‘आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो. या लेखमालेतून आम्ही ‘व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन, ‘अर्गाेनॉमिक्स’चे (ergonomics चे) तत्त्व आणि आजारानुसार योग्य व्यायाम’, यांविषयीची माहिती देत आहोत. योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास नसांच्या आजारांवर निश्चितपणे मात करण्यास साहाय्य होईल ! व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा हा प्रवास सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल. या लेखातून आपण ‘नसांचे आजार का उद्भवतात ? ते टाळण्यासाठी काय करायला हवे आणि साधे सोपे व्यायाम केल्यास नसांच्या आजारात कसा लाभ होतो ?’, यांविषयीची माहिती पाहूया.
१. नसांच्या आजाराची कारणे
१ अ. व्यक्तीच्या सांध्याला सूज आली किंवा तिच्या सांध्यांमध्ये कडकपणा निर्माण झाल्यास तेथील नसांवर ताण पडून व्यक्तीला विविध प्रकारचे त्रास होणे : नसांचे आजार हे बहुतेक त्यांच्यावर पडणारा दाब किंवा ताण यांमुळे होत असतात. नसांवर दाब पडल्यास निर्माण झालेल्या व्याधींमुळे ‘ठराविक भागांत मुंग्या येणे, वेदना होणे, जळजळ होणे, अशक्तपणा जाणवणे किंवा तो भाग लुळा पडणे’, अशा प्रकारचे गंभीर त्रासही होऊ शकतात. नसा या स्नायूंच्या मधून जातात आणि सांध्यांच्या हालचालीनुसार त्या ताणल्या जातात. त्यामुळे स्नायू आणि सांधे यांच्या स्थितीचा नसांवर विशेष परिणाम होतो. एखाद्याच्या सांध्याला सूज आली किंवा सांध्यांमध्ये कडकपणा निर्माण झाला, तर तेथील नसांवर ताण पडतो आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे परिणाम दिसायला लागतात. या प्रक्रियेला काही दिवस किंवा अनेक मास किंवा अनेक वर्षेही लागू शकतात. त्यामुळे ही लक्षणे लक्षात येऊ लागल्यास त्या संदर्भात सतर्क होऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे.
१ आ. हालचाल नसल्यामुळे सांध्यांत कडकपणा निर्माण होऊन तेथील नसांवर दाब येणे आणि त्यामुळे रुग्णाला त्रास होणे अन् योग्य व्यायामामुळे सांधे मोकळे होऊन त्रास उणावू लागणे : ज्यांना आयुष्यात कधीतरी अस्थीभंग झाला असेल, ते ही लक्षणे अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात, उदा. हाताच्या हाडाचा अस्थीभंग झाल्यावर काही मास आपल्याला हात हलवता येत नाही. नंतर हाडे जुळल्यानंतरही हाताच्या हालचाली मोकळेपणाने होत नाहीत. त्यासाठी व्यायाम करावा लागतो. या कालावधीत रुग्णाला बरेचदा ‘हातात मुंग्या येणे, बधीरपणा जाणवणे, जळजळ होणे, सुया टोचल्याप्रमाणे संवेदना जाणवणे’, असे त्रास होऊ शकतात. रुग्ण जसजसा व्यायाम करील, तसतसे हाताचे सांधे मोकळे होऊन हे त्रास उणावू लागतात. हालचाल नसल्यामुळे सांध्यांत निर्माण झालेला कडकपणा किंवा कधी कधी येत असलेली सूज हे सर्व सांध्यांची हालचाल होत असतांना नसांवर दाब किंवा ताण देतात. (क्रमशः १० जानेवारी या दिवशी) (२९.१२.२०२४)
– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा.