हिंदूंना बौद्धिक, सांस्कृतिक श्रेष्ठत्व मिळवून देणारे आपले पूर्वज, परंपरा आणि मिळालेला सर्वोत्तम वारसा यांविषयी अभिमान वाटतो. श्रीराम, श्रीकृष्ण यांच्यापासून चंद्रगुप्त मौर्य, विक्रमादित्य, शालिवाहन असे छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत होऊन गेलेले सर्व राजे-महाराजे यांच्या शौर्याचा आणि विजयाचा इतिहास अभिमानास्पद वाटणारा हिंदु समाज आजही या भूतलावर आहे. त्यांना त्यांच्या या ऐतिहासिक परंपरेचा विलक्षण अभिमान वाटतो. त्यामुळेच हिंदु समाजात एकात्मतेची भावना टिकून राहिली आहे. हिंदुस्थानच्या भूतकाळाचा अभिमान, म्हणजेच देशाच्या राष्ट्रीयत्वाचा अभिमान आहे. हे राष्ट्रीयत्वही अशाच एकात्मतेच्या भावनेतून निर्माण झालेले आहे. अशा या एकात्मतेच्या भावनेलाच ‘हिंदुत्व’ हा शब्द यथार्थ असल्यामुळे शोभून दिसतो; म्हणूनच ‘देशाला राष्ट्रीयत्वासाठी हिंदुत्वावाचून अन्य कोणताही पर्याय नाही’, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. हिंदुत्वाची विचारधारा ही सार्वकालिक असून ती कोणत्याही काळातील अडचणी आणि समस्या यांवर मात करण्यास समर्थ, सुदृढ अन् बलिष्ठ असलेली विचारधारा आहे.
(भाग १.)
१. ‘निधर्मीवादा’चा पुरस्कार, हीच काँग्रेसची सर्वांत मोठी चूक !
स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा हिंदी राष्ट्रवादाविषयी चर्चा झाली, त्या वेळी त्या काळातील नेत्यांनी हिंदी राष्ट्रवादाविषयी तात्त्विक मत मांडतांना म्हटले, ‘हिंदी राष्ट्रात कोणत्याही प्रकारचा वंश, धर्म आणि वर्ण या भेदाला कोणतेही स्थान असणार नाही. कोणत्याही गोष्टीला महत्त्व न देता आम्ही सर्वजण स्वतःला हिंदी समजतो.’ त्या वेळच्या नेत्यांचा हा विचार खरोखरीच राष्ट्रवादाच्या दृष्टीकोनातून पहाता कौतुकास्पद होता. मुसलमान समाजाने सुद्धा त्यांची पृथक वृत्ती सोडून स्वतःला जर मुसलमानऐवजी हिंदी मानले असते, तर हा हिंदी राष्ट्रवाद यशस्वी झाला असता; पण मुसलमानांनी ‘आपण हिंदी आहोत’, हे मान्य केले नाही. ते मुसलमानच राहिले, त्यामुळे समस्या निर्माण झाली. परिणामी हिंदी राष्ट्रवाद यशस्वी ठरला नाही. याची परिणती पाकिस्तानच्या निर्मितीत झाली. तरीही काँग्रेसने हिंदी राष्ट्रवाद अयशस्वी झाला, हे लक्षात येताच हिंदी राष्ट्रवादाला सोडचिठ्ठी देऊन हिंदुत्वाच्या ऐवजी ‘निधर्मीवादा’चा पुरस्कार केला. काँग्रेसची हीच सर्वांत मोठी चूक होती.
