King Edward Memorial Name Change : अजमेरमधील ‘किंग एडवर्ड मेमोरियल’चे नाव पालटून ‘महर्षि दयानंद विश्रामगृह’ केले, तर ‘फॉय सागर’चे नाव ‘वरुण सागर’ केले !

‘वरुण सागर’ तलाव आणि महर्षि दयानंद विश्रामगृह

अजमेर (राजस्थान) – राजस्थान सरकारने अजमेर येथील ‘किंग एडवर्ड मेमोरियल’चे नाव पालटून ‘महर्षि दयानंद मेमोरियल’ असे केले आहे. त्याचप्रमाणे, ‘फॉय सागर’ तलावाचे नावही ‘वरुण सागर’ असे पालटण्यात आले आहे. राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष आणि अजमेर उत्तरचे आमदार वासुदेव देवनानी यांनी नुकतेच सांगितले की, अजमेर महानगरपालिकेने आदेश जारी केल्यानंतर तलाव आणि स्मारक यांची नावे पालटण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

१. वासुदेव देवनानी म्हणाले की, अजमेरमध्ये १३२ वर्षे जुना ‘फॉय सागर’ होता ज्याचे नाव एका इंग्रजी अभियंत्याच्या नावावर होते. आता तलावाचे नाव पालटून त्याला जलदेवता ‘वरुण’चे नाव देण्यात आले आहे.

२. देवनानी म्हणाले की, हळूहळू तलावाच्या जवळ वरुणदेवाची मूर्ती स्थापित केली जाईल आणि एक घाटही बांधला जाईल. तेथे लोक बसून प्रार्थना करू शकतील.

३. विधानसभा अध्यक्ष म्हणाले, ‘‘अजमेरच्या रेल्वे स्टेशन रोडवरील ११३ वर्षे जुन्या ‘किंग एडवर्ड मेमोरियल’ इमारतीचे नावही पालटण्यात आले आहे. आता त्याचे नाव पालटून ‘महर्षि दयानंद विश्रामगृह’ असे करण्यात आले आहे. अजमेर हे महर्षि दयानंद सरस्वती यांचे निर्वाणस्थान आहे.’’

४. वासुदेव देवनानी म्हणतात की, स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही अजमेरमध्ये गुलामगिरीची काही चिन्हे अस्तित्वात होती, ज्यामुळे आपल्या मनात गुलामगिरीची मानसिकता निर्माण होत असे. त्यामुळे सरकारने नाव पालटण्याचा निर्णय घेतला.

संपादकीय भूमिका

गुलामगिरीची चिन्हे हटवणारे अजमेर महानगरपालिका आणि राजस्थानमधील भाजप सरकार यांचे अभिनंदन !