Rahul And Uddhav  Non- Hindus : महाकुंभात स्नानासाठी न गेलेले राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हिंदु नाहीत !

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा आरोप

रामदास आठवले

नवी देहली – प्रयागराज येथील महाकुंभाचा अधिकृत समारोप २७ फेब्रुवारी या दिवशी झाला. या काळात देश आणि विदेश येथील ६६ कोटी ३० लाख लोकांनी पवित्र स्नान केले; मात्र काँग्रेसचे नेते, तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे महाकुंभामध्ये गेले नाहीत. यावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्यावर टीका केली.

राहुल गांधी , उद्धव ठाकरे हिंदु आहेत कि नाहीत ?

ते म्हणाले की, राहुल गांधीजी आणि आमचे उद्धव ठाकरे साहेब कुंभमेळ्याला गेले नाहीत. राहुल गांधी हिंदु आहेत कि नाहीत? उद्धव ठाकरे हिंदु आहेत कि नाहीत ? जर ते हिंदु असतील, तर त्यांनी कुंभमेळ्याला जायला हवे होते; पण हे लोक कुंभमेळ्याला गेले नाहीत. याचा अर्थ असा की, ते हिंदु धर्मावर विश्‍वास ठेवत नाहीत. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत हिंदु धर्माच्या लोकांनी त्यांना मतदान करू नये. कुंभमेळ्याला न जाण्याचा त्यांना नक्कीच पश्‍चात्ताप होईल.

आठवले पुढे म्हणाले की, हा कुंभ मोदी यांचा नव्हता. हा कुंभ कोणत्याही योगींचा नव्हता. हा कुंभ हिंदु धर्माच्या लोकांचा होता. १४४ वर्षांनंतर झालेल्या कुंभमेळ्याला गांधी आणि ठाकरे या दोन्ही नेत्यांनी उपस्थित रहाण्याची आवश्यकता होती; पण ते गेले नाहीत. म्हणूनच जनतेने त्यांना सत्तेपासून दूर ठेवले आहे. या पुढेही जनता त्यांना धडा शिकवेल आणि राजकारणात त्यांची अवस्था आणखी वाईट होईल.