हिंदुत्‍व हेच ब्रह्मास्‍त्र !

हिंदुस्‍थानच्‍या भूतकाळाचा अभिमान, म्‍हणजेच देशाच्‍या राष्‍ट्रीयत्‍वाचा अभिमान आहे. हे राष्‍ट्रीयत्‍वही अशाच एकात्‍मतेच्‍या भावनेतून निर्माण झालेले आहे. अशा या एकात्‍मतेच्‍या भावनेलाच ‘हिंदुत्‍व’ हा शब्‍द यथार्थ असल्‍यामुळे शोभून दिसतो. म्‍हणूनच ‘देशाला राष्‍ट्रीयत्‍वासाठी हिंदुत्‍वावाचून अन्‍य कोणताही पर्याय नाही’, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. हिंदुत्‍वाची विचारधारा ही सार्वकालिक असून ती कोणत्‍याही काळातील अडचणी आणि समस्‍या यांवर मात करण्‍यास समर्थ, सुदृढ आणि बलिष्‍ठ असलेली विचारधारा आहे. १९ नोव्‍हेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘निधर्मीवादा’चा पुरस्‍कार, हीच काँग्रेसची सर्वांत मोठी चूक; स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या दृष्‍टीकोनातून हिंदुत्‍वाची व्‍याख्‍या आणि सर्वधर्मसमभाव हा हिंदूंचा सहज स्‍वभाव’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

(भाग २.)

(भाग १. वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/855962.html)

५. हिंदुस्‍थानातील निधर्मी विचारांना खरा धोका मुसलमान समाजाकडून !

हिंदूंची परंपरा मुसलमान आणि ख्रिस्‍ती यांच्‍या राजवटीत खंडित झाल्‍याचे आढळून येते. ख्रिस्‍त्‍यांनी अतोनात छळ करून हिंदूंना ख्रिस्‍ती पंथाची दीक्षा दिली. याची साक्ष गोव्‍यातील पोर्तुगिजांची राजवट आपल्‍याला देते. मुसलमान समाजाचे क्रौर्य इतिहासाच्‍या पानापानांवर आढळते आणि आज तर जग त्‍याचा अनुभव घेत असल्‍याचे आपण सारेच साक्षीदार आहोत. ‘हिंदुत्‍वनिष्‍ठ निधर्मीवादाचा तिरस्‍कार करतात’, असा आक्षेप घेतला जातो किंवा असा आरोप केला जातो; पण ‘मुसलमानांना निधर्मीवाद मान्‍य आहे का ?’, असा प्रश्‍न विचारला जात नाही.

‘जमात ए इस्‍लामी’च्‍या इस्‍लामी पुस्‍तकांच्‍या सूचीमध्‍ये ‘आफ्‍टर सेक्‍युलॅरिझम व्‍हॉट ?’, असे शीर्षक असलेली एक पुस्‍तिका प्रकाशित करण्‍यात आली. त्‍यातील एक परिच्‍छेद वानगीदाखल देणे अप्रस्‍तुत ठरणार नाही…‘एक गोष्‍ट अगदी स्‍पष्‍टपणे दिसते. निधर्मी शासनाने आपण इतके अकार्यक्षम आहोत, असे दाखवले आहे, तसेच मानवी व्‍यवहारातील उत्तम आणि मोठ्या गोष्‍टींचा त्‍याने इतका नाश केला आहे की, त्‍याला अधिक काळ टिकू देणे, म्‍हणजे मानवी वंशाचा नाश वाढवणारे आहे. मानवी वंशाच्‍या निधर्मी नेतृत्‍वाची पत पूर्ण नाहीशी झाली आहे.’ (संदर्भ : ‘हिंदुत्‍व आणि इतर विचारधारा’, लेखक : ज.द. जोगळेकर, मनोरमा प्रकाशन)

वरच्‍या परिच्‍छेदात व्‍यक्‍त केलेले विचार हे मुसलमान समाजातील विचारवंतांचे मत आहे. यावरून हिंदुस्‍थानातील निधर्मी विचारांना खरा धोका कोणत्‍या तत्त्वज्ञानाकडून आहे आणि या देशात कोणत्‍या समाजात धार्मिकता अधिक आहे, ते सहज लक्षात येईल.

