हिंदू क्षीण होत चाललेला इस्लामी बांगलादेश !
(भाग ४)
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनेच सर्वत्रच्या हिंदूंचे हित साधले जाईल. त्यामुळे हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता आहे; परंतु आज स्थिती अशी आहे की, केवळ बांगलादेश आणि पाकिस्तान येथीलच नाही, तर भारतातील हिंदूंचेही मुळात रक्षण होणे अत्यंत आवश्यक झाले आहे. त्या दृष्टीकोनातून ‘हिंदू क्षीण होत चाललेला इस्लामी बांगलादेश’ या नावाने ‘सनातन प्रभात’चे हे विशेष सदर ! यातून भारतातील हिंदूंनी जागृत होऊन ‘हिंदूरक्षण’ करण्यास सिद्ध व्हावे, ही अपेक्षा !
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/851241.html
१. काय आहे दाक्रा हत्याकांड ?
२१ मे १९७१ या दिवशी खुलना जिल्ह्यातील दाक्रा या गावात शांतता समितीचे सदस्य आणि रझाकार यांनी बांगलादेश स्वातंत्र्ययुद्धाचा भाग म्हणून तेथील निःशस्त्र हिंदु निर्वासितांचे केलेले हत्याकांड म्हणजे दाक्रा हत्याकांड !
२. हिंदूंच्या नशिबाचे वेगळेच नियोजन !
दाक्रा गाव हिंदुबहूल होते. हे गाव काली बारी मंदिर अन् त्याचे आध्यात्मिक वातावरण यांसाठी प्रसिद्ध होते. पू, बादलचंद्र चक्रवर्ती हे त्या मंदिराचे मुख्य पुजारी ! त्यांनी त्यांच्या काही अनुयायांसह भारतात पळून जाण्याचे ठरवले. भयानक हिंसाचारापासून वाचून २२ मे १९७१ या दिवशी सुंदरबन जंगलातून जलमार्गाने भारतात जाण्याचा निश्चय केला; परंतु नशिबाचे नियोजन वेगळेच होते.
एप्रिल १९७१ मध्ये, म्हणजे एक महिन्यापूर्वीपासून हिंदूंच्या पलायनाच्या घटना घडत असल्याने दाक्रा गाव हे खोट्या आशेचा किरण ठरले आणि सहस्रो हिंदू पलायन करण्यासाठी या गावात एकत्र जमले. मेच्या मध्यापर्यंत सहस्रो हिंदूंनी येथूनच पलायन करण्यात यश मिळवले होते. त्यामुळे तब्बल १० सहस्र हिंदू २१ मे या दिवशी गावात एकत्र आले.
३. दाक्रातील भयाण शांतता बंदुकीच्या आवाजाने आणि हिंदु महिलांच्या किंकाळ्यांनी अशी झाली भंग !
काही स्थानिक मुसलमानांनी रझाकारांना दाक्रात मोठ्या प्रमाणात हिंदु जनसमुदाय जमल्याची सूचना दिली. २२ मेच्या दुपारी १ वाजता १५ ते २० रझाकार दोन होड्यांमधून दाक्रा गावात आले. एका होडीतील रझाकार खाली उतरले आणि त्यांनी जमावावर अंदाधुंद गोळीबार करणे चालू केले. दुसर्या होडीतील रझाकार खाली उतरून काली मंदिराकडे गेले आणि तेथे असलेल्या हिंदूंवर अमानुषपणे गोळीबार केला. घाबरलेल्या हिंदूंवर गिधाडांप्रमाणे तुटून पडलेल्या या रझाकारांच्या गोळीबाराने दाक्रा येथील शांतता बंदुकीच्या मोठ्या आवाजाने आणि हिंदु महिलांच्या किंकाळ्यांनी भंग झाली.
४. नदीही ठरली हिंदुरक्षणात अपयशी !
जमावातील लोक आश्रयासाठी सैरावैरा धावू लागले. पळून जाण्यासाठी अनेकांनी नदीमध्ये उड्या मारल्या; परंतु त्यांचे नशीब चांगले नव्हते. रझाकारांनी कोणतीही दयामाया न दाखवता त्यांची हत्यारे पाण्याकडे वळवली आणि जे असुरक्षित होते अन् सुरक्षितपणे पोहून जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यांच्यावर गोळीबार करण्यास आरंभ केला.
एकेकाळी जीवन निर्वाह करण्यासाठी उपयोगी ठरलेल्या या शांत नदीचे स्मशानात रूपांतर झाले. जवळजवळ १५० लोकांचे मृतदेह नदीच्या प्रवाहात वाहून गेले. आक्रमकांनी केलेल्या निर्दयी हिंसाचारामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. जे पुरुष, महिला किंवा मुले नावेतून जाण्याचा प्रयत्न करत होते किंवा घरात होते, त्यांची बंदुकीने हत्या करण्यात आली. मृतदेहांची दुर्गंधी आणि मरणासन्न अवस्थेत असलेल्या हिंदूंच्या विव्हळण्याने सर्व वातावरण गडद झाले.
५. रझाकारांच्या अमानुष भयावहतेने प्रत्येक हिंदूचा मृतदेह कायमचा शांत झाला !
