सिंहस्थाच्या प्राधिकरणात साधू-महंतांचा सहभाग नसणार !

नाशिक – उत्तरप्रदेश सरकारने महाकुंभमेळ्यासाठी ज्याप्रमाणे कायदा केला, तसा कायदा नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी करणार आहे, तसेच मेळा प्राधिकरणाचीही स्थापना करण्यात येईल. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी अल्प पडू दिला जाणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३ मार्च या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. मुख्यमंत्र्यांनी त्र्यंबकेश्वर (जिल्हा नाशिक) येथील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन त्र्यंबकेश्वरच्या विकास आराखड्याचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधतांना वरील माहिती दिली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,

१. त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थाची पहाणी केली आहे. त्र्यंबकेश्वरच्या विकास आराखड्याचे सादरीकरण मी पाहिले आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकसह त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे.
२. त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी १ सहस्र १०० कोटी रुपयांचा आराखडा सिद्ध आहे. यामध्ये दर्शनासाठी महामार्ग (कॉरिडोर) बनवणे, वाहनतळ आणि शौचालय यांची व्यवस्था यांसह तेथील वेगवेगळ्या कुंडांचा जीर्णोद्धार करणे, तेथील प्रमुख मंदिरांचा जीर्णोद्धार करणे, पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मध्यस्थीने प्रत्यक्ष मंदिरात जीर्णोद्धाराची जी आवश्यकता आहे ती आणि अनेक प्रकारच्या सोयी सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
३. नाशिकमध्ये जवळपास ११ पूल बांधत आहोत. रस्त्याचे मोठे जाळे सिद्ध करत आहोत. साधूग्रामसाठी तेथील सगळी जागा कह्यात घेऊन त्याचा विकास करत आहोत.
४. घाटांमध्ये सोयीसुविधा करून काही घाट वाढवत आहोत. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे जाळे सिद्ध करून पाणी शुद्ध रहाण्यासाठी आराखडा सिद्ध केला आहे.
५. सिंहस्थ कुंभमेळ्याला येणार्यांच्या संख्येचा सध्या तरी अंदाज नाही. त्यामुळे सर्व गोष्टींची सिद्धता झाल्यानंतर तसा अंदाज घेतला जाईल.
६. सिंहस्थच्या प्राधिकरणात साधू-महंतांचा सहभाग नसेल. हे प्रशासकीय प्राधिकरण आहे. ते अध्यात्माचे नाही. अध्यात्माची बाजू साधू-संत सांभाळतील, तर प्रशासन आणि व्यवस्थापन ही बाजू मेळा प्राधिकरण सांभाळेल.
सिंहस्थसाठी मेळा प्राधिकरणाची स्थापना !‘मुख्यमंत्र्यांनी उत्तरप्रदेशप्रमाणे सिंहस्थ कुंभमेळ्याचे पूर्ण दायित्व घ्यावे’, अशी मागणी त्र्यंबकेश्वरच्या साधू-महंतांनी केली आहे. यावर फडणवीस म्हणाले की, कुंभमेळ्यासाठी मुख्यमंत्र्यांचे दायित्व असतेच; पण आपण उत्तरप्रदेशाने ज्या प्रकारे कुंभमेळ्याचा कायदा आणि मेळा प्राधिकरण सिद्ध केले, त्याच धर्तीवर आपलाही कायदा आपण सिद्ध करत आहोत. मेळा प्राधिकरण सिद्ध करून त्याला कायदेशीर चौकट देत आहोत. |