Global Firepower Index 2025 : भारतीय सैन्य जगात चौथ्या, तर पाकचे सैन्य १२ व्या स्थानी !

नवी देहली – जगातील सर्वोच्च सैन्यांची क्रमवारी जाहीर करणारी संस्था ‘ग्लोबल फायरपावर इंडेक्स’ने वर्ष २०२५ ची सूची घोषित केली आहे. यात भारतीय सैन्य चौथ्या स्थानावर आहे. जगातील सर्वांत शक्तीशाली सैन्याच्या सूचीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. यानंतर रशिया, चीन आणि भारत यांचा क्रमांक लागतो. या सूचीमध्ये भारताचे वर्णन ‘एक महत्त्वाची सैन्य शक्ती’ म्हणून करण्यात आले आहे. हा निर्देशांक सैनिकी तुकड्या, आर्थिक स्थिती, संरक्षणाची तरतूद, सुविधा क्षमता इत्यादींसह ६० पेक्षा अधिक निकष पाहून काढला जातो.

पाकिस्तानचे सैन्य १२ व्या क्रमांकावर आहे !

भारताचा शेजारी देश पाकिस्तानकडे अण्वस्त्रे असली, तरी या निर्देशांकात तो अजूनही पहिल्या १० देशांमध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. या निर्देशांकात पाकिस्तान १२ व्या क्रमांकावर आहे आणि तो ब्राझिलपेक्षाही खाली आहे. भारतामागे पाचव्या स्थानी दक्षिण कोरिया, त्यानंतर युनायटेड किंगडम, फ्रान्स, जपान, तुर्कीये, इटली, ब्राझिल आणि नंतर पाकचा क्रमांक लागतो. भारतावर कुरघोडी करू पहाणारा कॅनडा या क्रमवारीत २८ व्या क्रमांकावर आहे.

भारताचे वायूदल आणि नौदल शक्तीशाली

वायूदल आणि नौदल यांच्या संदर्भातही भारत पाकिस्तानपेक्षा पुष्कळ पुढे आहे. या क्रमवारीत पाकिस्तानचे वायूदल ७ व्या स्थानावर आहे, तर भारतीय वायूदल पहिल्या ५ मध्ये आहे. भारतीय नौदल सहाव्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तानी नौदल २७ व्या क्रमांकावर आहे.

भारताकडे  ५१ लाख ३७ सहस्र सैनिक, तर पाककडे १७ लाख ४ सहस्र

भारताकडे एकूण सैनिक ५१ लाख ३७ सहस्र आहे, ज्यामध्ये १४ लाख ५५ सहस्र  लाख सक्रीय सैनिक आणि ११ लाख ५५ सहस्र राखीव सैनिक आहेत. पाकिस्तानकडे एकूण सैनिक १७ लाख ४ सहस्र आहे. ६ लाख ५४ सहस्र सैनिक सक्रीय आणि ५ लाख ५० सहस्र राखीव सैनिक आहेत.

संपादकीय भूमिका

असे असूनही पाकपुरस्कृत आतंकवादी गेली ३५ वर्षे भारतीय सैन्याला डोकेदुखी ठरले आहेत आणि काश्मीर अशांतच राहिला आहे ! संख्येपेक्षा उपद्रव मूल्य किती आहे, याकडेही पहाणे आवश्यक आहे. भारताचे उपद्रव मूल्य शून्य आहे, असेच म्हणावे लागले !

‘ग्लोबल फायरपावर इंडेक्स’च्या संकेतस्थळावर पाकव्याप्त काश्मीरला दाखवले पाकच्या नकाशात !

‘ग्लोबल फायरपावर इंडेक्स’च्या globalfirepower.com या संकेतस्थळावर पाकव्याप्त काश्मीरला पाकिस्तानच्या नकाशात दाखवण्यात आले आहे, तर भारताच्या नकाशात पाकव्याप्त काश्मीरचा भाग भारताच्या नकाशात दाखवण्यात आलेला नाही.

संपादकीय भूमिका

गेली ७८ वर्षे भारत सरकारने पाकव्याप्त काश्मीरचे सूत्र भिजत ठेवल्याचाच हा परिणाम आहे. आतातरी भारताने पाकिस्तानी सैन्यावर आक्रमण करून पाकव्याप्त काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग बनवला पाहिजे.