Ajay Kumar Sonkar : गंगा नदीचे पाणी शुद्ध असून शंका असणार्‍यांनी माझ्या प्रयोगशाळेत येऊन समाधान करून घ्यावे !

पद्मश्री पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञ डॉ. अजय कुमार सोनकर यांचे आवाहन

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – गंगा नदीचे पाणी केवळ अंघोळीसाठी योग्य नाही, तर ते पिण्याच्या पाण्याइतकेच शुद्धदेखील आहे. ज्याला थोडीशी जरी शंका असेल, त्याने माझ्यासमोर गंगाजल घ्यावे आणि प्रयोगशाळेत त्याची चाचणी करून समाधानी व्हावे, असे आवाहन पद्मश्री पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञ डॉ. अजय कुमार सोनकर यांनी केले आहे. त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत गंगा नदीच्या पाण्याची तपासणी केल्यावर हे विधान केले.
शास्त्रज्ञ डॉ. सोनकर यांनी त्रिवेणी संगम आणि अन्य ५ घाटांच्या ठिकाणातून गंगा नदीचे पाणी गोळा केले आहे. त्यांनी ३ महिने सतत केलेल्या संशोधनातून गंगा नदीचे पाणी सर्वांत शुद्ध असल्याचे सिद्ध झाले. गंगा नदीत या ठिकाणी अंघोळ केल्याने कोणत्याही प्रकारची हानी होऊ शकत नाही. त्याची शुद्धता प्रयोगशाळेत पूर्णपणे सिद्ध झाली आहे.

बॅक्टेरियोफेजचा चमत्कार : गंगा नदीची नैसर्गिक शुद्धीकरण शक्ती

डॉ. सोनकर यांना संशोधनात असे आढळून आले की, गंगा नदीच्या पाण्यात १ सहस्र १०० प्रकारचे बॅक्टेरियोफेज असतात, जे कोणत्याही हानीकारक जीवाणूंचा नाश करतात. हेच कारण आहे की ५७ कोटींहून अधिक भाविकांनी गंगेच्या पाण्यात स्नान केल्यानंतरही तिचे पाणी दूषित झालेले नाही. गंगा नदीचे पाणी त्याच्या नैसर्गिक शक्तीमुळे अजूनही रोगमुक्त आहे.

डॉ. सोनकर यांनी सांगितले की,

१. गंगा नदीच्या पाण्यातील आम्लता (पीएच्) सामान्यपेक्षा चांगली होती आणि त्यात कोणतीही दुर्गंधी किंवा बॅक्टेरियाची वाढ आढळली नाही. विविध घाटांमधून घेतलेल्या नमुन्यांमध्ये प्रयोगशाळेत पीएच् पातळी ८.४ ते ८.६ पर्यंत आढळून आली., जी फारच चांगली मानली जाते. पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत १४ घंटे उष्म तापमानावर ठेवल्यानंतरही त्यामध्ये कोणत्याही हानीकारक जीवाणूंची वाढ झाली नाही. गंगाजल केवळ आंघोळीसाठी सुरक्षित नाही, तर त्याच्या संपर्कात आल्याने त्वचेचे आजारही होत नाहीत.

२. पाण्यात बॅक्टेरियांची वाढ पाणी आम्लयुक्त बनवते. अनेक जीवाणू त्यांच्या चयापचय प्रक्रियेचा भाग म्हणून आम्लयुक्त उप-उत्पादने निर्माण करतात, ज्यामुळे पाण्याचे पीएच् पातळी अल्प होते. जसे बॅक्टेरिया पोषक तत्त्वे खातात, ते लॅक्टिक आम्ल किंवा कार्बोनिक आम्ल यांसारखे आम्लयुक्त संयुगे सोडतात. त्यामुळे पीएच् अल्प होतो.

…तर हाहाःकार उडाला असता !

डॉ. सोनकर म्हणाले की, महाकुंभाच्या संदर्भात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे महाकुंभाच्या आधीपासून ‘गंगा नदीचे पाणी अत्यंत प्रदूषित आहे’, असा अपप्रचार केला जात आहे; परंतु जर अशी परिस्थिती खरोखरच असती, तर आतापर्यंत जगात हाहाःकार उडाला असता. रुग्णालयांमध्ये पाय ठेवण्यासाठीही जागा उरली नसती. गंगामातेची स्वतःला शुद्ध करण्याची अद्भुत शक्ती आहे की, ५७ कोटी भाविकांहून अधिक लोकांनी स्नान केल्यानंतरही कोणालाही त्रास झाला नाही. अपप्रचार करणार्‍यांना विचारले पाहिजे की, जर गंगा नदीचे पाणी दूषित आहे, तर या ५७ कोटी भाविकांपैकी एकाही भक्ताला कोणत्याही प्रकारच्या आजाराची तक्रार का आढळली नाही ?

हे ही वाचा → गंगाजलावरील एक अचंबित करणारे वैज्ञानिक निरीक्षण !

संपादकीय भूमिका 

‘बाप दाखव, नाहीतर श्राद्ध कर’ अशाच प्रकारची भाषा आता तथाकथित बुद्धीप्रमाण्यवादी आणि विज्ञानवादी यांच्याशी करणे आवश्यक आहे, तरच त्यांच्या कथित बुद्धीचा अहंकार ठेचला जाईल !