सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा अनमोल सत्संग लाभला. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनातील सूत्रे येथे दिली आहेत. २३.३.२०२५ या दिवशी या मार्गदर्शनातील काही सूत्रे पाहिली. आज पुढील सूत्रे पाहूया.

(भाग २)

मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/895308.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

५. सनातन-निर्मित देवतांच्या सात्त्विक चित्रांत काळानुरूप पालट केले जातात !

एक साधक : महाशिवरात्रीला सनातनचे ग्रंथप्रदर्शन लावले होते. तेव्हा एका जिज्ञासूने ‘श्रीकृष्ण’ आणि ‘दत्त’ हे ग्रंथ बघितले. त्यांवरील चित्रात गायीचे तोंड डाव्या बाजूला होते आणि आता चित्र पालटल्यानंतर गायीचे तोंड उजव्या बाजूला होते. त्यांनी त्याविषयी विचारल्यावर मला काही सांगता आले नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : गायीचे तोंड उजवीकडे असेल, तर ते देवाचे मारक रूप असते आणि डावीकडे असेल, तर तारक रूप असते. सनातन-निर्मित देवतांच्या सात्त्विक चित्रांत काळानुरूप असे पालट केले जातात.

६. आपण ज्या आध्यात्मिक स्तराला असतो, त्या स्तराची अनुभूती आपल्याला येते !

एक साधक : सेवा करतांना माझी भावजागृती होते आणि मला पुष्कळ चैतन्य जाणवायला लागते. त्या वेळी मला दुर्गादेवीचे आणि तुमचेही दर्शन होते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : देवीचा स्तर म्हणजे शक्तीचा स्तर. शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती, हे अनुभूतींचे स्तर आहेत. आपण ज्या स्तराला असतो, त्या स्तराची अनुभूती आपल्याला येते. शक्तीच्या स्तराला असतांना काहीतरी कृती करावी लागते. आध्यात्मिक भावाच्या स्तराला असतांना ‘देवच आपल्यासाठी करतो’, याची अनुभूती येते. चैतन्याच्या स्तराला दोन्ही होते, म्हणजे देवाचेही साहाय्य होते आणि आपणही पुष्कळ करू शकतो. चैतन्याच्या स्तराला असतांना शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक, या तिन्ही स्तरांवर कार्य करता येते. आनंदाच्या स्तराला असतांना काही करावे लागत नाही. ब्रह्माला सच्चिदानंद म्हणतात ना ! आपण त्या स्थितीला गेलो की, सगळे आपोआप होते. शांती म्हणजे निर्गुण स्थिती असते. तिथे काहीही होत नाही. केवळ ब्रह्मच असते.

एक साधक : तुम्ही म्हणता की, वेळेला महत्त्व आहे; म्हणून मी सत्संगाच्या ठिकाणी जाऊन सत्संग वेळेत चालू करतो आणि वेळेतच संपवतो. सत्संगाला जातांना, तसेच तेथे गेल्यावरही मला चैतन्य जाणवते; पण सत्संग संपल्यावर तेथे काहीच जाणवत नाही. तेव्हा ‘माझे काही चुकत आहे का ?’, असे मला वाटते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तुमच्या दृष्टीने ‘सत्संग घेणे’, ही पूजा आहे. पूजा करतांना खर्‍या भक्ताची भावजागृती होते, तसेच त्याला चैतन्य मिळते. पूजा संपली की, ते सर्व संपते. तसे तुमचे होते. ही चांगली अनुभूती आहे.

७. देव अनुभूतीतून शिकवतो !

७ अ. महालक्ष्मीच्या मंदिरात गेल्यावर श्रीकृष्णाचा नामजप आपोआप चालू होणे

एक साधक : सकाळी आम्ही महालक्ष्मीच्या मंदिरात गेलो होतो. तेव्हा माझा देवीचा नामजप झाला; पण नंतर श्रीकृष्णाचा नामजप आपोआप चालू झाला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : अनुभूती छानच आहे. देवीच्या मंदिरात गेल्यावर तुमचा कृष्णाचा जप चालू झाला. एखाद्याची जप करायची तळमळ असेल, तर ‘त्याच्यासाठी कुठला जप आवश्यक आहे ?’, हे आपल्याला मन आणि बुद्धी यांनी ठरवता येत नाही. तुमच्याकडून तुमच्यासाठी आवश्यक असलेला जप झाला. देवाने तो तुम्हाला शिकवला. देव आपल्याला अनुभूतीतून शिकवतो.

८. शरिराची जी नाडी कार्यरत असते, त्या बाजूने प्रथम सुगंध येतो !

