
प्रयागराज, २८ जानेवारी (वार्ता.) – पुरी येथील गोवर्धनपीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत भाविकांनी उत्स्फूर्तपणे ‘हम भारत भव्य बनायेंगे, हम हिन्दू राष्ट्र बनायेंगे’ (आम्ही भव्य भारत बनवू, आम्ही हिंदु राष्ट्र बनवू), असा हिंदु राष्ट्राचा जयघोष केला. महाकुंभामध्ये गोवर्धनपीठाच्या शिबिरामध्ये जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे मार्गदर्शन झाल्यावर त्यांचे दर्शन घेतांना भाविकांनी या घोषणा दिल्या.

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती मार्गदर्शनानंतर व्यासपिठावरून खाली उतरत असतांना भाविकांनी हात उंचावून हिंदु राष्ट्राचा उद्घोष केला. शंकराचार्यांच्या गोवर्धनपीठाच्या वतीने ‘हम हिन्दू राष्ट्र बनायेंगे, भारत भव्य बनायेंगे’ असे लिखाण असलेले होर्डिंग कुंभमेळ्यामध्ये ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे छायाचित्र असलेले हे होर्डिंग लक्षवेधी ठरत आहेत.