पाश्चात्त्यांकडून निर्माण करण्यात येणारी कथानके आणि भारतातील सत्तापालटाचा धोका !

‘डीप स्टेट’ने वर्षानुवर्षे भारताचे विभाजन करण्याचे उद्दिष्ट ठेवून पाकिस्तानातील रावळपिंडी आणि इस्लामाबाद येथील त्यांच्या प्रतिनिधींच्या महत्त्वाकांक्षेशी सुसंगत असलेली मोहीम (मिशन) चालू ठेवली आहे. (‘डीप स्टेट’ म्हणजे सरकारी अधिकारी आणि खासगी संस्था यांच्या गुप्त जाळ्यांचा संदर्भ देते, जी कुणासही उत्तरदायी न रहाता सरकारी धोरणावर प्रभाव टाकते.) सध्या चालू असलेला खलिस्तानचा मुद्दा हा नवी देहलीसाठी एक संवेदनशील आणि निराकरण न झालेला संघर्ष, पाश्चात्त्य गुप्तचर यंत्रणांसाठी भारतावर दबाव आणण्याचे एक सोयीचे साधन बनला आहे.

१. खलिस्तान प्रश्नाचा लाभ घेणारे पाश्चात्त्य देश

अशांतता निर्माण करणारी खलिस्तान चळवळ ही पाश्चिमात्य देशांना भारताला अस्थिर करण्याची प्रमुख संधी देत आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांचे भारताविरुद्धचे आरोप हास्यास्पद वाटत असले, तरी त्यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित होतात. नक्की काय चालले आहे ? हा ‘अजेंडा’ (कार्यसूची) कोण चालवत आहे ? हे आरोप आताच का ? आणि आपण कोणत्या उदाहरणांचे साक्षीदार आहोत ?

(निवृत्त) ब्रिगेडिअर हेमंत महाजन

२. प्रसिद्धीमाध्यमांतून अपकीर्ती करून शासनामध्ये पालट करण्याविषयीचे वातावरण निर्माण करण्याची पाश्चिमात्य देशांची पद्धत

ऑगस्ट २०२४ मध्ये आपण बांगलादेशात अशीच गतीशीलता पाहिली, जिथे तेथील तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना लक्ष्य बनल्या. यासाठी पाश्चिमात्य देशांनी एका पद्धतीचा अवलंब केला आहे तो, म्हणजे एखाद्याला ‘आतंकवादी’ किंवा ‘धोका’ असे नाव द्या आणि नंतर त्यांना काढण्यासाठी पुढे जा. ‘कुत्र्याला पिसाळलेला ठरवा आणि त्याला ठार मारा’, हा वाक्प्रचार इथे पूर्णपणे योग्य होतो. पाश्चिमात्य प्रसिद्धीमाध्यमांवर नियंत्रण ठेवून आणि शासन पालटाविषयीचे वातावरण निर्माण करून ही कथानके जनतेसमोर प्रकाशझोतात आणली जातात. त्याहून अधिक चिंतेचे, म्हणजे पाश्चिमात्य उच्चभ्रू लोक वगळता बहुतेक लोक या कथानकांवर विश्वास ठेवतात आणि हा धोका लवकर न दिसल्याविषयी स्वतःला दोष देतात.

३. ट्रुडो यांचे भारतावरील आरोप म्हणजे एका मोठ्या हेतूने ठरवलेल्या षड्यंत्राची पूर्वसूचना !

वर्ष १९८५ मधील ३२९ लोक मारले जाण्याच्या ‘एअर इंडिया बाँबस्फोटा’च्या घटनेनंतरही ट्रुडो यांच्या कुटुंबाने खलिस्तानी आतंकवाद समस्येकडे बर्‍याच काळापासून दुर्लक्ष केले आहे. हे हाताळण्यातील कॅनडाच्या सरकारच्या अकार्यक्षमतेवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली आहे, तरीही याविषयी न्याय मिळालेला नाही. पन्नू यांच्यासारख्या अमेरिकेतील खलिस्तानी कार्यकर्त्यांना कोणत्याही परिणामांना सामोरे जावे न लागल्याने ते भारताविरुद्ध हिंसाचाराला चिथावणी देत आहेत. ट्रुडो यांच्या अलीकडील अपमानजनक भाषणानंतर भारतीय मालकीच्या विमानांत बाँब ठेवण्याच्या धमक्यांमध्ये वाढ झाल्याचे आपण पाहिले आहे. एअर इंडियाच्या विमानाला कॅनडामध्ये उतरण्यास भाग पाडण्यासारख्या घटना खलिस्तानींचा सहभाग संभाव्य षड्यंत्र असल्याचे दर्शवतात.