हिंदु राष्ट्रवादातच निधर्मीवाद समाविष्ट झाला आहे, हे काँग्रेसने लक्षात घेतले नाही किंबहुना हे ठाऊक असूनही हिंदु राष्ट्रवादाला, म्हणजेच हिंदुत्वाला नाकारले. परिणामी देशातील बहुसंख्य हिंदु जनता राजकीयदृष्ट्या हिंदी झाली ती तशीच राहिली आणि ही हिंदी झालेली हिंदु जनता स्वातंत्र्यानंतर अधिकाधिक निधर्मीवादाकडे वळली. हा निधर्मीवादच हिंदुत्वाला विरोध करणारा आहे. हिंदी राष्ट्रवाद हा अयशस्वी ठरल्यानंतर त्याची जागा हिंदुत्व किंवा हिंदु राष्ट्रवादाने घेणे क्रमप्राप्त होते; परंतु तसे न घडल्याने राष्ट्रवादाची सर्वांत मोठी पोकळी निर्माण झाली. निधर्मीवादाच्या नावाखाली अल्पसंख्यांक समाज अस्तित्वात आला. त्या अल्पसंख्यांक समाजाच्या तुष्टीकरणासाठी बहुसंख्य समाजापेक्षा त्याला विशिष्ट दर्जा देण्यात आला. ‘एकाच राष्ट्राच्या नागरिकांमध्ये अशा प्रकारचे दोन वर्ग निर्माण करणे, म्हणजेच निधर्मीवाद’, असा एक समज निर्माण करण्यात आला. अशा प्रकारे फुटीरतेला, विभाजनाला साहाय्यभूत ठरणारा निधर्मीवादच राष्ट्रवादाला सुरूंग लावणारा ठरला.
२. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या दृष्टीकोनातून हिंदुत्वाची व्याख्या
हिंदुत्व हे या भूमीत आरंभापासून आहे; म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्व ही जीवनशैली म्हणून तिला मान्यता दिली आहे. याचे कारण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या समग्र वाङ्मयात आढळते. ‘हिंदुत्व याचा अर्थ इतिहास असा आहे. हिंदुत्व या शब्दात आदर्श, तत्त्वप्रणाली, लोकसमाज, विचार भावना या इतक्या विभिन्न आणि संपन्न आहेत तेवढ्याच त्या प्रबळ अन् सूक्ष्म आहेत, इतक्या चपळ अन् तरीही इतक्या स्पष्ट आहेत की, त्यामुळे हिंदुत्वाचे पृथक्करण करण्याचे प्रयत्न विफल होतात. कमीत कमी ४ सहस्र वर्षे या कल्पनेला आकार देण्यासाठी व्यय झाली आहेत. प्रेषित आणि कवी, वकील अन् कायदे करणारे, शूर पुरुष, तसेच इतिहासकार अशा लोकांनी या कल्पनेला शब्दरूप देण्यासाठी विचार केला. त्याचप्रमाणे ते लोक जीवन जगले, लढले आणि त्यांनी बलीदान दिले. ‘हिंदुत्व’ या शब्दाशी साधर्म्य असलेला हिंदु धर्म, असा चुकीचा समज केल्यामुळे लोकांना तो आध्यात्मिक आणि धार्मिक इतिहास आहे, असे वाटले; पण प्रत्यक्षात तसे नसून तो संपूर्ण इतिहास आहे. हिंदु धर्म हा हिंदुत्वापासून निर्माण झालेला शब्द आहे. तो त्याचा अंश आहे, तो त्याचा भाग आहे. हिंदुत्वाचा अर्थ पूर्णपणे स्पष्ट केला नाही, तर हिंदु धर्म हा शब्द संदिग्ध रहातो, त्याचा नीट अर्थबोध होत नाही. या दोन शब्दांतील भेद न कळल्यामुळे अपसमज निर्माण झाले आहेत.’
३. अल्पसंख्यांकांना राखीव जागा न देण्याविषयी ‘ॲडव्हायझरी कमिटी ऑन मायनॉरिटी’चे सदस्य तजमल हुसेन यांचे मत
कन्हैयालाल मुन्शी यांनी ३ नोव्हेंबर १९६८ या दिवशीच्या ‘भवन्स जनरल’च्या अंकात राज्यघटना सिद्ध केली जात असतांना ‘ॲडव्हायझरी कमिटी ऑन मायनॉरिटी’मध्ये जी चर्चा झाली, त्याचा आढावा ‘कुलपतीज् लेटर’ यात केला. तो असा…‘पालटलेल्या परिस्थितीत अल्पसंख्यांकांसाठी राखीव जागा नसाव्यात, अशा उपसूचनेच्या सूचना होत्या. ॲडव्हायझरी कमिटीत तजमल हुसेन यांचा अंतर्भाव होता. मौलाना आझाद यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय मुसलमानांचे प्रवक्ते मौलाना हाफिझूर रहमान होते. त्यांना मुसलमानांसाठी राखीव जागा हव्या होत्या. त्यावर आक्षेप घेतांना तजमल हुसेन यांनी राखीव जागा मागण्यांविषयी राष्ट्रीय मुसलमानांवर, म्हणजेच एक प्रकारे मौलाना आझाद यांच्यावर टीका केली. ‘मुसलमान प्रतिनिधींनी भूतकाळ विसरावा आणि निधर्मी शासन निर्माण करण्यासाठी साहाय्य करावे’, असे हुसेन यांनी प्रतिपादन केले.
