हिंदु संस्कृतीतील अन्न आणि आहार यांचे महत्त्व

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

१. अन्नाची व्युत्पत्ती

सस्यं क्षेत्रगतं प्राहुः सतुषं धान्यमुच्यते ।
आमं वितुषमित्युक्तं स्विन्नमन्नमुदाहृतम् ।। – शब्दकल्पद्रुम

अर्थ : शेतातील पिकाचे कणीस म्हणजे ‘सस्य’. तूसयुक्त असते, ते धान्य. तूस काढल्यावर त्याला ‘आम’ (कच्चे अन्न) म्हणतात आणि ते शिजवले असता त्याला ‘अन्न’ असे म्हणतात.

२. व्याख्या

अ. अद्यते अस्मै इति अन्नम् । – विग्रहकोश

अर्थ : ज्याला खाल्ले जाते, ते अन्न होय.

आ. ज्या द्रव्यांची चव आणि वास चांगला असून जे दिसायला आकर्षक आहेत अन् जे योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात खाल्ले असता पचन अन् शोषण झाल्यावर शरिराच्या पेशींची झालेली झीज भरून काढू शकतात, नवीन शरीरघटक निर्माण करू शकतात, शरिराला लागणारी शक्ती उत्पन्न करतात आणि मनाला तृप्ती अन् आनंद देतात, अशा द्रव्यांना ‘अन्न’ म्हणतात.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ अन्नं ब्रह्म । : खंड १)

इ. चित्ताला कारक वासनांची पूर्ती करणार्‍या घटकाला ‘अन्न’ म्हणतात. अन्नामुळे जडाचे (शरिराचे) पोषण होते.

समाधान : जेव्हा अन्नलहरी जिवाचे पोषण करतात, तेव्हा जिवाची तृप्ती होते, त्याला लौकिक अर्थाने समाधान म्हणतात.’ (श्री. राम होनप यांच्या माध्यमातून, २६.८.२००९)

३. अन्नाचे महत्त्व

संपूर्ण विश्‍वब्रह्मांड अन्न, प्राण, मन, विज्ञान आणि आनंद यांवर जगते. हे पाचही मिळवण्यासाठी आपण अन्नवान झाले पाहिजे आणि इतरांना अन्नवान केले पाहिजे.’ – तैतरीय उपनिषद

४. अन्नाची परिणामकारकता

अ. अन्नमयं हि सोम्य मनः । – छांदोग्योपनिषद, अध्याय ६, खंड ६, वाक्य ५

अर्थ : मन हे अन्नाचे बनते.

आ. अन्न हे धातू, इंद्रिये, बल, तेज, संतोष, प्रतिभा आणि आरोग्य देते.

इ. अन्न हे जीवन आणि शरिराचा प्राण आहे.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी, वडाळामहादेव, ता. श्रीरामपूर, जिल्हा नगर.

१. अन्नं न निंद्यात् । तद्वतम् । – तैत्तिरीयोपनिषद, भृगुवल्ली, अनुवाक् ७

अर्थ : अन्नाची निंदा करू नये, ते व्रत आहे.

२. अन्नं न परिचक्षीत । तद्वतम् । – तैत्तिरीयोपनिषद, भृगुवल्ली, अनुवाक् ८

अर्थ : अन्न टाकू नये, ते व्रत आहे.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी