हिंदु धर्माच्या पवित्र आणि शुद्ध स्वरूपावर होत आहेत आघात ! – चक्रवर्ती सुलीबेले, संस्थापक, युवा ब्रिगेड

बंटवाल (कर्नाटक) येथील स्पर्श कलामंदिरामध्ये पार पडले प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन !

श्री. चक्रवर्ती सुलीबेले

बंटवाल (कर्नाटक) – होळीचा उत्सव किंवा दिवाळी असू दे, हिंदूंना संस्कृतीवर होणार्‍या आक्रमणाला तोंड द्यावे लागत आहे. या आक्रमणाच्या माध्यमातून हिंदु धर्माच्या पवित्र आणि शुद्ध तत्त्वावर (स्वरूपावर) आघात होत आहेत, असे विधान ‘युवा ब्रिगेड’चे संस्थापक श्री. चक्रवर्ती सुलीबेले यांनी केले. बंटवाल येथील स्पर्श कलामंदिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडले, त्या वेळी ते बोलत होते. या अधिवेशनाचे उद्घाटन अदामरू मठाचे श्री ईशाप्रियातीर्थ स्वामीजी, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रामानंद गौडा, कर्नाटक उच्च न्यायालयाचे अधिवक्ता कृष्णमूर्ती, श्री. चक्रवर्ती सुलीबेले, उद्योजक श्री. एम्.जे. शेट्टी आणि समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या अधिवेशनाला ८०० राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी, तसेच हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

दीपप्रज्वलन करतांना मान्यवर

या अधिवेशनात ‘हिंदु राष्ट्र : आक्षेप आणि खंडण’ अन् ‘उत्सव साजरे करण्याची योग्य पद्धत आणि धर्मग्रंथ’ या २ ‘ई-बुक’चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

‘हिंदु राष्ट्र : आक्षेप आणि खंडण’ अन् ‘उत्सव साजरे करण्याची योग्य पद्धत आणि धर्मग्रंथ’ या २ ‘ई-बुक’चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या प्रकरणांमध्ये अधिवक्त्यांनी धाडसी अन् निर्णयात्मक कृती करणे आवश्यक ! – अधिवक्ता कृष्णमूर्ती

अधिवक्ता कृष्णमूर्ती पी.

आपण स्वार्थीपणा सोडून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व हिंदु संघटनांना एकत्र करून उद्देश साध्य करण्यासाठी झगडले पाहिजे. हे करण्यासाठी आपण न्याययंत्रणा समजून घेऊन त्याचा परिणामकारकरित्या उपयोग केला पाहिजे. राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या प्रकरणांमध्ये अधिवक्त्यांनी धाडसी अन् निर्णयात्मक कृती केली पाहिजे.

हिंदु धर्माचे संरक्षण करणे, हे आपले उत्तरदायित्व ! – चक्रवर्ती सुलीबेले

प्रसिद्धीमाध्यमांकडून हिंदूंच्या परंपरांची खिल्ली उडवली जात आहे, तसेच लाखो लोकांची श्रद्धास्थाने असलेल्या हिंदूंच्या धार्मिक संस्थांवर आधारहीन आरोप केले जात आहेत; परंतु हिंदु समाज जेव्हा जागा होतो, तेव्हा त्याच्या विरोधात कोणतीही शक्ती उभी राहू शकत नाही. संतांवर आरोप करण्यासह त्यांच्यावर आक्रमणे केली जात आहेत. जहाल साम्यवादी विचारसरणीचे लोक हिंदूंना विभाजित करण्यासाठी जातपात, धर्म यांविषयी वर्णभेदाचा सिद्धांत वापरत आहेत. त्यामुळे हिंदु धर्मीय विदेशी शक्तींकडून विशेषतः अमेरिकेकडून केल्या जाणार्‍या राष्ट्रविरोधी कारवाया आणि धर्मांतर यात अडकत आहेत. यावर एकमेव उपाय म्हणजे आपण हिंदु धर्माचे संरक्षण करणे, हे आपले उत्तरदायित्व आहे, हे ओळखले पाहिजे. हिंदु धर्माच्या रक्षणासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची स्वतःची सिद्धता हवी.