Kerala High Court On School Discipline : शाळेत शिस्त रहावी म्हणून शिक्षकांना हातात छडी घ्यायला हवी !

केरळ उच्च न्यायालयाचा निर्देश

थिरूवनंतपूरम् (केरळ) – शिक्षकांना छडी बाळगण्याची अनुमती असावी. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त रहाते. तसे असले, तरीही छडीचा नेहमी वापर योग्य नाही. शाळेत शिस्त रहावी म्हणून छडी पुरेशी आहे, असा निर्देश केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला.

यात विद्यार्थ्याला छडीने मारल्याचा शिक्षकावर आरोप आहे. ‘विद्यार्थ्याने अभ्यासाविषयी गंभीर व्हावे, असा उद्देश होता’, असे या शिक्षकाने सुनावणीत सांगितले. न्यायालयाने केरळच्या पोलीस महासंचालकांना यासंबंधी एक परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले. ते एका महिन्यात लागू करण्याचाही आदेश दिला.

उच्च न्यायालय म्हणाले की, एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्याला हलकेच मारले अथवा धक्का दिला, तर त्यात चुकीचा हेतू नसल्यास ते गुन्ह्याचे प्रकरण ठरणार नाही. त्यास गुन्ह्याच्या श्रेणीत टाकू नये. अन्यथा शिक्षक त्यांचे दायित्व नीटपणे पार पाडू शकणार नाहीत. विद्यार्थी किंवा पालक यांनी शिक्षकाच्या विरुद्ध तक्रार दिल्यास आधी या प्रकरणाची नीटपणे चौकशी करावी. म्हणजेच गुन्हा नोंद करण्यासाठी ठोस आधार आहे किंवा नाही, हे तपासले गेले पाहिजे.

संपादकीय भूमिका

केवळ शाळेतच नव्हे, तर संसद आणि विधीमंडळ येथेही अध्यक्ष अन् सभापती यांना छडी हातात घेण्याची अनुमती द्यायला हवी, जेणेकरून गदारोळ घालणार्‍या बेशिस्त लोकप्रतिनिधींना वठणीवर आणता येईल !