Prayagraj Kumbh Parva 2025 : ‘सनातन बोर्ड’ स्थापन होईपर्यंत शांत बसणार नाही ! – श्री निंबार्क पीठाधीश्‍वर जगद्गुरु श्री श्रीजी महाराज

प्रयागराज कुंभपर्व २०२५

  • श्री निंबार्क पीठाधीश्‍वर जगद्गुरु श्री श्रीजी महाराज यांची प्रयागराजमधील धर्मसंसदेत गर्जना

  • हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचीही वंदनीय उपस्थिती !

धर्मसंसदेत बोलतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

प्रयागराज, २८ जानेवारी (वार्ता.) – सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी ‘सनातन बोर्डा’ची आवश्यकता आहे. येणार्‍या काळात हा बोर्ड झाल्याविना रहाणार नाही आणि हा बोर्ड स्थापन होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशी गर्जना श्री निंबार्क पीठाधीश्‍वर जगद्गुरु श्री श्रीजी महाराज यांनी येथे केली. कुंभक्षेत्री सेक्टर १८ मधील शांती सेवा शिबिरात २७ जानेवारीला आयोजित करण्यात आलेल्या चतुर्थ सनातन धर्मसंसदेत ते बोलत होते.

या वेळी प्रसिद्ध कथावाचक श्री देवकीनंदन ठाकूर, जगद्गुरु स्वामी विद्याभास्करजी महाराज, जगद्गुरु स्वामी राघवाचार्यजी महाराज, पू. चिन्मयानंद बापू, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, ‘इस्कॉन’चे प्रमुख गौरांग दास, साध्वी सरस्वती, साध्वी प्राची, बालयोगी महाराज, भाग्यनगरचे आमदार टी. राजासिंह, अभिनेत्री तथा भाजपच्या खासदार हेमा मालिनी आदी मान्यवर उपस्थित होते. या संसदेला देशभरातील सहस्रो धर्मप्रेमी, भाविक, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारीसुद्धा उपस्थित होते.

कथावाचक श्री देवकीनंदन ठाकूर

धर्मसंसदेचा आरंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. याप्रसंगी शंखनाद करण्यात आला. प्रास्ताविक कथावाचक श्री देवकीनंदन ठाकूर यांनी केले. संपूर्ण धर्मसंसदेत उपस्थित वक्त्यांसह भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी वक्फ बोर्ड रहित करण्याची जोरदार मागणी केली. यासह ‘जय श्रीराम’, ‘हिंदु राष्ट्र’, ‘भारतमाता की जय’ आदी उत्स्फूर्त घोषणा दिल्या.

आपण इतिहास जाणून घेतला नाही, तर भूगोल कसा पालटणार ? – जगद्गुरु स्वामी विद्याभास्करजी महाराज

जगद्गुरु स्वामी विद्याभास्करजी महाराज

जगद्गुरु स्वामी विद्याभास्करजी महाराज म्हणाले, ‘‘आपण आज भारतात हिंदु राष्ट्राची मागणी करत आहोत; परंतु आपण जाणून घेतले पाहिजे की, राजा दशरथाचे राज्य संपूर्ण पृथ्वीवर होते. भागवद् महापुराणात हा सर्व इतिहास आहे. आपण इतिहास जाणून घेतला नाही, तर भूगोल कसा पालटणार ? सनातन शास्त्रांचे रक्षण करणार्‍या सनातन बोर्डाची नितांत आवश्यकता आहे.’’

सनातन बोर्ड सरकारी नसावे ! – जगद्गुरु स्वामी राघवाचार्यजी महाराज

जगद्गुरु स्वामी राघवाचार्यजी महाराज

जगद्गुरु स्वामी राघवाचार्यजी महाराज म्हणाले, ‘‘सनातन बोर्ड सरकारी नसावे. त्यावर आपले चारही शंकराचार्य, चारही संप्रदायांचे पीठाधीश्‍वर, आखाड्यांचे आचार्य महामंडलेश्‍वर, श्रीमहंत आदींची एकत्रित व्यवस्थापन समिती असावी. भारतच नाही, तर संपूर्ण पृथ्वीवर आपला अधिकार आहे.’’

