
मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थीदशेतच असतो. जीवनामध्ये पावलोपावली परीक्षा देऊन उत्तीर्ण व्हावे लागते. या जीवन संघर्षालाच ‘संसार’ असे म्हटले आहे. या संघर्षाला शिक्षकही अपवाद नाहीत. गतवर्षी नोव्हेंबर मासामध्ये ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (टीईटी) घेण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यभरातून १२ सहस्र ५३० ‘शिक्षक परीक्षार्थी’ परीक्षेला बसले होते. परीक्षा झाल्यानंतर त्याची उत्तरसूचीही घोषित करण्यात आली. आता या परीक्षेला २ मास उलटले आहेत; मात्र अजूनपर्यंत ‘टीईटी’ परीक्षेचा निकाल घोषित झालेला नाही. यामुळे भावी शिक्षक संभ्रमात आहेत. भावी शिक्षकांना अजूनही पुढे ‘शिक्षक अभियोग्यता परीक्षा’ (टीएआयटी) ही पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे; मात्र त्यासाठी टीईटीचा निकाल लागणे आवश्यक आहे. ‘हा निकाल नियोजित वेळापत्रकाप्रमाणे घोषित व्हावा’, अशी मागणी आता शिक्षक उमेदवारांकडून केली जात आहे. ‘महाराष्ट्र परीक्षा परिषदे’ने टीईटी परीक्षेची उत्तरसूची गतवर्षीच्या डिसेंबर मासामध्ये घोषित केली होती. त्याप्रमाणे ‘परीक्षेमध्ये किती गुण मिळाले असतील ?’, याचा अंदाज उमेदवारांनी बांधला असणार आहे; मात्र परिषदेने घोषित केलेल्या उत्तरसूचीमध्ये उमेदवारांना काही त्रुटी जाणवल्या आहेत. याविषयी त्यांनी परिषदेशी संपर्क साधून त्रुटींची पूर्तता करण्यासाठी परिषदेकडे तसा प्रस्तावही पाठवला आहे. तरीही अजूनपर्यंत अंतिम निकाल प्रलंबित आहे.
परिषदेच्या या पवित्र्यामुळे शिक्षक परीक्षार्थी मोठ्या चिंतेत आहेत. पुढील काही मासात ‘शिक्षक अभियोग्यता परीक्षा’ होणार असल्यामुळे परीक्षार्थी टीईटीच्या निकालाची मोठ्या आतुरतेने वाट पहात आहेत. ‘महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदे’च्या या सावळ्या गोंधळाचा फटका शिक्षक परीक्षार्थींना बसत आहे. ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे’चे टीईटीसाठी कुठलेही धोरण नसल्यामुळे नियोजित वेळापत्रक पूर्णतः कोलमडले आहे’, अशी ओरड परीक्षार्थी करत आहेत. यामुळे कुणी वयात बसत नसल्याने बाजूला होत आहे, तर कुणी स्वतःहून या त्रासापासून दूर होत आहे. वेळेत परीक्षा आणि शिक्षकसेवेत भरती होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे आता डी.एड. आणि बी.एड. करण्याचे प्रमाणही न्यून झाले आहे. ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे’ने यावर उपाय म्हणून वर्षातून २ वेळा टीईटी परीक्षा घ्यावी, अशी मागणी परीक्षार्थी करत आहेत. यामुळे लवकर निकाल लागून भावी शिक्षकांच्या नियुक्त्या वेळेत होतील, अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. शालेय विद्यार्थी आणि शिक्षक दोघांच्याही भवितव्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने ‘निदान शिक्षकांच्या परीक्षा आणि निकाल वेळेत कसे होतील’, हे पहायला हवे. यावरून बोध घेऊन ‘विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेत घेऊन वेळेत निकाल लावणे का आवश्यक आहे ?’, हे शिक्षकांच्याही चांगलेच लक्षात आले असेल.
– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा