झाले होते. माझी ही चूकही माझ्या लक्षात आली.

७ अ. साधिकेला चुकीची जाणीव होऊन तिने क्षमा मागितल्यावर पू. आजींनी ‘तिची चूक उत्तरदायी साधकाला लिहून द्यायला नको’, असे सांगणे : पू. आजींच्या सेवेत एकदा एका साधिकेची चूक झाली. तेव्हा मी पू. आजींना विचारले, ‘‘काय करू ? उत्तरदायी साधकांना सांगायचे का ?’’ नंतर त्या साधिकेने लगेच येऊन पू. आजींची क्षमायाचना केली. तिला तिच्या चुकीची जाणीव झालेली पाहून पू. आजी म्हणाल्या, ‘‘नको कळवायला.’’

७ आ. साधिकेने चूक न स्वीकारता चुकीविषयी स्पष्टीकरण दिल्यावर पू. आजींनी त्याविषयी उत्तरदायी साधकांना लिहून देण्यास सांगणे : एकदा पू. आजींनी फलकावर लिहिलेली एक सूचना वाचली. त्या सूचनेच्या शेवटी ‘अशा चुका कोणाकडून होत असल्यास त्याविषयी उत्तरदायी साधकांना कळवावे’, असे लिहिले होते. पू. आजींच्या सेवेत असलेल्या एका साधिकेकडून तशी चूक झाली होती. तिला चूक सांगितल्यावर तिने ती स्वीकारली नव्हती आणि स्पष्टीकरण दिले होते. पू. आजींनी मला लगेचच ते सर्व लिहून द्यायला सांगितले. तेव्हा त्यांच्यातील ‘सतर्कता आणि तत्परता’ हे गुण मला शिकायला मिळाले.

७ इ. अनेक वर्षे साधनेत असलेल्या एका साधिकेकडून चुका झाल्यावर पू. आजींनी ‘ती चूक स्वीकारणार नाही; म्हणून तिला चुका सांगायला नकोत, तिनेच स्वतःला पालटण्याचा प्रयत्न केला पाहिजे’, असे सांगणे : एकदा एका साधिकेच्या काही चुका लक्षात आल्यावर मी त्याविषयी पू. आजींना विचारले. त्या म्हणाल्या, ‘‘काही करायला नको. ती बरीच वर्षे साधनेत असल्याने तिला सर्व ठाऊक आहे. तिने स्वतःच स्वतःत पालट करायला हवा. ती चुका स्वीकारणार नाही. त्यामुळे आपण तिला काही सांगायला नको.’’ तेव्हा ‘संतांचे कार्य कसे असते ?’, हे मला शिकायला मिळाले. मला केवळ ‘चूक झाली की, सांगायचे’, एवढेच कळत होते; परंतु पू. आजींमुळे ‘चुकांचा अभ्यास कसा करायचा ?’, हे शिकायला मिळाले.

८. कर्तेपणा सहजतेने देवाच्या चरणी  अर्पण करणार्‍या पू. जलतारेआजी !

८ अ. पू. आजींनी ‘माझ्या काहीच लक्षात रहात नाही, देवच मला सुचवतो’, असे सांगणे : एकदा पू. आजी पूर्वीच्या काही घटनांविषयी बोलत असतांना खोलीतील एक साधिका म्हणाली, ‘‘पू. आजी, तुमच्या सर्व लक्षात राहिले आहे. ‘मला तर दिवा बंद करायचा आहे’, हेही लक्षात येत नाही.’’ तेव्हा पू. आजी म्हणाल्या, ‘‘देवच माझ्या लक्षात आणून देतो. ‘दिवा बंद केला कि नाही ?’ याची निश्‍चिती करायला हवी’, असे देव मला सुचवतो. नाहीतर माझ्या काहीच लक्षात रहात नाही.’’ पू. आजी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचे श्रेय अगदी सहजतेने देवाला देतात. ते ऐकतांना माझी नेहमीच भावजागृती होते. सध्या मी ‘कर्तेपणा’ या अहंच्या पैलूवर मात करण्याचे प्रयत्न करत आहे. पू. आजींमुळे मला थेट अंतर्मनाला भिडणारा प्रायोगिक भाग शिकायला मिळत आहे.

८ आ. पू. आजींना साधकांची नावे लक्षात रहाणे आणि त्याचे श्रेय त्यांनी देवाचरणी अर्पण करणे : यज्ञयागाच्या वेळी किंवा आश्रमातील इतर कार्यक्रमांच्या वेळी पू. आजींच्या समोरून साधक-साधिका जातात. तेव्हा ते साधक-साधिका त्यांच्या लक्षात रहातात. मी त्यांना म्हटले, ‘‘आजी, तुमच्या सर्व लक्षात रहाते.’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘माझ्या कुठे काय लक्षात रहाते ? देवच सांगतो अन् देवच सर्व लक्षात आणून देतो.’’ त्या अगदी सहजतेने कर्तेपणा देवाला अर्पण करतात.

८ इ. मनातील कर्तेपणाचा विचार जाण्यासाठी सेवा अंतर्मनातून करण्यास आणि ‘कर्ता करविता भगवंतच आहे’, याची मनाला सतत जाणीव करून देण्यास पू. आजींनी सांगणे : ११.३.२०२० या दिवशी एक वृद्ध साधिका संत झाल्याचे मी पू. आजींना सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘एक तर वयस्कर साधक, नाहीतर बालक संत होतात. मध्यम वयाचे साधक संत होत नाहीत.’’ मी म्हटले, ‘‘माझ्याविषयी मला असे जाणवते की, ‘माझा कर्तेपणा कार्यरत असतो. मला माझ्या मनाला सांगावे लागते, ‘कर्ता करविता भगवंत आहे’, तरी तो मधे मधे उफाळून येतो.’’ तेव्हा पू. आजी म्हणाल्या, ‘‘बाह्य मनातून सेवा किंवा कृती झाल्यास कर्तेपणा येतो. अंतर्मनापासून ती झाल्यास कर्तेपणाचा विचारही येणार नाही. सतत मनाला सांगत रहायला पाहिजे की, ‘सर्वकाही भगवंतच करत आहे. त्याच समवेत कोणतीही सेवा झाल्यानंतर ‘श्रीकृष्णार्पणमस्तु ।’ असे म्हणावे. अशा प्रकारे केलेली सेवा ईश्‍वराला समर्पित करून सेवा दिल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. सेवा नसती, तर आपण काय केले असते ? झोपून राहिलो असतो, आळशीपणा केला असता. सेवा मिळत आहे; म्हणून आपण साधना करू शकतो ना ?’’

९. निसर्गातील पशू-पक्षी, किडा-मुंगी आदींविषयी पू. आजींचे निरीक्षण

अ. पू. आजींना निसर्ग अधिक आवडतो. एकदा त्या म्हणाल्या, ‘‘पक्ष्यांचे बरे असते. त्यांना कपडे पालटावे लागत नाहीत. त्यांना ‘उन्हाळा-हिवाळा’ असे काही नसते; म्हणून बरे आहे. आपल्याला किती असते ना !’’

आ. एकदा पू. आजी म्हणाल्या, ‘‘मुंग्यांचे किती छान असते ना ! त्या अन्नपाण्यासाठी आणि जीवनासाठी किती कष्ट करतात. त्या किती मिळून-मिसळून रहातात. त्यांच्यात एकी असते. हिंदूंमध्ये तशी एकी नसते.’’

भगवंताने पू. आजींची सेवा देऊन माझ्यावर अपार कृपा केली आहे. ‘हे गुरुराया, तत्त्वरूपाने तुम्ही सदैव माझ्या समवेतच आहात’, असेच मला त्यांच्या सहवासात जाणवते. हे गुरुराया, आजवर मी अनेकदा चुकले, तरी माझ्या हातून घडलेल्या अपराधांना क्षमा करून तुम्ही मला अखंड चैतन्याच्या स्रोतात ठेवले आहे आणि माझ्यावर प्रीतीचा वर्षाव करत आहात. त्यासाठी कोटीशः कृतज्ञता ! ‘तुम्हाला अपेक्षित असे मला शीघ्रतेने घडता येऊ दे’, हीच तुमच्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.’

– होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.२.२०२०)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक