Uttarakhand CM On Mention Of Vikram Samvat : सरकारी शिलालेख आणि राजपत्र यांवर हिंदु पंचांगाचा उल्लेख करणार !  

भाजपशासित उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा स्तुत्य निर्णय

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी नुकताच  सनातन धर्म आणि परंपरा यांच्याशी संबंधित एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यात प्रसारित केल्या जाणार्‍या सरकारी अधिसूचना, राजपत्र, उद्घाटन फलक, शिलालेख आदींवर दिनांक आणि वर्षासह हिंदु पंचांगानुसार (विक्रम संवत) महिना अन् तिथी (उदा. फाल्गुन, कृष्ण पक्ष/शुक्ल पक्ष) यांचा उल्लेख करण्याचा आदेश त्यांनी दिला.

१. मुख्यमंत्री धामी यांनी मुख्य सचिवांना या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाला तातडीने आवश्यक आदेशदेण्यास सांगितले आहे.

२.  मुख्यमंत्री म्हणाले की, विक्रम संवत हा भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचा अविभाज्य भाग आहे. यातून आपली शाश्वत ओळख आणि गौरवशाली इतिहास प्रतिबिंबित होतो. या निर्णयामुळे सांस्कृतिक मूल्यांचे जतन करण्यास आणि नवीन पिढीला तिच्या समृद्ध वारशाशी जोडण्यास साहाय्य होईल.

३. उत्तराखंड देवभूमी हे त्याचे शाश्वत सांस्कृतिक स्वरूप असून सरकारचे निर्णय त्याच्याशी जोडलेले आहेत, असेही मुख्यमंत्री धामी यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

भारतीय संस्कृती आणि परंपरा यांना सुसंगत असा निर्णय घेणारे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांने अभिनंदन ! भाजपशासित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घेतला पाहिजे !