उद्या २.३.२०२५ (फाल्गुन शुक्ल तृतीया) या दिवशी प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजी यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…
‘सनातनच्या पहिल्या संत प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजी काही वेळा मला स्वप्नात दिसतात किंवा काही वेळा दिवसभर मला त्यांची पुष्कळ वेळ आठवण येते. काही वेळा मला त्यांच्या संदर्भात अनुभवलेली दृश्ये दिसतात किंवा त्यांचा चेहरा एखाद्या चलचित्राप्रमाणे माझ्या डोळ्यांसमोरून जातो. नंतर ‘आमच्या कुटुंबामध्ये काही चांगल्या किंवा वाईट घटना घडतात’, असे मला अनुभवायला येते.

१. प.पू. फडकेआजींचे स्वप्नात दर्शन झाल्यानंतर २ दिवसांनी साधिकेच्या सुनेची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित होणे
‘१८.१.२०१९ या दिवशी मला स्वप्नात प.पू. फडकेआजी काही क्षण दिसल्या होत्या. त्यानंतर २ दिवसांनी २०.१.२०१९ या दिवशी माझी सून सौ. तनुजा निनाद गाडगीळ हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याची आनंदवार्ता समजली.
२. प.पू. फडकेआजींची आठवण झाल्यावर ३ दिवसांनी बहिणीचे निधन होणे

१३.१०.२०२० या दिवशी दोन वेळा मला प.पू. फडकेआजींची आठवण आली. त्यांचा चेहरा काही क्षण माझ्या डोळ्यांसमोर आला. त्यानंतर ३ दिवसांनी १६.१०.२०२० या दिवशी माझी बहीण सौ. निशा मुकुंद बर्वे हिचे निधन झाले.
३. प.पू. फडकेआजींचे स्वप्नात दर्शन झाल्यानंतर ३ दिवसांनी साधिकेच्या मुलीचे सासरे आणि चुलत सासरे यांचे निधन होणे आणि नंतर दोघांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित होणे
२४.१२.२०२१ या दिवशी मला स्वप्नात प.पू. फडकेआजी पुष्कळ वेळ दिसत होत्या. त्यानंतर ३ दिवसांनी म्हणजे २७.१२.२०२१ या दिवशी माझी मुलगी सौ. नम्रता राजेंद्र दिवेकर हिचे सासरे (अनंत दिवेकर, वय ६७ वर्षे) आणि २८.१२.२०२१ या दिवशी तिचे चुलत सासरे (हरिभाऊ दिवेकर, वय ६१ वर्षे) यांचे अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्या दोघांचीही आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले.
४. प.पू. फडकेआजी आणि प.पू. डॉक्टर यांच्या भेटीतील संवाद आठवणे आणि दृश्य स्वरूपात दिसणे, प.पू. डॉक्टरांच्या चरणांचेही दर्शन होणे अन् २ दिवसांनी प.पू. डॉक्टरांचा सत्संग लाभणे
एक दिवस मला सतत प.पू. फडकेआजींची आठवण येत होती. माझ्याकडून त्यांना मधून मधून प्रार्थना होत होती. मला त्यांच्याशी झालेले संवाद आठवत होते, तसेच मला प.पू. आजी आणि प.पू. डॉक्टर यांच्या भेटीतील संवाद जसेच्या तसे आठवले आणि मला ते दृश्य स्वरूपातही दिसत होते. त्यामुळे माझी पुष्कळ भावजागृती होत होती; मात्र मला त्याचे कारण कळत नव्हते. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘मला कधीतरी प.पू. आजींची आठवण येते; मात्र ‘सतत २ दिवस त्यांची आठवण आली’, असे आतापर्यंत कधीही झाले नव्हते.’ मी डोळे बंद केले किंवा माझे डोळे उघडे असले, तरीही मला प.पू. डॉक्टरांच्या चरणांचे दर्शन होत होते. नंतर २ दिवसांनी मला प.पू. डॉक्टरांचा सत्संग लाभला. तेव्हा मला सतत २ दिवस प.पू. फडकेआजींचे दर्शन होण्यामागील कार्यकारणभाव लक्षात आला.
‘प.पू. डॉक्टर, आपणच मला सर्व काही शिकवत आहात आणि प्रत्येक क्षणाला आनंद देत आहात. ‘मला सतत शिकण्याच्या स्थितीत रहाता येऊ दे. आपणच माझ्याकडून आपल्याला अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न करून घ्या’, अशी मी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.’
– श्रीमती मनीषा गाडगीळ (प.पू. फडकेआजी यांची मुलगी (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.८.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |