परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९० पासून अध्यात्मप्रसाराचे कार्य चालू केले. त्या अंतर्गत त्यांनी ‘आनंदप्राप्तीसाठी साधना’, या विषयावर अभ्यासवर्ग घेणे, विविध ग्रंथांचे संकलन करणे, अनेक मोठी प्रवचने करणे’, असे विविध मार्ग अवलंबले आहेत. आरंभापासून ‘जिज्ञासूंच्या शंकांचे निरसन करणे आणि ‘चांगला साधक कसे व्हावे ?’, याविषयी मार्गदर्शन करणे’, हा त्यांच्या कार्याचा एकमेव उद्देश होता. ‘साधकांच्या साधनेसंबंधी अडचणी समजून घेणे आणि त्यांचे निराकरण करून उपाय सांगणे’, हे त्यांच्या कार्याचे एक अविभाज्य अंग आहे. ‘बाळ बोबडे जरी बोले, बोल जननीस ते कळे ।’, या उक्तीप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना साधकांच्या साधनेसंबंधी अडचणी लगेच कळतात आणि ते त्यांना अचूक उपायही सांगतात’, अशी अनुभूती अनेक साधकांनी घेतली आहे.
१७ मार्च २०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध ठिकाणी केलेल्या मार्गदर्शनातील काही निवडक सूत्रे पाहिली. आज त्यापुढील सूत्रे दिली आहेत. (भाग ४)
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/893428.html

ज्याला जी आवश्यक आहे, ती साधना त्याला सनातनमध्ये शिकवली जात असल्याने साधक लवकर पुढे जातात ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’ हा साधनेचा मूलभूत सिद्धांत आहे. संप्रदायांत सर्वांना तीच साधना सांगितली जाते. सनातनमध्ये असे नाही. प्रत्येकाला निराळा मार्ग; कर्मयोग, भक्तियोग, हठयोग, अनंत मार्ग आहेत. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’ आहेत. त्यामुळे आपण सनातनमध्ये तसे शिकवतो. त्यामुळे साधक पुढे जातात. संप्रदायामध्ये एकच मार्ग ठाऊक असल्याने ते तेवढेच सांगतात.
‘पेशंट आला, तर त्याला काय आवश्यक आहे ?’, तसे औषध त्याला द्यायला पाहिजे. तसे साधनेचेही आहे. ज्याला जी आवश्यक आहे, ती साधना त्याला शिकवली, तयार केले, तर तो पुढे जाईल.’
१३. व्यावहारिक, कौटुंबिक अडचणी असल्या, तरी नामस्मरण अखंड करता येत असल्याने त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपली साधना आणि नामजपादी उपाय करणे आवश्यक !
एक साधक : व्यष्टी आणि समष्टी साधना केली पाहिजे, हे सगळे कळते; पण साधनेचे काहीतरी प्रयत्न करायला जातो, तेव्हा व्यावहारिक, कौटुंबिक, अन्य काहीतरी संकटे अथवा अडथळे येतात. त्या वेळी माझा गोंधळ होतो. ‘सगळे कळते; पण वळत नाही’, असे माझे होते. सगळे कळत असूनही प्रयत्न होत नाहीत, तर यांना अडथळेच (व्यावहारीक आणि कौटुंबिक अडीअडचणी किंवा संकटे) म्हणता येतील का ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : काही जमत नसले, तर निदान नामजप अखंड करता येतो. ते केले की, मग झाले. भांडून, काहीतरी चुकीचे किंवा अयोग्य बोलून समष्टीला लागेल, असे करायचे किंवा वागायचे नाही. व्यावहारिक गोष्टी, अडीअडचणी सर्व सोडून देता आले पाहिजे. त्यात न अडकता आपण आपली साधना, नामजपादी उपाय यांकडे लक्ष दिले पाहिजे.
१४. या जन्माच्या कर्मकर्तव्यांत अडकून पडल्यास जन्मोजन्मी अडकून पडावे लागणार असल्याने याच जन्मी साधना करून ईश्वरप्राप्ती, म्हणजे आनंदप्राप्ती करणे, हे खरे कर्तव्य !
एक साधक : पुन्हा तो मुद्दा आठवतो की, या जन्माचे जे कर्मकर्तव्य आहे, ते केल्याशिवाय सुटका नाही.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : या जन्मातल्या कर्मकर्तव्यापेक्षा या जन्मातले खरे कर्तव्य काय आहे ?, तर ते म्हणजे ‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना !’ त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी सोडल्या, तर काय होईल ? ईश्वराच्या दिशेने पुढे जाता येईल.
एक साधक : एखादा प्रसंग घडला की, आठवते ‘काहीतरी देवाण-घेवाण हिशोब आहे.’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आता निरनिराळ्या आश्रमात साधक रहातात. त्यांनासुद्धा आई-वडील, बहीण-भाऊ कुणी नाहीत का ? सगळे सोडूनच जातात ना ? ते महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवा. आपल्याला पुढे जायचे आहे. या जन्मात अडकलो, पुढच्या जन्मात आणखी कुणीतरी, त्याच्या पुढच्या जन्मात आणखी आहेत. त्याच देवाण-घेवाणीमध्ये पुढचे आणखी कितीतरी जन्म घेत बसावे लागेल. त्यापेक्षा याच जन्मात आपल्याला ज्ञान आहे. त्याचा उपयोग करून आपल्याला आता ईश्वराजवळच जायचे आहे. साधना करून पुढे गेलो की, जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटलो. मग सगळ्यांना काय अनुभवायला येते, ‘आपण सगळ्यांचा निरोप घेतला की, आता आपण देवाच्याच जवळ आहोत. त्यामुळे पुष्कळ आनंद अनुभवायला येऊ लागतो.’
सत्-चित्-आनंद हेच ईश्वराचे गुण आहेत. सत्य, चैतन्यमय आणि आनंद. आनंदापेक्षा पुढचे मोठे काय आहे ? देवच आनंदमय आहे. त्याच्याशीच आपण एकरूप झालो पाहिजे. (क्रमशः)
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/894019.html