प्रयागराज कुंभपर्व २०२५
‘के.ई.एम्. रुग्णालया’तील सुप्रसिद्ध फुफ्फुसरोगतज्ञ दिवंगत डॉ. एस्.आर्. कामत यांची एक अतिशय रोचक वैज्ञानिक नोंद आहे. त्यांनी काही वर्षांपूर्वी अलाहाबादमध्ये (आजचे प्रयागराज) कुंभमेळा होणार असल्याने गंगाजलाचा सूक्ष्मजैविक अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. कुंभमेळ्यात लाखो लोक गंगेत स्नान करतात; पण कुणालाही संसर्ग होत नाही ! हे आश्चर्यकारक वास्तव पहाता डॉ. कामत यांनी वैज्ञानिक दृष्टीकोनातून गंगाजलाची पडताळणी करण्याचे ठरवले.

त्यांनी एका व्यक्तीला निर्जंतुक बाटल्यांसह पाठवले आणि नदीच्या काठावरून, नदीत थोडेसे आत जाऊन, दुसर्या किनार्यावरून, अगदी मध्यभागातून अन् सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जिथे सर्वाधिक लोक स्नान करत होते त्या ठिकाणाहून, अशा ५ वेगवेगळ्या ठिकाणांहून पाणी गोळा करण्याच्या सूचना दिल्या. या ५ नमुन्यांपैकी एक संच डॉ. कामत यांनी बॅक्टेरियोलॉजिकल अभ्यासासाठी प्रयोगशाळेत पाठवला, तर दुसरा संच ‘हाफकिन संस्थे’ला ‘बॅक्टेरियोलॉजी’ आणि ‘व्हायरोलॉजी’ चाचणीसाठी दिला. याचे आलेले निकाल थक्क करणारे होते !
प्रयोगशाळेतील पाचही नमुन्यांमध्ये कोणतीही जीवाणू (बॅक्टेरिया) आढळले नाहीत ! ‘हाफकिन’ला पाठवलेल्या पाचही नमुन्यांमध्येही कोणतेही बॅक्टेरिया नव्हते; मात्र त्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर ‘बॅक्टेरिओफेज’ आढळले ! हीच गंगाजलातील विलक्षण वैज्ञानिक गोष्ट आहे. यामुळेच लाखो लोक गंगेत स्नान करूनही आजवर कुंभमेळ्यात कोणताही साथीचा रोग पसरलेला दिसत नाही ! हे एक प्रत्यक्ष अनुभवलेले गंगाजलाचे अद्भुत वैज्ञानिक सत्य आहे !
‘बॅक्टेरिओफेज’ म्हणजे काय ?
‘बॅक्टेरिओफेज’ हे बॅक्टेरियांना नष्ट करणारे विषाणू असतात, म्हणजेच गंगेच्या पाण्यात संक्रमण करणारे बॅक्टेरिया वाढतच नाहीत; कारण त्यांना नष्ट करणारे ‘बॅक्टेरिओफेज’ मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतात.
(फुफ्फुसरोगतज्ञ दिवंगत डॉ. एस्.आर्. कामत यांचा अभ्यास)