नेवासा, अहिल्यानगर येथील साधिका सौ. सीमंतीनी बोर्डे (संगीत अलंकार) यांना गायक पू. किरण फाटक आणि बासरीवादक पू. केशव गिंडे यांच्याकडून संगीत साधनेविषयी शिकायला मिळालेली सूत्रे

गायनसाधना

‘वर्ष २०१७ ते २०१९ या कालावधीमध्ये मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात प्रत्येक अडीच मासांनी संगीत सेवेसाठी जात असे. वर्ष २०१९ मध्ये कोरोना महामारीच्या काळात माझे रामनाथी आश्रमात जाऊन सेवा करणे बंद झाले. नंतर काही वर्षे वेगवेगळ्या अडचणींमुळे मी रामनाथी आश्रमात जाऊ शकले नाही.

पू. पंडित डॉ. केशव गिंडे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला १७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२४ या कालावधीत आश्रमात जाण्याची आणि संगीत विषयाच्या संदर्भात सेवा करण्याची संधी मिळाली. त्या काळात ‘संगीतसाधना, संगीत क्षेत्रातील संतांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि माझ्याकडून साधनेसाठी झालेले प्रयत्न’, यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत. दिनांक ९ जानेवारी २०२५ या दिवशी या लेखाचा पहिला भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.

या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/871764.html

पू. किरण फाटक

४. पू. किरण फाटक आणि पू. केशव गिंडे या दोन्ही संतांकडून शिकायला मिळालेली सूत्रे

४ अ. संतांचे गायन किंवा वादन ऐकल्याने साधकांचे आध्यात्मिक त्रास न्यून होणे : ‘संत पातळीला (आध्यात्मिक पातळी ७० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक) गेल्यानंतर संतांचे गायन किंवा वादन यांतून चैतन्य प्रक्षेपित होत असते. त्यामुळे आध्यात्मिक स्तरावरील संगीतातून साधकांचे आध्यात्मिक त्रास न्यून होऊ लागतात.

४ आ. अध्यात्माप्रमाणे संगीताचे ज्ञानही अनंत असल्याने ‘स्वतःचे ज्ञान किती तोकडे आहे’, याची साधिकेला जाणीव होऊन तिचा अहंभाव न्यून होणे : ‘पू. किरण पाठक यांच्या राग गायनातून आणि पू. केशव गिंडे यांच्या बासरी वादनातून मला तीव्रतेने जाणीव झाली की, ‘माझे शास्त्रीय संगीतातील रागांचे ज्ञान अल्प आहे आणि मला आणखी पुष्कळ शिकायचे आहे.’ सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितले आहे, ‘अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे.’ त्याचप्रमाणे संगीताचे ज्ञान हेसुद्धा अनंतच आहे. त्यामुळे ‘मी आणखी किती अभ्यास करायला पाहिजे ? माझे ज्ञान किती तोकडे आहे ?’, हे मला जाणवले आणि माझा अहंभाव न्यून होण्यास साहाय्य झाले.

५. पू. केशव गिंडे यांच्या बासरी वादनाच्या वेळी आलेल्या अनुभूती 

अ. पू. केशव गिंडेकाकांच्या बासरी वादनामुळे माझे मन एकाग्र झाले. मला माझे सहस्रार आणि आज्ञाचक्र यांवर स्पंदने जाणवली.

आ. संतांची वाणी ‘पश्यंती’ असते. ‘पू. काकांचे वादनही पश्यंती वाणीत होते’, असे मला जाणवले.

‘कलाकाराने स्वतःतील स्वभावदोष आणि अहं न्यून करून संगीताला साधनेची जोड कशी द्यावी ?’, याचे शिक्षण देणारे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ !

सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

‘संगीतातून साधना होण्यासाठी व्यष्टी साधनेचा पाया पक्का हवा’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितले आहे. संगीतातून साधना होण्यासाठी ‘स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन कसे करावे ? भावजागृतीसाठी कसे प्रयत्न करावेत ?’, हे शिकून कृतीप्रवण होण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते. त्याचा लाभ आज अनेक कलाकार घेत आहेत. संगीताला साधनेची जोड दिल्याने ‘कलेकडे अंतर्मुखतेने कसे पहाता येते ? कलाकाराने स्वतःचा अहं न्यून केल्यावर त्याला इतरांकडून शिकण्याच्या स्थितीतील आनंद कसा घेता येतो ?’, हे सौ. सीमंतीनी बोर्डे यांनी केलेल्या त्यांच्या साधनेच्या प्रयत्नांमधून शिकता येते.’

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६० टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२५.१२.२०२४)

६. संगीतातून साधना होण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे महत्त्वाचे आहे !

‘जोपर्यंत माझ्यातील स्वभावदोष आणि अहंकार जात नाही, तोपर्यंत मी रागांचा कितीही सराव केला, कितीही सखोल अभ्यास केला, तरी तो व्यर्थ आहे’, असे मला जाणवले. यावरून गुरुदेव अनेक वर्षांपासून साधकांना ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया (टीप ३) राबवण्यास का सांगत आहेत आणि त्यातून कोणते लाभ होणार आहेत ? हे पुन्हा एकदा प्रकर्षाने लक्षात आले. ‘गुरुदेव सर्व साधकांकडून प्रक्रिया राबवून घेतात, ही त्यांची साधकांवर असलेली केवढी कृपा आणि प्रीती आहे’, याची मला जाणीव झाली.

टीप ३ – प्रक्रिया म्हणजे स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करून गुण वाढवण्यासाठी ‘गुरुकृपायोग’ या साधना मार्गांतर्गत केलेले प्रयत्न.

संगीत सेवेच्या कालावधीमध्ये मला काही वेळ एका संतांचा सत्संग मिळाला. तेव्हा मला अतिशय कृतकृत्य वाटले आणि गुरुदेवांची महानता जाणवत राहिली. आश्रमात गेल्यापासून वरील सर्व सूत्रे गुरुदेवांच्याच कृपेने शिकता आली. यासाठी कृपाळू आणि भक्तवत्सल अशा गुरुचरणी मी कोटीशः कृतज्ञ आहे.’

(समाप्त)

– सौ. सीमंतीनी बोर्डे, संगीत अलंकार, नेवासा, अहिल्यानगर (नगर). (२५.१२.२०२४)     

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक