‘आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त आहे. या लेखमालेतून आम्ही ‘व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन, ‘अर्गाेनॉमिक्स’चे तत्त्व आणि आजारानुसार योग्य व्यायाम’, यांविषयीची माहिती देत आहोत. योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास नसांच्या आजारांवर निश्चितपणे मात करण्यास साहाय्य होईल ! व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा हा प्रवास सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल. या लेखातून आपण ‘नसांचे आजार का उद्भवतात ? ते टाळण्यासाठी काय करायला हवे आणि साधे सोपे व्यायाम केल्यास नसांच्या आजारात कसा लाभ होतो ?’, यांविषयीची माहिती पाहूया. ८ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘नसांच्या आजाराची कारणे’ पाहिली.
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/871570.html
१. नसांच्या आजाराची कारणे
१ इ. चुकीच्या कृती करण्याने स्नायू आणि सांधे एकाच स्थितीत राहून त्यांना सूज येणे अन् त्यांचा परिणाम नसांवर होऊ लागणे : आपण सेवा करतांना बर्याचदा चुकीच्या पद्धतीने बसतो किंवा चुकीच्या कृती करतो. यामुळे स्नायू, तसेच सांधे एकाच स्थितीत रहातात किंवा त्यांच्यावर ताण पडतो आणि सूज येते. याचा परिणाम नसांवर होऊ लागतो. एकदा नस दुखावली किंवा तिला दुखापत झाली, तर ते दुखणे न्यून व्हायला काही मास लागतात.
२. सांधे, स्नायू आणि नसा यांचे आजार टाळण्यासाठी करावयाचे प्रयत्न
सुदृढ व्यक्तींनी ‘नसांचे आजार होऊ नयेत’; म्हणून एकदम साधे सोपे व्यायाम केले आणि नियमित काम करण्याची पद्धत योग्य ठेवली, तरी ते पुरेसे असते.
अ. सर्वसाधारणपणे केले जाणारे कवायतीचे प्रकार आणि सूर्यनमस्कार यांसारख्या व्यायामांनी सर्व सांधे मोकळे रहातात.
आ. वजन उचलून केले जाणारे प्रकार किंवा दंडबैठका यांनी स्नायू मजबूत होऊन नसांना आधार मिळतो.
इ. प्रतिदिन कामे करतांना पाळावयाचे नियम लक्षात घेऊन तशी प्रत्यक्षात कृती केल्यावर सांधे, स्नायू आणि नस यांचे आजार आपण निश्चितपणे टाळू शकतो.
देवाने हे शरीर चांगले ठेवण्यासाठी दिलेल्या सर्वच कृती एकदम साध्या आणि सोप्या आहेत; पण त्याला महत्त्व न दिल्यामुळे आपण स्वतःची हानी करून घेत आहोत.’ (समाप्त)
– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट), फोंडा, गोवा. (२९.१२.२०२४)