४. पुढचे लक्ष्य भारत आहे का ?

सध्याची पाश्चिमात्य कथानके ‘मोदी राजवटी’ला ‘फॅसिस्ट’ (हुकूमशाह) आणि क्रूर म्हणून चित्रित करतात. भारताला एक दुष्ट राज्य म्हणून नाव देण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे. या कथानकातील पुढील तार्किक पाऊल, म्हणजे शासनातील पालट; पण अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत सिद्ध आहे का ? ही रणनीती थेट ‘डीप स्टेट प्लेबुक’मधून बाहेर आली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ती अशक्य वाटू शकते; परंतु ब्रिटिशांसारख्या इतर शक्तींचा भारतावरील आक्रमणामागे हात असण्याची शक्यता आहे.

५. भूराजकीय उद्दिष्टांच्या अनुषंगाने भारताला लक्ष्य करणार्‍या ५ राष्ट्रांची आघाडी

ट्रुडो यांना ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी त्वरित दिलेल्या पाठिंब्यामुळे भारतावरील या आक्रमणाचे मूळ ब्रिटनमध्ये असू शकते, अशी शंका निर्माण झाली आहे. याविषयी २ घटक ठळकपणे दिसतात. एक म्हणजे भारतीय वंशाचे माजी ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांचा उदय आणि दुसरे म्हणजे चागोसियांनी त्यांच्या प्रदेशावर पुन्हा नियंत्रण मिळवणे. याचा परिणाम डिएगो गार्सिया येथील अमेरिकेच्या तळावर झाला आहे. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलंड यांचा समावेश असलेल्या ५ राष्ट्रांच्या आघाडीने ऐतिहासिकदृष्ट्या स्वतःला श्रेष्ठ मानले आहे अन् भारतावरील हे आक्रमण त्यांच्या मोठ्या भूराजकीय उद्दिष्टांच्या अनुषंगाने असल्याचे दिसते.

६. भारतात राष्ट्रीय मुत्सद्देगिरी करण्याच्या अमेरिकेच्या हेतूविषयी प्रश्नचिन्ह

अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांच्यासारख्या अधिकार्‍यांनी भारतीय राज्यांच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांना निधी देऊ केला. यावरून अमेरिका राष्ट्रीय मुत्सद्देगिरीमध्ये सक्रीयपणे सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेच्या या पातळीवरील सहभागामुळे तिच्या खर्‍या हेतूविषयी विशेषतः ईशान्य भारतासारख्या अशांत प्रदेशांविषयीचे प्रश्न उपस्थित होतात. अमेरिका-भारत यांच्यातील दृढ संबंध हे दोन्ही देशांच्या हिताचे असले, तरी अलीकडच्या घडामोडींमुळे अशा भागीदारीच्या प्रामाणिकतेवर अनेक जण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

७. आगामी काळ भारतासाठी धोकादायक !

सध्या भारताला धोकादायक काळाला सामोरे जावे लागत आहे. बाह्य शक्तींचा देशाला अस्थिर करण्याचा हेतू असल्याचे दिसून येत आहे. मॅडलिन अलब्राइटच्या काळापासून व्हाईट हाऊसमध्ये कमला हॅरिस यांच्या प्रवेशाच्या शक्यतेपर्यंत अमेरिकी आस्थापनांतील काही गटांमध्ये निर्माण झालेली भारतविरोधी भावना अत्यंत चिंताजनक आहे. या अशांत परिस्थितीतून जात असतांना भारताने त्याचे सार्वभौमत्व कमकुवत करण्याच्या उद्देशाने केल्या जाणार्‍या वाढत्या कथानक युद्धाविरुद्ध सतर्क राहिले पाहिजे !

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.