सद्गुरुद्वयींच्या महाकुंभमेळ्याच्या दिव्य दौर्‍याचे अनमोल क्षणमोती !

हिंदूऐक्याचा आविष्कार : सद्गुरुद्वयींची ‘विश्‍व हिंदु परिषदे’च्या शिबिराला भेट !

विहिंपचे मुंबईच्या धर्माचार्य विभागाचे प्रमुख श्री. नवलकिशोर पुराणिक यांनी दूरभाषद्वारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना (सद्गुरुद्वयींना) विहिंपच्या शिबिरामध्ये (पेंडॉलमध्ये) येण्याचे आमंत्रण दिले होते. ‘विहिंपचे संत संमेलन होणार आहे, त्यात सद्गुरुद्वयींनी उपस्थित रहावे’, अशी श्री. पुराणिक यांची इच्छा होती. गेल्या वर्षी अयोध्येतील श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी विहिंपच्या कोकण प्रांताच्या पदाधिकार्‍यांची सद्गुरुद्वयींशी जवळीक झाली होती. त्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी सद्गुरुद्वयींनी विहिंपच्या शिबिराला भेट दिली. या वेळी धर्माचार्य विभागाच्या पदाधिकार्‍यांनी अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने स्वागत केले. यासह विहिंपचा शिबिरातील परिसर दाखवला. सद्गुरुद्वयींनी संत निवास, कार्यकर्ते निवास, वैशिष्ट्यपूर्ण अन्नपूर्णा कक्ष, कार्यालय, चिकित्सालय, प्रसिद्धी कक्ष, संत संमेलनाचा भव्य मंडप इत्यादी पाहून त्या मागील विचार समजून घेतला. ही भेट हिंदूऐक्याचा आविष्कार दर्शवणारी होती.

सद्गुरुद्वयींची आनंद आखाड्याला भेट : एक भावपूर्ण क्षण !

डावीकडून पू. प्रदीप खेमका, स्मृतीचिन्ह देतांना सद्गुरुद्वयी आणि स्मृतीचिन्ह स्वीकारतांना स्वामी बालकानंद गिरि महाराज

सनातनच्या गुरुपरंपरेतील आनंद आखाडा, आदि शंकराचार्यांचा कृपाशीर्वाद तयाला ।
सनातनच्या सद्गुरुद्वयी मातृपीठाला भेट देती, आचार्य महामंडलेश्‍वर यांचा आशीर्वाद घेती ॥

सनातन संस्थेची गुरुपरंपरा ही शंकराचार्यांचे शिष्य तोटकाचार्य यांच्यापासून निर्माण झालेल्या आनंद आखाड्यापासूनची आहे. श्रीमद् चंद्रशेखरानंद परमहंस, श्री अनंतानंद साईश (श्री चंद्रशेखरानंद परमहंस यांचे शिष्य), श्री भोलानंद (श्री भुरानंद) महाराज आणि संत भक्तराज महाराज (श्री अनंतानंद साईश यांचे शिष्य, आखाडा परंपरेनुसार संत भक्तराज महाराज यांचे नाव श्री नित्यानंद महाराज असे आहे.), प.पू, रामानंद महाराज, प.पू. अच्युतानंद महाराज आणि प.पू. डॉ. आठवले (संत भक्तराज महाराज यांचे शिष्य), अशी गुरुपरंपरा आहे. त्यामुळे आखाडा परंपरेत सनातन संस्था ही आनंद आखाड्याच्या अंतर्गत येते. त्यामुळे मातृपीठाला भेट देण्यासाठी प.पू. डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी (सद्गुरुद्वयींनी) सध्याचे आखाड्याचे आचार्य महामंडलेश्‍वर अनंत विभूषित श्री श्री १००८ स्वामी बालकानंदगिरी यांची भेट घेतली आणि त्यांना सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट देण्याचे आमंत्रण दिले. सद्गुरुद्वयींना भेटून स्वामी बालकानंदगिरी यांना फार आनंद झाला आणि त्यांनी सनातनच्या कार्याला भरभरून आशीर्वाद दिला.

आचार्य महामंडलेश्‍वर स्वामी अवधेशानंदगिरिजी महाराज यांच्या ‘प्रभुप्रेमी संघ शिबिरा’तील व्यवस्थेचे जिज्ञासेने अवलोकन !

संपूर्ण कुंभमेळ्यात २० एकर परिसरात पसरलेले जुना आखाड्याचे आचार्य महामंडलेश्‍वर स्वामी अवधेशानंदगिरिजी महाराज यांचे ‘प्रभुप्रेमी संघ शिबीर’ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. या शिबिराचे व्यवस्थापक श्री. एस्. एम्. तुलश्याम यांनी सद्गुरुद्वयींना संपूर्ण शिबीर दाखवले. शिबिरातील मंदिरे, प्रवचन कक्ष, निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, कार्यालय, चिकित्सालय, विक्री केंद्र इत्यादींची रचना आणि त्यामागील सूक्ष्म विचार त्यांनी सांगितल्यानंतर ‘सहस्रो
लोकांची एकाच वेळी व्यवस्था कशी केली जाते ?’, हे यातून लक्षात आले.

‘इस्कॉन’च्या भव्य अन्नपूर्णा कक्षाला दिलेली भेट ठरली अविस्मरणीय !

एकाच वेळी ३५ ते ५० सहस्र भाविकांसाठी महाप्रसाद बनवण्याची व्यवस्था असणारा ‘इस्कॉन’चा ‘भव्य अन्नपूर्णा कक्ष’ !

या वर्षी ‘इस्कॉन’ या आध्यात्मिक संस्थेने सुप्रसिद्ध अशा ‘अदानी उद्योग समुहा’च्या साहाय्याने ‘मेगा किचन’ (भव्य अन्नपूर्णा कक्ष) उभारले आहे. या माध्यमातून प्रतिदिन ३५ ते ५० सहस्र भाविकांना महाप्रसाद दिला जात आहे. या ‘मेगा किचन’ची रचना समजून घेण्याच्या दृष्टीने सद्गुरुद्वयींनी ‘इस्कॉन’च्या शिबिराला भेट दिली.

सद्गुरुद्वयींशी संवाद साधतांना ‘इस्कॉन’चे डॉ. दीनदयाळ दास समवेत श्री. चेतन राजहंस, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, श्री. विनायक शानभाग आणि श्री. श्रीहरि सिंगबाळ

‘इस्कॉन’चे भरूच, गुजरात येथील प्रमुख डॉ. मुरलीधर दास यांनी सद्गुरुद्वयींचे स्वागत केले, तसेच त्यांना इस्कॉनच्या शिबिरातील श्रीकृष्ण मंदिर, भागवद् कथेतील देखावे, अन्नपूर्णा छत्र, तसेच ‘मेगा किचन’ यांची सविस्तर माहिती सांगितली. डॉ. दास म्हणाले, ‘‘इस्कॉन’चे भक्त सनातनची सात्त्विक उत्पादने नियमित वापरतात. अशी उत्पादने कुठेच मिळत नाहीत. याचा भारतभर प्रसार होण्यासाठी आम्ही तुम्हाला साहाय्य करू.’’