माघ कृष्ण नवमी (२२.२.२०२५) या दिवशी सनातनच्या १२३ व्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांचा ४३ वा वाढदिवस झाला.
गुरुदेवांच्या कृपेने मला पुणे आणि सातारा येथे पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. त्या वेळी मला त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

१. साधकांची प्रेमभावाने काळजी घेणे
अ. मी रत्नागिरीहून पुणे येथे सेवेला जाणार होतो. पुण्याला जाण्यापूर्वी पू. मनीषाताईंनी माझे पथ्य, शारीरिक त्रास, माझ्या शारीरिक मर्यादा इत्यादींविषयी सर्व विचारून घेतले. ‘मला रात्री १०.३० वाजल्यानंतर जागरण सहन होत नाही. माझा रक्तदाब वाढतो’, हे पू. ताईंना ठाऊक होते. त्यामुळे पुण्यात रात्री १०.३० वाजेपर्यंत सेवा झाल्यावर पू. ताई मला ‘आता तुम्ही विश्रांती घ्या’, असे आवर्जून सांगत असत. ‘पू. ताईंच्या चैतन्यामुळे काही वेळा रात्री अधिक वेळ सेवा करूनही मला आनंद जाणवत होता.
आ. मला रात्री झोपतांना पंखा चालत नाही. माझ्या निवासाच्या ठिकाणी पू. मनीषाताईंनी माझ्या सहसाधकाला भ्रमणभाष करून सांगितले की, ‘‘दादांना पंख्याची गती कमी लागते. त्यामुळे ती कमी ठेवा.’’
२. तीव्र शारीरिक त्रास असतांनाही पू. मनीषाताईंनी अव्याहत प्रसारसेवा करणे
पू. ताईंना तीव्र शारीरिक त्रास आहेत; परंतु त्या त्रास किंवा दुखणे यांचे कारण सांगून कोणतीही सवलत घेत नाहीत. तीव्र शारीरिक त्रास होत असतांनाही त्या पुणे आणि सातारा या जिल्ह्यांत अव्याहत प्रवास करून साधक अन् धर्मप्रेमी यांना संपर्क करतात.
३. विचारून कृती करणे आणि सेवेचा आढावा देणे
पू. मनीषाताई सेवेतील एखादा निर्णय घेतांना सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांना विचारून निर्णय घेतात. सद्गुरु स्वातीताईंनी सांगितलेल्या सूत्रांचे त्या तंतोतंत पालन करतात आणि त्यांना आढावाही देतात.
४. साधकांना आधार वाटणे

अ. आधी मला संतांशी बोलतांना थोडे दडपण यायचे आणि मनमोकळेपणाने बोलता यायचे नाही. पू. मनीषाताईंच्या समवेत सेवा केल्यावर आता माझे दडपण न्यून झाले आहे.
आ. पू. ताई संत असूनही सर्व साधकांमध्ये मिसळतात आणि प्रत्येक साधकाशी मनमोकळेपणाने बोलतात. त्या कधीच साधकांना ‘मला वेळ नाही किंवा मला घाई आहे’, असे सांगत नाहीत. त्या साधकांचे बोलणे पूर्ण ऐकून घेतात आणि त्यांना आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करतात.
इ. पू. ताई साधकांना भावनेच्या स्तरावर हाताळत नाहीत. त्या साधकांच्या चुका अगदी सहजतेने आणि वेळीच लक्षात आणून देतात अन् त्यांना साधनेमध्ये साहाय्य करतात. त्यामुळे साधकांना पू. ताईंचा आधार वाटतो.
ई. अन्य जिल्ह्यांतून काही रुग्णाईत साधक वैद्यकीय उपचारांसाठी पुणे येथे येतात. तेव्हा पू. ताई आणि त्यांचे यजमान श्री. महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४४ वर्षे) हे दोघे रुग्ण साधकांना आवश्यक ते सर्व साहाय्य आस्थेने करतात.
उ. बाहेरील जिल्ह्यांतून पुण्यात आलेल्या साधकांना परतीच्या प्रवासाला जातांना डबा देणे, खाऊ देणे इत्यादी कृती पू. ताई सहजतेने करतात. तेव्हा ‘संत असूनही त्या सर्वांची किती काळजी घेतात’, असा विचार मनाला स्पर्श करून जातो.
५. पू. मनीषाताई यांच्या सहवासामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे अस्तित्व आणि चैतन्य अनुभवता येणे
पू. मनीषाताई सर्व साधकांशी प्रेमाने बोलतात. त्या साधकांच्या गुणांचे कौतुक करतात. त्यांच्या समवेत आलेल्या साधकांचा परिचय करून देतांना साधकांची गुणवैशिष्ट्ये सर्वांना आवर्जून सांगतात. त्यांच्या सत्संगामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अस्तित्व आणि चैतन्य अनुभवता येते.
६. चैतन्याच्या स्तरावर कार्य करणे
अ. प्रसाराची सेवा करत असतांना ‘ऑनलाईन’ किंवा प्रत्यक्ष सत्संग घेणे, भ्रमणभाषवरून सद्गुरु स्वाती खाडये आणि अन्य साधक यांच्याशी समन्वय करणे इत्यादी सेवा पू. ताई अहोरात्र करत असतात.
आ. पू. ताई अगदी थोडा वेळ झोपतात आणि उर्वरित प्रत्येक क्षण सेवेसाठी देतात. असे असूनही त्यांचा उत्साह, स्थिरता अन् चैतन्य दिवसभर टिकून असते. यातून ‘संत चैतन्याच्या स्तरावर कसे कार्य करतात ?’ हे मला अनुभवता आले.
कृतज्ञता
‘इतरांचा विचार करणे, साधकांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांच्या अडचणी सोडवणे, साधकांची काळजी घेणे, त्यांची प्रेमाने विचारपूस करणे, त्यांना आधार देणे, त्यांच्या गुणांचे, तसेच चांगल्या कृतींचे कौतुक करून प्रोत्साहन देणे’, इत्यादी सर्व
पू. मनीषाताईंच्या गुणसंपन्न व्यक्तीमत्त्वाची अभिव्यक्ती आहे. अशा गुणसंपन्न पू. ताई म्हणजे साधकांसाठी शक्ती, चैतन्य आणि आनंद यांचा अखंड स्रोत आहेत. त्या साधकांची प्रीतीस्वरूप आई आहेत. प.पू. गुरुदेवांनी त्यांचा सत्संग देऊन मला शिकण्याची संधी दिली, यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
‘पू. मनीषाताईंमधील गुण आमच्यामध्ये यावेत’, हीच प.पू. गुरुदेवांच्या आणि पू. मनीषाताईंच्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. गोविंद भारद्वाज, रत्नागिरी (११.११.२०२४)
संत सहवासामुळे साधिकेला ‘ऑनलाईन’ सत्संगात स्वत:चे अस्तित्व विसरून सेवा करता येणे आणि संतांची समष्टी रूपाशी असलेली एकरूपता अनुभवता येणे

