१८ मार्च २०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध ठिकाणी केलेल्या मार्गदर्शनातील काही निवडक सूत्रे पाहिली. आज त्यापुढील सूत्रे दिली आहेत.
(भाग ५)
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/893693.html

१५. नामजप करतांना आनंदावस्था आल्यावर नामजपावर लक्ष देण्यापेक्षा अधिकाधिक वेळ आनंदावस्थेत रहाण्याचा प्रयत्न करा !
एक साधिका : ‘मला नामजप करतांना कधी कधी कृतज्ञताभाव किंवा शरणागतभाव जाणवतो. काही सेकंद किंवा काही क्षण माझ्या मनात कुठलाही विचार येत नाही. त्या वेळी माझे मन आनंदाच्या स्थितीत असते. तेव्हा नामजप थांबला, तर पुन्हा नामावर यायचे कि तो आनंद अनुभवायचा ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : नाम मानसिक स्तराचे झाले. आपल्याला विचाररहित अवस्था किंवा त्याच्यापुढे जायचे आहे आणि तेथे केवळ आनंदच आहे. त्यामुळे अधिकाधिक वेळ आनंदाच्या स्थितीत रहाण्याचा प्रयत्न करा. छान प्रगती आहे तुमची !’
१६. भावजागृती आणि ज्ञान मिळणे निराळ्या योगमार्गांतील असून ज्ञान मिळत असतांना शिकण्याची स्थिती असल्याने भाव अल्प होतो !
एक साधिका : मागील वेळी मी आश्रमात आले होते. तेव्हा माझ्याकडून भावजागृतीच्या कृती अधिक प्रमाणात होत होत्या. या वेळी आश्रमात आल्यावर मला अनेक अनुभूती आल्या; पण ‘भावजागृती अल्प झाली’, असे मला वाटले. या वेळी शिकण्याची ओढ अधिक होती आणि मला सगळ्यांकडून शिकता आले. भावजागृतीसाठी काय करायचे ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हो. आता तुमची ज्ञान ग्रहण करण्याची इच्छाशक्ती अधिक असते. अशा वेळी ‘भावजागृती होत नाही’, असा विचार करू नका. शिकण्याच्या वेळी भाव अल्प होतो आणि ज्ञान मिळते. ‘भावजागृती होणे’ हे भक्तीयोगातील आहे आणि ‘शिकणे’ हे ज्ञानयोगातील आहे.
साधिका : भावजागृतीसाठी पुन्हा प्रयत्न करायला पाहिजेत का ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ज्या वेळी जे आवश्यक आहे, ते देव घडवून आणतो.
(क्रमशः)
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/894228.html