जेव्हा हिंदूंना ठार मारण्याचा उन्माद ओसरला, तेव्हा हे रझाकार खाटिकाप्रमाणे पडलेल्या मृतदेहांपैकी कुणी जिवंत आहे का, हे पडताळून पाहू लागले. जे शेवटचे श्वास कंठत होते, अशा हिंदूंना त्यांनी ठार मारले आणि त्यांचे मांस फाडून क्रूरतेने त्याचे विचित्र प्रदर्शन करू लागले. या भयावहतेने प्रत्येक हिंदूचा मृतदेह कायमचा शांत झाला. असाहाय्य आणि घायाळ झालेल्यांचे आक्रोश थांबून भयाण शांतता पसरली. रक्ताच्या वहाणार्या पाटांनी पृथ्वी चिंब भिजली.
६. दाक्रा गावातील मानवी जीवनाच्या लवलेशाचा संपूर्ण नायनाट !
रक्तपात झाल्यानंतरही हा उद्रेक थांबला नाही. सत्ता आणि हिंदूंवर नियंत्रण मिळवणे याच्या तहानेने झपाटलेल्या रझाकारांनी गावकर्यांना लुटणे, जाळपोळ करणे आणि लैंगिक अत्याचार करणे चालू केले होते. त्यांनी हिंदूंची विस्कळीत झालेली घरे लुटली आणि जाळली. या पेटत्या घरांच्या भयानक ज्वाळांनी रात्री आकाश भरून गेले आणि हा प्रकाश उद्ध्वस्त झालेल्या भूमीवर पसरला. निष्पाप जीव सर्वत्र विस्कळीत झाले. मुसलमानांनी घरांना आगी लावून तेथील जीवनाचे अस्तित्वच पुसून टाकल्याने सर्व गाव आगीत धुमसत होते. सर्व रस्ते मृतदेहांनी भरून गेले. यामुळे आपल्या मुलांना मिठी मारलेल्या माता, मृत्यूच्या क्षणी एकमेकांना मिठी मारणारी कुटुंबे या सर्वांची राख झाली.
या हत्याकांडात मृत झालेल्यांमध्ये वडील, आई, मुले, प्रेमी अशी सर्व माणसे होती आणि त्यांचा गुन्हा, म्हणजे त्यांचा धर्म होता. या हत्याकांडामुळे रामपाल, बगेरहाट आणि मोरेलगंज येथे भीती निर्माण झाली. सर्व मृतदेह एकत्रितपणे पुरण्यात आले. क्षणार्धात या सर्वांची स्वप्ने आणि जीव तिथून पुसून टाकण्यात आले.
७. हत्याकांडाची भयावहता !
हे हत्याकांड एवढे भयानक होते की, परिखाली युनियन परिषदेचे अध्यक्ष शेख नझरूल इस्लाम यांनी त्या दिवशी जवळजवळ ६४६ निष्पाप जीव मृत झाल्याची निश्चिती केली. दुसरा प्रत्यक्ष साक्षीदार म्हणजे पारितोषकुमार बॅनर्जी – जे या हत्याकांडातून वाचले. त्यांच्या आजूबाजूच्या ६०० ते ७०० जणांची शांतपणे कत्तल करण्यात आल्याचा प्रसंग ते डोळ्यांत पाणी आणून सांगत होते.
रझाकारांनी केलेले आक्रमण हे केवळ स्पष्टपणे केलेले मानवाधिकारांचे उल्लंघन नव्हते, तर भीती निर्माण करून धार्मिक ओळखीवरून नायनाट करण्याचा मुद्दामहून केलेला प्रयत्न होता.
८. न्याय मिळूनही अन्यायच पदरी पडला !
बंगाली हिंदूंचे हत्याकांड करण्यामध्ये सहभाग असल्यावरून ‘जमात-ए-इस्लामी’ संघटनेचा प्रमुख नेता ए.के.एम्. युसुफ याच्यावर आरोप निश्चिती झाली. दाक्रा येथील हत्याकांडावरून त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादासमोर युसुफवर न्यायालयीन कारवाईही चालू करण्यात आली; परंतु २ फेब्रुवारी २०१४ या दिवशी युसुफ याचा तुरुंगात असतांनाच मृत्यू झाला. न्याय मिळूनही अन्यायच पदरी पडला.
९. भावपूर्ण श्रद्धांजली !
हत्याकांडात मृत झालेल्यांना श्रद्धांजली वहाण्यासाठी दाक्रा येथे कुठलेही स्मारक बांधण्यात आले नाही. शेवटी वर्ष २०१० मध्ये ‘दाक्रा गणहत्या स्मृती संरक्षक परिषदे’ने दाक्रा हत्याकांडामध्ये मृत झालेल्यांना श्रद्धांजली देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला. भावपूर्ण श्रद्धांजली देण्याच्या या कार्यक्रमाने या हत्याकांडातून वाचलेले, त्यांचे कुटुंबीय आणि समाजातील लोक यांना एकत्र येऊन मृत झालेल्यांचे स्मरण करण्यास व्यासपीठ मिळाले, तसेच यामुळे पुढील पिढ्यांपर्यंत हा अन्याय पोचला !
(समाप्त)
साभार
१. ‘हिंदु डिक्रिसेंट (बांगलादेश आणि पश्चिम बंगाल)’ – लेखक : बिमल प्रामाणिक, सेंटर फॉर रिसर्च इन इंडिया-बांगलादेश रिलेशन्स, कोलकाता (२०२१)
२. ‘प्रोजेक्ट हिंदुकुश – द दाक्रा मसॅकर (खुलना, बांगलादेश)’
३. ‘इंडिया टुडे’ (साहिदुल हसन खोकोन)
४. विकीपिडीया
संपादकीय भूमिकाबांगलादेशामध्ये हिंदूंची झालेली नृशंस हत्याकांडे जगासमोर आणून तेथील हिंदूंना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक ! |