RSS Demands UN Intervention : बांगलादेशात हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांवर संयुक्त राष्ट्रांनी हस्तक्षेप करावा !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची मागणी

नवी देहली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने बांगलादेशातील हिंदूंवरील छळाविरुद्ध एक ठराव संमत केला आहे आणि बांगलादेशातील हिंदूंसाठी एकता दाखवण्याचे आवाहन केले आहे. या सूत्रावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संयुक्त राष्ट्रांकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

प्रतिनिधी सभेने संमत केलेल्या ठरावात म्हटले आहे की,

१. बांगलादेशामध्ये हिंदु आणि इतर अल्पसंख्यांक यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे, ज्यावर प्रतिनिधी सभा चिंता व्यक्त करते. बांगलादेशातील हिंदूंची लोकसंख्या वर्ष १९५१ मध्ये २२ टक्के होती, ती आता ७ टक्क्यांवर आली आहे.

२. बांगलादेशातील सध्याच्या सत्तापालटाच्या काळात मठ, मंदिरे, दुर्गापूजा मंडप आणि शैक्षणिक संस्था यांवर आक्रमणे झाली. मूर्तींची विटंबना, हत्या, मालमत्तेची लूट, महिलांचे अपहरण आणि छळ, बलात्कार, बळजोरीने धर्मांतर अशा अनेक घटना सतत समोर येत आहेत. या घटनांना केवळ ‘राजकीय’ म्हणणे आणि त्यांचे धार्मिक पैलू नाकारणे, हे सत्यापासून दूर जाण्यासारखे होईल; कारण बहुतेक बळी हिंदु आणि इतर अल्पसंख्यांक समुदायातील हेच आहेत.

३. काही आंतरराष्ट्रीय शक्ती जाणूनबुजून भारताच्या शेजारील प्रदेशांमध्ये एका देशाला दुसर्‍या देशाविरुद्ध उभे करून आणि अविश्‍वास अन् संघर्ष यांचे वातावरण निर्माण करून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

४. बांगलादेशातील हिंदु आणि इतर अल्पसंख्यांक समुदाय यांच्यावर होणार्‍या अमानुष अत्याचारांची संयुक्त राष्ट्रे अन् जागतिक समुदायासारख्या आंतरराष्ट्रीय संघटना यांनी गंभीर नोंद घ्यावी अन् या हिंसक कारवाया थांबवण्यासाठी बांगलादेश सरकारवर दबाव आणावा.

संपादकीय भूमिका

  • बांगलादेशच नाही, तर जगात कुठेही हिंदूंवर अत्याचार झाला, तर भारत आणि भारतातील हिंदूंच्या संघटना यांनी आवाज उठवला, तर ते थांबले पाहिजे, अशी पत आज निर्माण करण्याची आवश्यकता आहे ! ‘हे हिंदूंचे सामायिक दायित्व आहे’, याची जाणीव झाल्यासच हे घडू शकेल, हेही तितकेच खरे !
  • संयुक्त राष्ट्रांचा इतिहास पाहिला, तर ते एक बुजगावण्याच्या पलिकडे काही नाही. त्यांनी जागतिक स्तरावर कोणती समस्या सोडवली आहे किंवा कुणाचे रक्षण केले आहे, असे दिसत नाही. हिंदूंवर पाकिस्तान आणि बांगलादेश येथे ७८ वर्षांपासून अत्याचार होत आहेत. काश्मीरमध्येही झाले; मात्र संयुक्त राष्ट्रांनी काय दिवे लावले, हे हिंदूंना ठाऊक आहे !