हिंदुस्थानच्या भूतकाळाचा अभिमान, म्हणजेच देशाच्या राष्ट्रीयत्वाचा अभिमान आहे. हे राष्ट्रीयत्वही अशाच एकात्मतेच्या भावनेतून निर्माण झालेले आहे. अशा या एकात्मतेच्या भावनेलाच ‘हिंदुत्व’ हा शब्द यथार्थ असल्यामुळे शोभून दिसतो. म्हणूनच ‘देशाला राष्ट्रीयत्वासाठी हिंदुत्वावाचून अन्य कोणताही पर्याय नाही’, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. हिंदुत्वाची विचारधारा ही सार्वकालिक असून ती कोणत्याही काळातील अडचणी आणि समस्या यांवर मात करण्यास समर्थ, सुदृढ आणि बलिष्ठ असलेली विचारधारा आहे. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘‘निधर्मीवादा’चा पुरस्कार, हीच काँग्रेसची सर्वांत मोठी चूक; स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या दृष्टीकोनातून हिंदुत्वाची व्याख्या, सर्वधर्मसमभाव हा हिंदूंचा सहज स्वभाव, हिंदुस्थानातील निधर्मी विचारांना खरा धोका मुसलमान समाजाकडून आणि राष्ट्रीय ऐक्याची जोपासना करण्यास निधर्मीवाद अपयशी’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
अंतिम भाग ३.
भाग २. वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/856308.html
९. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या दृष्टीने हिंदु कोण ?
‘हिंदुत्व’ या ग्रंथात स्वातंत्र्यवीर सावरकर लिहितात, ‘हिंदु म्हणजे हिंदुस्थानचा केवळ एकमेव नागरिक आणि अन्य कुणी नाही, असे आपल्याला ठरवता येणार नाही… एखादा अमेरिकन हिंदुस्थानचा नागरिक होईलही आणि जर तो तसा खरोखर नागरिक होईल, तर त्याला भारतीय किंवा हिंदी म्हणूनच वागवले जाण्यास काहीही अडचण येणार नाही. तथापि आपल्या देशाबरोबर आपल्या संस्कृतीचा आणि ऐतिहासिक परंपरेचा जोपर्यंत त्याने स्वीकार केला नाही, जोपर्यंत रक्तसंबंधाने तो आपल्याशी एक जीव झाला नाही आणि जोपर्यंत आपली ही भूमी त्याच्या केवळ प्रेमाचाच नव्हे, तर नितांत भक्तीचा विषय झाली नाही, तोपर्यंत हिंदु जातीत त्याला ‘हिंदु’ म्हणून स्थान मिळणे शक्य नाही.’ (संदर्भ : ‘समग्र सावरकर’, खंड दहावा, हिंदुत्व, पृष्ठ ५६)
थोडक्यात या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यानंतर असे नागरिकत्व स्वीकारणार्या व्यक्तीने हिंदूंची परंपरा ही स्वतःची परंपरा म्हणून स्वीकारली पाहिजे. या भूमीशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. ही महत्त्वपूर्ण अट पूर्णपणे जो आचरणात आणेल, त्याचा हिंदु म्हणून स्वीकार करता येईल. हिंदुत्वाचे सर्वांत प्रमुख आणि आवश्यक लक्षण, म्हणजे रक्ताने हिंदु असणे हेच आहे; कारण सिंधूपासून समुद्रापर्यंत पसरलेल्या या भूमीवर स्वतःची पितृभूमी म्हणून जे प्रेम करतात आणि त्यामुळेच जी जाती दुसर्यांना आपल्यात मिसळून घेऊन अन् त्यांच्याशी संबंध जुळवून अगदी प्राचीन सप्तसिंधूपासून आतापर्यंत नावारूपाला आली, त्या जातीच्या रक्ताचा वारसा जे सांगतात, त्यांच्यात हिंदुत्वाचे अत्यंत प्रमुख लक्षण आढळून आले पाहिजे, तरच तो हिंदु होय.’ (संदर्भ : ‘समग्र सावरकर’, खंड दहावा, ‘हिंदुत्व’)
१०. हिंदुत्व नष्ट करण्यासाठीचे षड्यंत्र आणि हिंदूसंघटनाची आवश्यकता !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हे विचार अराजकवाद्यांना हिंदुस्थानचे स्वत्व नष्ट करण्याच्या कार्यात बाधा आणणारे आहेत; म्हणून काँग्रेसचे राहुल गांधी सावरकर यांचा वारंवार अपमान करतात आणि त्यांची प्रतिमा मलिन करून हिंदूंच्या मनात त्यांच्याविषयी असलेल्या श्रद्धास्थानाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करतात. हा प्रयत्नसुद्धा त्या षड्यंत्राचा एक भाग आहे. साम्यवादी विचारांच्या लोकांनी शिक्षण संस्थेतही शिरकाव करून विद्यार्थ्यांचा मेंदू स्वतःच्या ताब्यात घेऊन विकृत केला. एवढेच नाही, तर शिक्षणव्यवस्थेत त्यांनी घुसखोरी करून शिक्षणपद्धत नासवण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला. इतिहासाचे विकृतीकरण करून शिक्षणव्यवस्था भ्रष्ट केली. त्यामुळे स्वाभिमान, स्वत्व, परंपरेचा अभिमान विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणार नाही, तसेच गुलामगिरीची मानसिकताही जिवंत रहावी, याची पूर्णपणे काळजी घेतली. या शिक्षणव्यवस्थेत पालट घडवून आणण्याचा प्रयत्न करताच ‘शिक्षणाचे भगवेकरण’, असा आरोप करून प्रचंड दबाव टाकण्यात आला; पण अराजकवाद्यांनी जी शिक्षणपद्धत राबवली, तिचा रंग कोणता ?, हे मात्र त्यांनी सांगितले नाही. हासुद्धा या षड्यंत्राचाच एक भाग आहे.