हिंदूंना आता रौद्र रूप धारण करावे लागेल ! – भाजप आमदार टी. राजासिंह

टी. राजासिंह

तेलंगाणातील भाजप आमदार टी. राजासिंह म्हणाले, ‘‘वक्फ बोर्डाकडे पूर्वी २ लाख एकर असलेली भूमी आता १० लाख एकर झाली आहे. देशात संरक्षण विभाग (१८ लाख एकर) आणि रेल्वे विभाग (१२ लाख एकर) यांच्यानंतर सर्वाधिक भूमी असणार्‍यांच्या सूचीत वक्फ बोर्डाचा (१० लाख एकर भूमी) क्रमांक लागतो.

आपली मंदिरे आणि शेतकरी यांच्या या भूमी बळकावण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या परत घेण्यासाठी सनातन बोर्ड हवेच. यासह हिंदु धर्मावरील लव्ह जिहाद, लँड जिहाद, गोहत्या आदी आघात रोखणार्‍या हिंदूंसाठी हा बोर्ड कवच म्हणून काम करेल. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व साधू-संतांशी चर्चा करून हा बोर्ड बनवावा. हिंदूंनी ४ वेळा सनातन बोर्डाची मागणी केली आहे, तरीही ते स्थापन झालेले नाही. त्यामुळे हिंदूंना आता त्यासाठी रौद्र रूप धारण करावे लागेल.’’

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे, हेच सर्व प्रश्‍नांचे प्रभावी उत्तर ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘ही धर्मसंसद हे १०० कोटी हिंदूंच्या भावनांची अभिव्यक्ती आहे. या आधीच आपण १५ टक्के लोकसंख्येला ३० टक्के भूमी दिलेली आहे. आता वक्फ बोर्डाच्या माध्यमातून १० लाख एकर भूमी देण्यात आली आहे. ही दुसर्‍या विभाजनाचीच नांदी आहे.

आपला देश ‘सेक्युलर’ असतांना वक्फ बोर्डाला निधी पुरवला जाऊन इसलामचे रक्षण केले जात आहे, तसेच त्याची वाढ केली जात आहे. वक्फ बोर्डाच्या माध्यमातून भारताच्या इस्लामीकरणाचे प्रयत्न होत आहेत. पूर्वी राजे मंदिराच्या उभारणीसाठी निधी द्यायचे. आता ते मंदिराच्या निधीतून राज्य करत आहेत. हे मोठे पाप आहे. आपल्यासमोर असलेल्या सर्व प्रश्‍नांचे ‘सनातन बोर्डची निर्मिती आणि भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे’, हेच प्रभावी उत्तर आहे.’’

‘सनातन हिंदु बोर्ड अधिनियमा’चा प्रस्ताव संमत !

या प्रसंगी ‘सनातन हिंदु बोर्ड अधिनियमा’चा प्रस्ताव मांडण्यात आला. या अधिनियमाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे की, ‘‘हा अधिनियम भारतातील हिंदूंची मंदिरे, मंदिरांची संपत्ती, निधी आणि सनातन धार्मिक परंपरांचे व्यवस्थान, संरक्षण आणि देखरेख यांसाठी एक केंद्रीयकृत सनातन हिंदु बोर्डाची स्थापना करेल. याचा प्रमुख उद्देश सनातन धर्म आणि त्याचा सांस्कृतिक वारसा यांचे रक्षण करून मंदिरांच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणि त्याचे दायित्व सुनिश्‍चित करणे’, हा आहे.’’ उपस्थित सर्वांनी हात उंचावून या प्रस्तावास मान्यता दिली.