संपादकीय : ‘द सॅटनिक व्हर्सेस’

लेखक सलमान रश्दी

नुकतीच देहली उच्च न्यायालयाने भारतीय वंशाचे ब्रिटीश लेखक सलमान रश्दी यांच्या ‘द सॅटनिक व्हर्सेस’ (सैतानाची वचने) या पुस्तकावरील बंदीच्या विरोधात सरकार ठोस पुरावे सादर करू न शकल्याने त्यावरील बंदी अमान्य केली आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर मुसलमानांनी त्याला तीव्र विरोध केला होता. ३६ वर्षांपूर्वी श्रीराममंदिरावरून देशात वातावरण तापलेले असतांना देशांतर्गत दबावामुळे राजीव गांधी यांनी या पुस्तकावर बंदी घातली होती. ‘द सॅटनिक व्हर्सेस’वर बंदी घालणारा भारत हा पहिला देश होता. ब्रिटनमध्ये या कादंबरीचे प्रकाशन चालू झाल्यानंतर अवघ्या ९ दिवसांतच परदेशातून या कादंबरीच्या आयातीवर भारतात बंदी घालण्यात आली होती; परंतु आता उच्च न्यायालयात या पुस्तकावरील बंदी सिद्ध न झाल्याने हे पुस्तक पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. असे असले, तरी मुसलमानांनी पुन्हा पुस्तकाला विरोध करत धमक्या देणे चालू केले आहे. पहिल्यांदा या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर इराणचे प्रमुख खोमेनी यांनी सलमान रश्दी यांच्या विरोधात फतवा काढून त्यांची हत्या करणार्‍याला बक्षीसही घोषित केले होते. त्यानंतर काही कालावधीने अमेरिकेत एका मुसलमानाने रश्दी यांच्यावर आक्रमण केले होते, ज्यात त्यांनी त्यांचा एक डोळा गमावला होता; मात्र त्यानंतरही या पुस्तकाला पुष्कळ प्रसिद्धी मिळत होती.

या पुस्तकात पैगंबरांच्या विरोधात लिखाण असल्याचा दावा केला गेल्यामुळे मुसलमान मोठ्या प्रमाणात याला विरोध करत आहेत. श्रद्धास्थानांच्या अवमानाचा विरोध करण्याचे प्रकार निरनिराळे असतात. काही निषेध मोर्चे काढतात, निवेदने देतात, आंदोलने करतात, चेतावणी देऊन वैध मार्गाने लढा लढतात. भारतात वैध मार्गाने अनेक लढाया लढल्या गेल्या आहेत; परंतु याला प्रत्येक वेळी अपवाद राहिला तो मुसलमानांचा ! हिंदूंच्या देवतांची हिंदुद्वेषी एम्.एफ्. हुसेन यांनी काढलेली नग्न चित्रांसारखी चित्रे आजही ‘कला’ म्हणून सादर होतात, तेव्हा अभिव्यक्तीस्वातंत्र्य, पुरोगामीत्व, ‘ट्रेंड’ आदी नावाखाली ती खपवली जातात.

त्याला सनदशीर विरोध करणार्‍यांना उपदेशाचे डोस पाजण्यात कोणतीच कमतरता ठेवली जात नाही; परंतु ‘द सॅटनिक व्हर्सेस’वरील बंदी उठताच तातडीने मौलाना रशिदी, मौलाना शहाबुद्दीन रझदी यांनी पुस्तकाला आक्रमक विरोध केला आहे. ‘कोणताही मुसलमान दुकानात हे पुस्तक पहाणे सहन करणार नाही’, अशी धमकीवजा चेतावणीही त्यांनी दिली. अभिव्यक्तीच्या गळचेपीवर बोलणारे याविषयी काही बोलतील का ? कि त्यांच्या लेखी हिंदुविरोधी गोष्टींच्या वेळीच अभिव्यक्तीस्वातंत्र्य असते ? हे प्रश्‍न सूज्ञ लोकांकडून विचारले गेले पाहिजेत. ‘या पुस्तकामुळे देशातील एकोप्यासाठी धोका निर्माण झाला आहे’, असे म्हणणारे ‘हिंदूंची मंदिरे पाडली गेली, ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, त्यामुळेही देशातील एकोप्याला धोका निर्माण झाला होता’, असे म्हणण्याचे धाडस करतील का ?