Union Defence Minister Rajnath Singh : शांतता दुर्बलतेचे लक्षण नसून शक्तीचे प्रतीक आहे, हे भारतीय सैन्याने दाखवून दिले ! – राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

लष्कर दिनानिमित्त खडकी येथील बाँबे इंजिनीअर ग्रुप येथील ‘गौरवगाथा’ कार्यक्रम !

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

पुणे – शांतता हे कमजोरीचे लक्षण नसून ते शक्तीचे प्रतीक आहे, हे भारतीय सैन्याने दाखवून दिले आहे. कोणताही देश लष्करी सामर्थ्याविना प्रगती करू शकत नाही. पालटती भू-राजकीय परिस्थिती आणि युद्धाच्या स्वरूपाचा विचार करून सशस्त्र दलांना अत्याधुनिक शस्त्रांसह सुसज्ज करून आधुनिक युद्धासाठी सक्षम करण्यात येत आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. लष्कर दिनानिमित्त खडकी येथील बाँबे इंजिनीअर ग्रुप येथे झालेल्या ‘गौरवगाथा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ उपस्थित होते.

‘भारत रणभूमी दर्शन ॲप’चे अनावरण ! 

सर्वसामान्य नागरिकांना आता सियाचीनपासून गलवान ते डोकलामपर्यंतच्या विविध युद्धभूमींना प्रत्यक्ष भेट देता येणार आहे. त्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘भारत रणभूमी दर्शन ॲप’चे अनावरण संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

भारतीय सैन्याची ‘गौरवगाथा’ ! 

भारतातील प्राचीन काळातील युद्ध ते आधुनिक काळातील युद्धे या दरम्यान पालटलेल्या योद्ध्याचा प्रवास ‘गौरवगाथा’ कार्यक्रमातून उलगडण्यात आला. या वेळी हेलिकॉप्टर्स, ग्लायडर्स यांनी सलामी दिली. कार्यक्रमात ध्वनी-प्रकाशासह पारंपरिक लढाईची प्रात्यक्षिके, वेगवान वाहने, रणगाडे, जवानांनी प्रत्यक्ष केलेल्या युद्धप्रसंगांच्या सादरीकरणामुळे उपस्थितांना थरार अनुभवता आला.