Pakistan Spy Arrested : राजस्थानमध्ये पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्‍या पठाण खान याला अटक

पाकिस्तानचा हेर पठाण खान (चौकटीत)

जयपूर – जैसलमेरच्या मोहनगड कालवा परिसरातून सुरक्षायंत्रणांनी एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक केली आहे. पकडलेल्या गुप्तहेरावर भारताच्या सुरक्षेविषयी गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा संशय आहे. सुरक्षायंत्रणांनी पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली. अटक केलेल्या गुप्तहेराचे नाव पठाण खान (वय ४० वर्षे) असे आहे. पठाण हा चंदन जैसलमेर येथील ‘करमो की धानी’ येथील रहिवासी आहे.

पठाण खान याचे नातेवाईक पाकिस्तानात राहतात. वर्ष २०१९ मध्ये पठाण खान यानेही पाकिस्तानला भेट दिली होती. त्यानंतर तो सतत पाकिस्तानला गोपनीय माहिती पाठवत होता. त्याने भारतीय सैन्य तळांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे पाकिस्तानला पाठवली होती.

आणखी एका संशयिताला अटक

पठाण खान याला अटक करण्याआधी सुरक्षायंत्रणांनी १८ मार्च या दिवशी भारत-पाकिस्तान सीमावर्ती भागातील नाचना परिसरातील ‘नूर की चक्की’ येथे एका तरुणाला संशयास्पद स्थितीत पकडले होते. या तरुणाकडून ४ वेगवेगळ्या राज्यांचे आधारकार्ड जप्त करण्यात आले. अटक केलेला तरुण कधी रवि किशन तर कधी शाही प्रताप असे त्याचे नाव सांगत होता.

संपादकीय भूमिका

अशांच्या विरोधात जलद गतीने खटला चालवून त्यांना फासावर लटकवणे आवश्यक !