एक साधक : मघाशी मी सत्संगाला येण्याची सिद्धता करत होतो. तेव्हा तुम्ही येण्यापूर्वी माझ्या एका हाताला सुगंध येत होता. त्या वेळी उदबत्ती लावलेली नव्हती. आता तुमचे मार्गदर्शन ऐकल्यावर माझ्या दुसर्‍या हाताच्या बोटांना सुगंध येत आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : शाब्बास ! त्या वेळी जी नाडी कार्यरत असते, तेथून प्रथम सुगंध येतो.

९. प्रत्येक कृती करतांना भावपूर्ण नामजप केल्यास प्रगती होऊन देव समष्टी साधनेतील अडचणी दूर करतो !

एक साधिका : माझ्या आईला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. त्यामुळे आमच्या घरातले वातावरण चांगले नसते. माझ्या वडिलांनाही व्यसन लागले आहे. या कारणांमुळे माझी बहीण फार शिकली नाही. मीच एकटी शिकत आहे. मी एम्.कॉम.च्या दुसर्‍या वर्षाला आहे. मला साधना करायची इच्छा आहे; पण घरातल्या अशा परिस्थितीमुळे साधना करण्यात अडथळे येतात. त्यासाठी मार्गदर्शन हवे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तुम्हाला समष्टी साधना करता आली नाही, तरी मन तुमचेच आहे ना ! तुम्ही कुणाशी बोलत नसतांना, अंघोळ करतांना, कपडे घालतांना, तसेच बाहेर जातांना भावपूर्ण नामजप करा ! त्यातून व्यष्टी साधना होऊन तुम्ही पुढे गेलात, तर तुमच्या समष्टी साधनेतील अडचणी देव आपोआप दूर करील.

१०. ‘देव माझ्यासाठी पुष्कळ करतो’, ही जाणीव सतत असायला हवी !

१० अ. लहानपणापासून अंगावर असलेले कोड देवाच्या कृपेने नाहीसे होणे

एक साधिका : मी लहान असतांना तुम्ही आमच्या घरी आला होता. त्या वेळी माझ्या पाठीवर कोड होते. तेव्हा ‘हे कोड सगळीकडे पसरल्यावर मी कशी दिसेन ?’, यासाठी मी माझ्या मनाची सिद्धता केली होती. आई-बाबांच्याही मनाची सिद्धता झाली होती. तेव्हा माझा चेहरा, डोळे अणि शरिराचे दृश्य भाग, यांवर सगळीकडे कोड होते; पण आता ते सगळे गेले. आता केवळ पायावर थोडेसे कोड राहिले आहे. ‘माझ्याकडून साधनेचे फारसे प्रयत्न होत नाहीत, तरी देव माझ्यासाठी पुष्कळ करतो’, असे मला वाटते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हीच जाणीव सतत असली पाहिजे. तेव्हा अडचणीही दूर होतात आणि मन आनंदी होते. आता तुमची सुधारण्याची प्रक्रिया चालू आहे. ती तशीच चालू राहू दे. पुष्कळ छान !

११. आपण देवाची भक्ती केल्यास देव आपल्या सर्व अडचणी सोडवतो !

११ अ. साहेबांनी वेतन वाढवून देणे आणि त्यांनी त्यांच्या ‘ट्रस्ट’मधून डोळ्यांचे शस्त्रकर्म करून देण्यास साहाय्य करणे

एक साधक : मी जेथे काम करतो, तेथे माझ्या पहिल्या वर्षाच्या वेतनामध्ये थोडी वाढ झाली; म्हणून मी अधिकार्‍यांशी बोललो. त्यांनी थेट कार्यालयात जाऊन माझे वेतन आणखी वाढवण्यास सांगितले. साहेबांनी सांगितल्यामुळे त्यांना नाईलाजाने माझे वेतन वाढवावे लागले. नंतर साहेबांनी मला विचारले, ‘‘तुला आणखी काही अडचणी आहेत का ?’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘माझ्या डोळ्यांचे शस्त्रकर्म करायचे आहे. त्याला व्ययही अधिक येणार आहे.’’ नंतर त्यांनी शस्त्रकर्माचा खर्च त्यांच्या ‘ट्रस्ट’मधून दिला. त्यामुळे माझ्या दोन्ही डोळ्यांचे शस्त्रकर्म १७ सहस्र रुपयांत झाले. नंतर साहेबांनी कार्यालयातून शस्त्रकर्माचे देयकही मिळवून दिले आणि पुष्कळ साहाय्य केले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : पहा, देव केवढे करतो ना ! आपण केवळ भक्ती करायची.

(क्रमशः)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/895950.html