१. संतांच्या भेटीमुळे साधिकेचे मन दिवसभर स्थिर आणि आनंदी असणे
‘१९.१.२०२४ या दिवशी रात्री मला नेहमीप्रमाणे एका ‘ऑनलाईन’ सत्संगाला उपस्थित रहायचे होते. सत्संगाच्या काही घंटे आधी मला ‘सत्संगात काही सूत्रे घ्यायची आहेत’, असा निरोप मिळाला. कार्यालयातून घरी आल्यावर मला स्वयंपाक इत्यादी घरकामे करायची होती. नंतर लगेच सत्संगाला आरंभ होणार होता. अशा वेळी माझ्या मनात ‘मला सूत्रे घेण्यास जमतील का ? मी पुष्कळ थकले आहे’, इत्यादी नकारात्मक विचार असायचे. त्या दिवशी सकाळी माझी पू. मनीषा पाठक (सनातन संस्थेच्या १२३ व्या समष्टी संत, वय ४३ वर्षे) यांच्याशी भेट झाली होती. दिवसभर मला त्यांचे स्मरण होत होते. मी विशेष काही प्रयत्न केले नव्हते; पण माझे मन स्थिर आणि आनंदी होते.
२. सत्संगात साधिकेने भावजागृतीसाठी प्रयोग घेतल्यानंतर तिला, तसेच उपस्थित असलेल्या पुष्कळ साधकांना सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे रामस्वरूपात अस्तित्व जाणवणे
रात्री मी सत्संगात सहभागी झाले. त्या वेळी माझ्या मनात एकही नकारात्मक विचार आला नाही. काही वेळाने सत्संगात मी विषय मांडण्यास आरंभ केला. त्यात प्रभु श्रीरामचंद्रांच्या संदर्भात सूत्रे होती. ती सूत्रे घेतांना मला सहजच एक भावजागृतीसाठी प्रयोग सुचला. तो भावजागृतीचा प्रयोग घेतांना मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे रामरूपात दर्शन झाले आणि माझा भाव जागृत झाला. मला वातावरणात पुष्कळ चैतन्य पसरल्याची, तसेच शांतीची अनुभूती आली. भावजागृतीचा प्रयोग झाल्यानंतर सत्संगाला उपस्थित असलेल्या अनेक साधकांनी सत्संगात सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे रामस्वरूपात अस्तित्व जाणवल्याचे सांगितले.
३. पू. मनीषा पाठक यांच्या समष्टी भावामुळे साधकांना भावावस्था अनुभवता येणे
भावस्थितीतून बाहेर आल्यावर वरील सत्संगाचे चिंतन करतांना माझ्या लक्षात आले, ‘पू. मनीषाताईंच्या स्मरणाने आणि त्यांच्यातील समष्टी भावामुळे सत्संगातील सर्वांना भावावस्था अनुभवता आली.’ असे सत्संग नियमित होतात; पण तेव्हा कधी मी भाव ठेवत नाही. त्यामुळे मला कर्तेपणा आणि थकवाही जाणवायचा. ‘त्या दिवशी मिळालेल्या संत सहवासामुळेच मला ‘स्व’चे अस्तित्व विसरून समष्टीत सेवा केल्याने चैतन्य कसे मिळते ?’, याची अनुभूती आली.
४. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘संत स्वत: समष्टीशी एकरूप झालेले असतात अन् त्यांच्या केवळ स्मरणाने माझ्यासारख्या क्षुद्र जिवांना भाव आणि चैतन्य यांच्या स्तरावर लाभ होतो’, हे मला अनुभवता आले. याविषयी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘हे गुरुदेवा, तुम्ही मला अखंड संत सहवास देत आहात. त्याचा मला आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेता येऊ दे आणि तुम्हाला अपेक्षित असे घडता येऊ दे, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. स्नेहल केतन पाटील (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय २७ वर्षे), सिंहगड रस्ता, पुणे. (२०.१.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |