Assam Illegal Foreigners : आसाममध्ये १ लाख ६६ सहस्र घुसखोरांची ओळख पटली, तर ३० सहस्रांना हाकलून लावले ! – मंत्री अतुल बोरा

मंत्री अतुल बोरा

गौहत्ती (आसाम) – आसाममध्ये सुमारे १ लाख ६६ सहस्र बेकायदेशीर स्थलांतरितांची ओळख पटली आहे. यांपैकी ३० सहस्र १०० हून अधिक लोकांना राज्यातून हद्दपार करण्यात आले आहे. आसाम कराराच्या कार्यवाहीविषयी काँग्रेस आमदार अब्दुर रहीम अहमद यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात राज्य सरकारचे मंत्री अतुल बोरा यांनी ही माहिती दिली.

मंत्री अतुला बोरा यांनी सांगितले की, ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत आसाममध्ये १ लाख ६५ सहस्र ५३१ बेकायदेशीर स्थलांतरित आढळून आले आहेत. यांपैकी ३२ सहस्र ८७० लोक वर्ष १९६६ ते १९७१ या काळात आले होते. वर्ष १९७१ नंतर १ लाख ३२ सहस्र ६६१ लोक आले आहेत.

बांगलादेश सीमेवरील २२८ किलोमीटरवर कुंपण घालण्याचे काम पूर्ण

भारत-बांगलादेश सीमेवर काटेरी तारांचे कुंपण बसवण्याच्या संदर्भातील एका वेगळ्या प्रश्नाचे उत्तरही मंत्री अतुल बोरा यांनी दिले. बांगलादेशासमवेतच्या एकूण २६७.५ किलोमीटरच्या आंतरराष्ट्रीय सीमेपैकी २२८ किलोमीटरवर कुंपण घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. एकूण सीमेपैकी १७१ कि.मी. भूमीवर आहे आणि उर्वरित ९५ कि.मी. पाण्यात आहे.

संपादकीय भूमिका 

संपूर्ण देशातून घुसखोरांना कधी बाहेर काढले जाणार ?