अमेरिकेत नववर्ष साजरे करणार्‍या लोकांवर ट्रक चढवून आक्रमण : १२ जणांचा मृत्यू

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिन्स शहरातील बोर्बन रस्त्यावर ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्ष साजरा करणार्‍या लोकांवर एका व्यक्तीने ट्रक चालवला. यामध्ये किमान १२ जणांचा मृत्यू झाला, तर ३० हून अधिक जण घायाळ झाले. उपस्थितांच्या माहितीनुसार या ट्रकमधून एक व्यक्ती नंतर बाहेर आली आणि तिने लोकांवर गोळीबार केला. या वेळी तेथे उपस्थित पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. यात तो ठार झाला कि त्याला पकडण्यात आले, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलीस घटनेचे अन्वेषण करत असून आक्रमण करणारा आणि त्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही आतंकवादी घटना नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.