श्री. दुर्गेश परुळकर

६. ‘समान नागरी संहिते’विषयी होत असलेल्‍या विरोधामागचे खरे कारण

‘समान नागरी संहिते’चा हिंदु समाज सहजतेने स्‍वीकार करतो; पण मुसलमान समाज यासाठी सिद्ध नाही. ही गोष्‍ट लक्षात घेऊनच काँग्रेसचे दिवंगत पंतप्रधान नरसिंहराव यांनी मुसलमान समाजाला असे आश्‍वासन दिले होते, ‘समान नागरी संहिता’ करण्‍याचा काँग्रेस सरकारचा अजिबात विचार नाही.’ ही बातमी ‘इंडियन एक्‍सप्रेस’च्‍या २८ जुलै १९९५ या दिवशीच्‍या अंकात प्रसिद्ध झाली होती.

वास्‍तविक संपूर्ण जगाची दिशाभूल करण्‍यासाठी हिंदुत्‍वाचा विरोध करणारे तथाकथित विचारवंत आणि विरोधक यांनी ‘हिंदुत्‍वाचा संबंध राष्‍ट्रीयत्‍वाशी असतांनाही तो नागरिकत्‍वाशी आहे’, असा अपसमज हेतूत: निर्माण केला. राष्‍ट्रहिताच्‍या दृष्‍टीने कशा प्रकारचे निर्बंध करायचे आणि करायचे नाहीत, या सर्व गोष्‍टी ठरवण्‍याचा अधिकार राज्‍यघटनेने शासनाला दिला आहे. तसा अधिकार कोणत्‍याही राष्‍ट्रीयत्‍वाला दिलेला नाही. राष्‍ट्र आणि शासन या दोन भिन्‍न राजकीय कल्‍पना असून त्‍यांचे कार्यक्षेत्र ही भिन्‍न आहे, हे  लक्षात घेतले की, कोणत्‍याही प्रकारचा वैचारिक आणि बौद्धिक गोंधळ होत नाही.

७. राष्‍ट्रीय ऐक्‍याची जोपासना करण्‍यात निधर्मीवाद अपयशी

हिंदुत्‍व हे अत्‍यंत लवचिक असून ते कोणत्‍याही चांगल्‍या गोष्‍टीचा सहजतेने स्‍वीकार करते. याचे उत्तम उदाहरण, म्‍हणजे देश स्‍वतंत्र झाल्‍यावर आपल्‍या देशात घटस्‍फोटाचा कायदा अस्‍तित्‍वात आला. हिंदूंनी त्‍याला कधीही विरोध केला नाही. ‘विवाह बंधन हे ७ जन्‍मांचे आहे’, असा संस्‍कार हिंदु समाजावर केला आहे. त्‍या संस्‍काराला छेद देणारा हा कायदा असूनही कोणत्‍याही प्रकारचे आंदोलन त्‍या विरोधात कधीही झाले नाही. मुसलमान समाजाने ‘तीन तलाक’ला (घटस्‍फोटाला) विरोध करणारा कायदा अस्‍तित्‍वात आणल्‍यावर कसे थैमान घातले, याचा आपण अनुभव घेतला आहे. शाहबानो प्रकरणात न्‍यायालयाचा निर्णय सुद्धा बहुमताच्‍या बळावर काँग्रेस सरकारने पालटला. अशा प्रकारे मुसलमानांचे तुष्‍टीकरण करणारा निधर्मीवाद राष्‍ट्रीय ऐक्‍याची जोपासना करू शकत नाही; म्‍हणूनच सर्व समावेशक असलेल्‍या हिंदुत्‍वाला दुसरा पर्याय नाही.

८. ‘राष्‍ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षा’चे शरद पवार यांनी ‘संभाजीनगर’ या नामकरणालावि रोध करण्‍यामागील कारणमीमांसा 

हिंदु धर्म, संस्‍कृती यांना नष्‍ट करण्‍याच्‍या हेतूनेच हिंदुत्‍वाला विरोध केला जात आहे. त्‍यामागे एक मोठे षड्‌यंत्र आहे, ते आता लपून राहिले नाही. ‘राष्‍ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षा’चे संस्‍थापक आणि सर्वेसर्वा शरद पवार यांना ‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ हे नामकरण मान्‍य नाही. याचा अर्थ शरद पवार यांच्‍या दृष्‍टीने ‘औरंगजेब हा या देशाचा राष्‍ट्रपुरुष आहे आणि ते छत्रपती संभाजी महाराजांना या देशाचा राष्‍ट्रपुरुष मानण्‍यास सिद्ध नाहीत’, हेच यातून अधोरेखित होते. संभाजीनगरला त्‍यांचा विरोध असण्‍याचे कारण आपण जाणून घेतले पाहिजे. ‘संभाजीनगर’ हे नाव दिले, तर छत्रपती संभाजी महाराज हे हिंदूंचे श्रद्धास्‍थान होईल. छत्रपती संभाजी महाराज ही एक व्‍यक्‍ती नसून तो एक विचार आहे, हेसुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजे.

छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदुत्‍वासाठी आणि हिंदु धर्मावरील अढळ श्रद्धा जतन करत त्‍यांनी त्‍यांचे आयुष्‍य धर्म अन् हिंदवी स्‍वराज्‍य यांसाठी समर्पित केले. छत्रपती संभाजी महाराज यांनी त्‍यांच्‍या बलिदानाने भारतीय समाजावर ‘हिंदुत्‍व हे राष्‍ट्रीयत्‍व असून ते एक तत्त्व आहे’, हा एक पुष्‍कळ मोठा संस्‍कार केला आहे. या तत्त्वासाठी, त्‍याच्‍या संरक्षणासाठी ते अबाधित रहावे, यासाठी आपल्‍या शरिराचे तुकडे झाले, तरी चालतील; पण आपण माघार घ्‍यायची नाही आणि शत्रूला शरण जायचे नाही. असे कृतीने सांगून देशातील जनतेवर ‘हिंदुत्‍व हेच राष्‍ट्रीयत्‍व’ आहे, त्‍यासाठी कोणतीही तडजोड करायची नसते, असा संस्‍कार केला.

हा संस्‍कार या देशात टिकून राहिला, तर हिंदुत्‍व, हिंदु धर्म नष्‍ट करण्‍याच्‍या आपल्‍या कार्यात मोठा अडसर निर्माण होणार, हे ओळखून शरद पवार यांनी ‘संभाजीनगर’ या नावाला विरोध करून ‘औरंगाबाद’ हेच नाव कायम करण्‍याचा दुराग्रह धरतात. या दुराग्रहाला ते ‘निधर्मीवाद’ म्‍हणतात. हा निधर्मीवाद नसून हिंदुत्‍व नष्‍ट करण्‍यासाठी प्रचलित असलेल्‍या षड्‌यंत्राला यशस्‍वी करण्‍यासाठी केलेला प्रयत्न आहे.

८ अ. अफझलखान वधाचे चित्र सार्वजनिक ठिकाणी न लावणे आणि स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या काव्‍यपंक्‍ती पुसणे यांमागचे षड्‍यंत्र : असाच प्रयत्न अफझलखान वधाविषयीही करण्‍यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांची विजयाची परंपरा हिंदूंच्‍या विस्‍मृतीत जावी, यासाठी अफझलखान वधाचे चित्र सार्वजनिक ठिकाणी न लावण्‍याचा आग्रह धरण्‍यात आला. हिंदु संस्‍कृती, धर्म आणि हिंदूंचा देश पूर्णपणे नष्‍ट करणे, हेच उद्दिष्‍ट समोर असलेल्‍या जगातील अराजकवाद्यांनी रचलेल्‍या षड्‌यंत्राचा तो भाग आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुस्‍थानचे राष्‍ट्रपुरुष नसून अफझलखान हाच या देशाचा खराखुरा राष्‍ट्रपुरुष आहे’, असा संदेश या चित्राला विरोध करून देण्‍यात आला. या मागचा प्रधान हेतू, म्‍हणजे पराक्रमाची आणि शौर्याची परंपरा या देशातून नष्‍ट व्‍हावी. या सर्व मागे साम्‍यवादी विचारसरणी ठामपणे उभी राहिली.

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांची विचारधारा हिंदु धर्म, संस्‍कृती आणि हिंदु राष्‍ट्र निर्मितीला पुरवठा करणारा ऊर्जा स्रोत आहे. तो ऊर्जा स्रोत नष्‍ट करण्‍यासाठीच सावरकरांवर विविध प्रकारचे खोटे आरोप करून त्‍यांना कलंकित करण्‍यात आले. एवढेच नव्‍हे, तर सावरकरांच्‍या काव्‍यपंक्‍ती अंदमानच्‍या कारागृहातून नष्‍ट करण्‍यामागे सुद्धा या षड्‍यंत्राचा एक भाग आहे.

(क्रमशः)

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्‍वनिष्‍ठ लेखक आणि व्‍याख्‍याते, डोंबिवली. (१५.११.२०२४)

अंतिम भाग ३. वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/856606.html