Sanatan Prabhat Exclusive : हिंदु राष्ट्राची स्थापना होऊन नोटांवर श्रीरामाचे चित्र छापले जाईल !

तपस्वी महंत चेतन गिरि महाराज यांची भविष्यवाणी !

महंत चेतन गिरि महाराज

प्रयागराज, १५ फेब्रुवारी (वार्ता.) – भारत हिंदु राष्ट्र होईल. हिंदु राष्ट्रामध्ये नोटा पालटल्या जातील. नोटांवर भगवान श्रीरामांचे चित्र छापले जाईल, अशी भविष्यवाणी श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे तपस्वी महंत चेतन गिरि महाराज यांनी केली. महाकुंभमेळ्यामध्ये ‘सनातन प्रभात’ने महंत चेतन गिरि महाराज यांची भेट घेतली. हिंदु राष्ट्राविषयी ईश्‍वराचे संकेत काय आहेत ? याविषयी विचारणा केली असता महंतांनी वरील उद्गार काढले.

महंत चेतन गिरि महाराज यांनी मस्तकावर अनेक रुद्राक्ष धारण केले आहेत. याविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘रुद्राक्ष भगवान शिवाच्या अश्रूपासून निर्माण झाले आहेत. त्यामुळे ते अमृततुल्य मानले जातात. रुद्राक्ष भगवान शिवाचे आभूषण आहेत. जगाला आनंद, तसेच शांती देण्यासाठी, भक्तांची बाधा टाळण्यासाठी शिवगण रुद्राक्ष धारण करून तपश्‍चर्या करतात. रुद्राक्ष पंचतत्त्वाचे प्रतीक आहेत. रुद्राक्षाचे पाणी प्यायल्याने हृदयविकारासारखे विकारही बरे होतात.’’

महंतांना त्यांच्या साधनेसंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, आम्ही गुफेमध्ये रहातो. निरंतर भगवान शिवाची उपासना, ध्यान आणि योगासने करतो. ५ वेळा संध्यावंदन करतो.

हिंदूंना साधनेविषयी आवाहन करतांना महंत म्हणाले, ‘‘प्रात:काळी लवकर उठून स्नान-ध्यान करावे. माता-पिता यांना वंदन करावे. हनुमान चालिसा, सुंदरकांड आदींचे पठण करावे. योगासने करावीत. ती केल्याने शरीर स्वस्थ, मंगलदायी आणि आनंदमय रहाते. प्रात:काळी उठणार्‍याला अष्टसिद्धी, नऊ रिद्धी प्राप्त होतात. प्रात:काळी लवकर उठणार्‍याला भगवान सूर्य ज्ञान प्रदान करतात आणि त्याची मनोकामना पूर्ण करतात.’’

मंदिरे पाडून मशिदी बांधलेल्या ठिकाणी पुन्हा मंदिरे उभारली जातील !

अयोध्येमध्ये प्रभु श्रीरामांचे मंदिर उभारण्यात आले; मात्र मुगलांनी पाडलेल्या अन्य मंदिरांची उभारणी कधी होईल ? याविषयी विचारले असता महंत चेतन गिरि महाराज म्हणाले, ‘‘मुगलांनी हिंदूंची मंदिरे पाडून मजार आणि मशिदी उभारल्या. जेथे जेथे मजार किंवा मशिदी बांधल्या गेल्या, त्या ठिकाणी हिंदु राष्ट्रात पुन्हा मंदिरांची उभारणी केली जाईल.’’