जिहादी विचारसरणी अराजकवादी साम्यवाद्यांना साहाय्यभूत ठरणारी असल्यामुळे त्यांच्या क्रौर्याच्या विरोधात एकही अक्षर उच्चारले जात नाही. उलट त्यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे म्हणून प्रयत्न केले जातात. हासुद्धा त्या षड्यंत्राचा एक भाग आहे. अशा ‘षड्यंत्राला पूर्णपणे हरवण्यासाठी प्रभावी असलेले ब्रह्मास्त्र म्हणजेच हिंदुत्व’, हेच आहे. या राष्ट्रीयत्वापासून हिंदु समाज दूर गेला, तर हिंदुस्थानचे आणि हिंदूंचे अस्तित्व या जगात रहाणार नाही. हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ओळखले होते म्हणून त्यांनी सामाजिक कार्याद्वारे हिंदूंसंघटनेला प्राधान्य दिले.
११. स्वामी विवेकानंद, अर्नाल्ड टायनबी आणि हेन्री के स्कोलीमोवस्की यांनी भारत अन् भारतीय तत्त्वज्ञान यांविषयी काढलेले उद़्गार !
स्वामी विवेकानंद, अर्नाल्ड टायनबी आणि हेन्री के स्कोलीमोवस्की हे जगातील ३ महनीय व्यक्ती आहेत. त्यांनी भारत आणि भारतीय तत्त्वज्ञान यांविषयी काढलेले उद़्गार हिंदुत्वाचे श्रेष्ठत्व अधोरेखित करणारे आहेत. या तिघांच्याही विचारांचा पाया हिंदुत्वाचा आहे. म्हणून या लेखाच्या अखेरीस त्यांचे विचार उद़्धृत करणे सयुक्तिक ठरेल.
अ. स्वामी विवेकानंद : जेव्हा जेव्हा जगातील सारे देश एकत्र येतात, मग ते साम्राज्याद्वारे, अन्य कोणत्या शक्तीद्वारे, व्यापार अथवा अर्थकारण यांद्वारे वा आधुनिक काळातील प्रगत तंत्रज्ञानाद्वारे एकत्र येवोत, तेव्हा तेव्हा भारत स्वतःचे आध्यात्मिक योगदान देतो आणि जगाला प्रभावित करतो. हे भूतकाळात घडले आहे आणि हेच भविष्यातही घडून येईल.
आ. अर्नाल्ड टायनबी : सर्वांत पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा असा की, भारत जगाची गुरुकिल्ली आहे. इतिहासात नेहमीच त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आजच्या जगाचे सारभूत तत्त्वही भारतच आहे, तसेच पुढील मुद्दा असा की, भारताकडे मानवी जीवनाकडे पहाण्याचा एक दृष्टीकोन आहे. मानवी व्यवहाराचे संचालन करण्याची विशिष्ट पद्धत आहे. आजच्या सर्व आवश्यकतांची पूर्तता करण्याची क्षमताही आहे. केवळ भारताच्या अंतर्गत स्थितीपुरतेच नव्हे, तर सबंध जगाच्या परिस्थितीत भारताची ही क्षमता निश्चित आहे.
इ. हेन्री के स्कोलीमोवस्की : तिसर्या सहस्रकात जगाला मार्गदर्शन करणार्या देशाविषयी ‘हेन्री वर्ड अफेयर्स’ या अमेरिकेतून प्रसिद्ध होणार्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाच्या ‘ऑक्टोबर ते डिसेंबर१९९८-१९९९’च्या अंकात लिहितात…‘तिसर्या सहस्रकाचे मी मोठ्या उत्सुकतेने स्वागत करत आहे. मला खात्री आहे की, गेल्या सहस्रकापेक्षा हे सहस्रक निश्चित अधिक श्रेयस्कर असेल, तसेच माझा ठाम विश्वास आहे की, ही श्रेयस्कर परिस्थिती पश्चिमेच्या नव्हे, तर पूर्वेच्या ज्ञानभांडारातून उदयाला येईल. तिसर्या सहस्रकाला साकार करण्यात भारतच महत्त्वाची भूमिका बजावेल.’
(संदर्भ : ‘घटनाचक्र -नव्या जगाची रचना’, लेखक : पी. परमेश्वरन्, मासिक ‘विवेक विचार’, अंक ५ जुलै २०२३)
(समाप्त)
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि व्याख्याते, डोंबिवली. (१५.११.२०२४)
संपादकीय भूमिका‘हिंदुत्व’ हेच राष्ट्रीयत्व असून हिंदु समाज त्यापासून दूर गेला, तर हिंदुस्थानचे आणि हिंदूंचे अस्तित्व जगात रहाणार नाही, हे जाणा ! |