‘मायनॉरिटीज कमिटी’चा सुधारित अहवाल राज्यघटना समितीला सादर करतांना सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले, ‘विधानसभेत मुसलमानांसाठी राखीव जागा असाव्यात, अशी मागणी करणार्या मुसलमान प्रतिनिधींनी अल्पसंख्यांकांच्या हितार्थ पाकिस्तानात जावे…काळाच्या ओघात या देशात बहुसंख्य आणि अल्पसंख्यांक असे काही आहे, हे विसरणे आणि हिंदुस्थानात एक समाज आहे, असे समजणे, हे सर्वांच्या हिताचे आहे.’
येथे विशेषत्वाने एका गोष्टीचा उल्लेख करणे नितांत आवश्यक आहे. तजमल हुसेन यांनी त्यांचे मत भाषणात व्यक्त केले. त्या भाषणात ते म्हणाले, ‘मला असे दिसते की, आताच झालेल्या भाषणात माझ्या सन्माननीय मित्रांनी अल्पसंख्यांकांना विनंती केली आहे. अध्यक्ष महाशय, या सभागृहाला मी सांगू इच्छितो की, या देशात अल्पसंख्यांक कुणी नाही. मी स्वतःला अल्पसंख्यांक समजत नाही. निधर्मी शासनात अल्पसंख्यांक ही गोष्टच असू शकत नाही. इतरांप्रमाणे मला अधिकार, स्थान आणि उत्तरदायित्व आहे. जे स्वतःला बहुसंख्य समजतात ते या देशात आता अल्पसंख्य कुणी आहे, ही गोष्ट विसरतील, अशी मला आशा आहे.’
(संदर्भ : ‘हिंदुत्व आणि इतर विचारधारा’, लेखक : ज. द. जोगळेकर, मनोरमा प्रकाशन)
४. सर्वधर्मसमभाव हा हिंदूंचा सहज स्वभाव
सध्या सर्वधर्मसमभाव यांचे वारंवार तुणतुणे वाजवले जाते; पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती, म्हणजे हिंदुत्वाला सर्वधर्मसमभाव हा विचार नवीन नाही. हिंदुत्वाच्या रक्तात तो मिसळलेला आहे आणि हिंदूंचा तो सहज स्वभाव आहे. ‘मानवाची सेवा हीच ईश्वराची सेवा’, असा सेवाभाव जागृत करणारा हिंदुत्वाचा विचार संकुचित असूच शकत नाही. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’, हा हिंदुत्वाचा प्राण आहे, याकडे दुर्लक्ष करता येत नाही. याच पार्श्वभूमीवर चिंतामणराव वैद्य यांनी ‘मध्ययुगीन भारत’ या त्यांच्या ग्रंथात लिहिले, ‘एकाच राज्यात किंवा शहरात किंबहुना एकाच कुटुंबात सुद्धा हिंदु, बौद्ध, जैन या धर्मांचे अनुयायी गुण्यागोविंदाने राहून धर्माच्या गहन तत्त्वांवर अत्यंत सहनशीलतेने वादविवाद करत असतात. त्यामुळे असा चमत्कार पहाण्यास सापडे की, एकाच कुटुंबात वडील शैव, मुलगा बौद्ध असून तोही पुढील आयुष्यात मत पालटल्यानंतर धर्मांतर करील आणि हे धर्मांतर त्याच्या कौटुंबिक अन् सामाजिक नात्यात कोणतेही अंतर निर्माण करत नसे.’
(क्रमशः)
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि व्याख्याते, डोंबिवली. (१५.११.२०२४)
(भाग २. वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/856308.html)